विज्ञानदीप अखंड तेवत रहावा म्हणून.. Print

प्रतिनिधी, मुंबई, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

समाजात विज्ञानविषयक जाणिवा रुजवितानाच दैनंदिन जीवनात विज्ञानाचे उपयोजन वाढविण्यासाठी गेली ४६ वर्षे कार्यरत असणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेचे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम आज निधीअभावी ताटकळत पडले आहेत. कुठलेही नियमित अनुदान मिळत नसतानाही आपल्या ७० विभागांमार्फत वर्षांनुवर्षे मराठीतून विज्ञान शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या या संस्थेच्या बळकटीकरणासाठी मदतीचे हात पुढे येण्याची नितांत गरज आहे.


१९६६ साली सुरू झालेल्या मराठी विज्ञान परिषदेने भोवताली घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमागील विज्ञान सर्वसामान्यांना उलगडून सांगितला. आजमितीस महाराष्ट्रात ७० ग्रामीण आणि शहरी भागांत तसेच महाराष्ट्राबाहेर बडोदा, गोवा, बेळगाव आणि निपाणी येथे ‘मविप’चे विभाग कार्यरत आहेत. गेली ४६ वर्षे विज्ञान शिक्षणाचा वसा जपणाऱ्या ‘मविप’ला आजवर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यापैकी कुणाकडूनही नियमित स्वरूपाचे अनुदान मिळत नाही. अथक प्रयत्नांनी ‘मविप’च्या कार्यकर्त्यांनी गेल्या तीन वर्षांत सव्वा कोटी रुपये जमवले. त्यामुळे आता केवळ तीन कोटी रुपये जमवून संस्थेचा एकच मजला वाढविला जाणार आहे. यात दीड कोटी रुपये एका वाढीव मजल्याचे, अर्धा कोटी रुपये सध्याच्या दोन मजल्यांची पुनर्रचना करण्यासाठी, अर्धा कोटी रुपये सहा मजल्यासाठीच्या कॉलम उभारणीसाठी व अर्धा कोटी रुपयांच्या व्याजातून महानगरपालिकेचे वाढीव मजल्यावरील कर भरणे अशी योजना आहे.
असे म्हणतात, की दिल्याने पैसा वाढतो. विज्ञान प्रसाराचे अत्यंत नेक कार्य करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेच्या मदतीसाठी- नव्हे, नव्या पिढीत विज्ञान-तंत्रज्ञानाचे शिल्पकार घडावेत, यासाठी आपला मदतीचा हात पुढे येणे म्हणूनच खूप खूप आवश्यक ठरते.. इच्छुकांनी मराठी विज्ञान परिषद या नावाने धनादेश काढावेत.