विलक्षण संग्राहक! Print

रविवार, २१ ऑक्टोबर २०१२

(शब्दांकन : अभिजित बेल्हेकर)
आपल्या समाजात इतिहासाविषयी मुळात बेगडी प्रेम आहे. तो जतन करण्याची वृत्ती नाही. अशावेळी नगरचे  सुरेशराव जोशी यांच्यासारख्या  माणसांनी केलेले काम असामान्य वाटू लागते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या विलक्षण इतिहास संशोधकाला वाहिलेली श्रद्धांजली..


साधारणपणे तीसपस्तीस वर्षांपूर्वीचा तो प्रसंग, एका निरोपाबरोबर प्रचंड ओढीने नगर गाठले. आवेग, कुतूहल आणि उत्सुकतेतूनच ते चित्र हाती घेतले आणि उद्गारलो, ‘शाब्बास! सुरेशराव शाब्बास! आज आपण आपल्या जीवनाचं सार्थक केलं. हे पृथ्वीमोलाचे छत्रपती शंभुराजांचे चित्र शोधून तुम्ही मोठं काम केलं आहे. तुमच्या या कार्याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल!’
परवा अचानकपणे निरोप मिळाला ‘सुरेश जोशी गेले’ आणि गेल्या तीसचाळीस वर्षांचा ऋणानुबंध आणि त्यातही हा प्रसंग वारंवार डोळ्यापुढे येत राहिला. नगर जिल्ह्य़ातील हे एक विलक्षण इतिहासवेडे व्यक्तिमत्त्व, त्या विषयाप्रमाणेच दुर्लक्षित राहिले याची खंत मनाला बोचत राहिली.
गेल्या शतकभरात इतिहास-संशोधन-अभ्यासाच्या ज्या नवनव्या परंपरा जन्माला आल्या, त्यामध्येच इतिहासाच्या विविध साधनांचा संग्रह, जतन आणि त्यातून अभ्यास-संशोधन अशी एक कार्यपद्धती काहींनी हाताळली. वि. का. राजवाडे, डॉ. ग. ह. खरे यांच्यापासून सुरू झालेल्या या परंपरेतच भर घालण्याचे काम नगरसारख्या भागात राहून सुरेशरावांनी केले.
सुरेशरावांचे इतिहासावर विलक्षण प्रेम, त्याची आवड आणि व्यासंगही! यासाठी त्यांनी औपचारिक शिक्षण अभ्यास तर पूर्ण केलाच पण त्याच्या शोधासाठी जतनासाठी वाटेल ते कष्ट घेतले. त्यांच्या या समर्पित जीवनातूनच नगरसारख्या भागात इतिहासाचे मोठे कार्य उभे राहिले.
मला आठवते, सुरेशराव आणि माझी पहिली भेट १९५५-५६ साली त्यांच्याच घरी झाली होती. त्यांनी जमा केलेल्या वस्तू दाखवण्यात ते दंग झाले होते. प्रत्येक वस्तूमागे जसा इतिहास होता तसेच ती मिळवण्यामागचे प्रचंड कष्ट-परिश्रमही दिसत होते. पुढे त्यांच्या या चिकाटीतूनच नगरसारख्या ठिकाणी एक मोठे वस्तुसंग्रहालयच उभे राहिले. या संग्रहालयाच्या निर्मितीनंतर मग अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या गाठीभेटी होत राहिल्या. या प्रत्येक वेळी इतिहास, त्यांना मिळालेल्या नवनव्या वस्तू, वस्तू संग्रहालयाची वाटचाल, त्याच्या पुढच्या अडचणी असे अनेक विषय चर्चेत येत राहिले. एखादे कार्य सुरू करणे सोपे असते पण ते चालवणे अवघड. संग्रहालय चालवताना सुरेशरावांनाही नाना अडचणी येत होत्या. अपुरा निधी, अपुरे आणि अनियमित शासकीय अनुदान या साऱ्यांतून हा गाडा हाकणे अनेकदा त्यांना जिकिरीचे झाले. पण या प्रत्येक वेळी हार न मानता त्यांनी हा इतिहासाचा यज्ञ सुरू ठेवला.
सुरेशरावांच्या या संग्रहालयाचे मोल राष्ट्रीय आहे. यातील अनेक वस्तू काळाने भारलेल्या आहेत. संभाजी महाराजांचे अस्सल चित्र, रामकृष्ण काव्य, नेवासा-पैठण उत्खननातील वस्तू ही सारीच इथली अनमोल संपत्ती आहे. या पोतडीत पन्नास हजार केवळ ऐतिहासिक कागद, हस्तलिखितेच आहेत. या शिवाय शेकडो ग्रंथ, ताम्रपट, हजारो दुर्मिळ नाणी, ऐतिहासिक मूल्य असलेली चित्रे-नकाशे, प्राचीन कोरीव शिल्प-मूर्ती, शस्त्रे, वस्त्र-अलंकार असे एक ना दोन सारा इतिहासच इथे सामावलेला आहे. यातली एकेक वस्तू मिळवताना सुरेशरावांनी प्रचंड हालअपेष्टा भोगल्या, पदरमोड केली. खेडोपाडी-भुकेल्यापोटी हिंडत हा सारा ऐवज जमा केला. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळला. इतिहासाने वेडी झालेली ही अशी माणसे हे अचाट काम करतात म्हणून पुढच्या पिढीपर्यंत हा आमचा वारसा पोहोचतो.
मुळात ‘इतिहास’ हा दुर्लक्षित विषय, समाजाने टाकलेला, चरितार्थासाठी व्यर्थ ठरलेला. या पाश्र्वभूमीवर सरकारी नोकरीला रामराम ठोकत, खासगी सन्मानाच्या नोक ऱ्यांकडे पाठ फिरवत खेडोपाडी हिंडून त्यांनी हा ऐवज गोळा केला. त्यांच्या या जिद्दीला तोड नाही. आज जिथे लोक त्यांच्या घरातील देवही नीट सांभाळत नाहीत, तिथे दुसऱ्यांच्या घरांतील वस्तू, कागदपत्रे जतन करण्याचे, त्यांची काळजी घेण्याचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा अभ्यास करत इतिहासात भर घालण्याचे काम सुरेशरावांनी केले.
खरेतर महाराष्ट्रभर फिरत असताना अनेकदा जागोजागी या ऐतिहासिक वस्तूंची मानहानी, लचकेतोडच होताना दिसते. एका सरदार घराण्यात गेलो, त्यावेळी पूर्वजांच्या तलवारी जनावरांची वैरण तोडण्यासाठी वापरल्या जाताना दिसल्या, एका ठिकाणी घरातली ऐतिहासिक कटय़ार गुळाची ढेप फोडण्यासाठी वापरली जात होती. दुर्मिळ ताम्रपट-नाणी मोडीसाठी सर्रास वितळवली जात आहेत, शिलालेखाचे दगड चिऱ्यांमध्ये घातले जात आहेत, ऐतिहासिक पत्रे बंबात जाळली जात आहेत. हे सारे पाहिले-अनुभवले की आजही आमचा समाज निरक्षर-पाशवी वाटतो.
सर विल्यम चार्लस मॅलेट हा ब्रिटिश रेसिडेंट १७९०-९३ मध्ये पुणे भेटीवर आला होता. त्या वेळी पुणे दरबारातून त्याला अनेक भेटी देण्यात आल्या. मध्यंतरी लंडनला गेलो होतो, त्या वेळी याच मॅलेटच्या घरी गेलो असता त्याच्या वंशजांनीही आजही त्या साऱ्या वस्तू जतन करून ठेवलेल्या दिसल्या. अगदी कालपरवा मिळाल्याप्रमाणे!
आपल्या समाजात इतिहासाविषयी मुळात बेगडी प्रेम आहे. तो जतन करण्याची वृत्ती नाही. अशावेळी सुरेशरावांसारख्या विलक्षण माणसांनी केलेले काम असामान्य वाटू लागते. त्यांनी फक्त अशा ऐतिहासिक वस्तूंचा संग्रहच केला नाही तर समाजात या विषयाची संस्कृती रुजवण्याचे काम केले. आज आमचा जो काही थोडाफार इतिहास वाचला आहे तो अशाच संग्रहवेडय़ा लोकांमुळे!
ज्या राष्ट्राला इतिहासाचे भान असते तीच राष्ट्रे नवा भूगोल निर्माण करू शकतात. जी राष्ट्रे इतिहासाला विसरतात मग त्यांचे वर्तमानही बुडते. इतिहासातून ‘नॅशनल कॅरेक्टर’ तयार होत असतात. ‘राष्ट्र’ म्हणून संकल्पना जोडली-बांधली जाते. आज आपण याच इतिहासाला, त्यातील शक्तीला विसरलो आहोत. या अशा झोपलेल्या, निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम अनेकांनी केले, करत आहेत. यातीलच एक दिवा सुरेश जोशी यांनी महाराष्ट्रातल्या नगरसारख्या जिल्ह्य़ात चेतवला. इतिहास संशोधनाचे केंद्र उभे केले, एका ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचा जन्म घातला, ते वाढवले. त्यांचे हे कार्य, संग्रहालय जोपासणे, वाढवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

सुरेश जोशी यांचा ‘इतिशोध’
* इतिहासाचे अभ्यासक, संग्राहक
* इतिहास संशोधन, अभ्यासासाठी महाराष्ट्रभर भ्रमण.
* हजारो ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह, ज्यातून अहमदनगर शहरात ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची उभारणी, चाळीस वर्षे संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त.
* संग्रहालयात  पन्नास हजार ऐतिहासिक कागदपत्रे, १५ हजारांवर दुर्मिळ ग्रंथ, १२ हजार हस्तलिखिते, आठ हजार दुर्मिळ नाणी, चित्रे, मूर्ती-शिल्प, नकाशे यांचा मोठा संग्रह.
* वस्तू संग्रहालयात इतिहास संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न.
* निजामशाहीची राजधानी - अहमदनगर, दिवाण पळशीकर दप्तर खंड एक, ज्ञानबोध, ऐसी लढाई झालीच नाही, गोदा-प्रवरा संस्कृतीचा ऱ्हास आदी तेरा पुस्तकांचे लेखन.
* ‘इतिशोध’ आत्मचरित्रपर पुस्तक प्रसिद्ध.
* ‘इतिहास संशोधन प्रदीप’ या त्रमासिकाचे संपादक म्हणून दीर्घ काळ काम.
*अहमदनगर महापालिकेच्या मानपत्रासह अनेक पुरस्कार प्राप्त.