कौटुंबिक सुसंवाद हाच उपाय! Print

सुहास बिऱ्हाडे, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

२२ ऑक्टोबर २०१२..मुंबई उपनगरातल्या कांदिवलीच्या एसव्ही रोडचा गजबजलेला परिसर. कृतिका पटेल नावाची २८ वर्षांची महिला आपल्या दोन वर्षांच्या जेनी नावाच्या मुलीसह एका इमारतीवर जाते. काही वेळात चिमुरडीसह वरून उडी मारून ती आत्महत्या करते. अस्वस्थ मुंबईकर या घटनेने पुन्हा अस्वस्थ आणि सुन्न होतात. एवढय़ा टोकाची पातळी तिने कशी गाठली..आपल्या चिमुरडीला वरून फेकताना त्या आईचे हृदय कसं कठोर बनलं, सुखवस्तू घरातल्या महिलांना असे काय दु:खं होतं की त्या असे टोकाचे पाऊल उचलतात.. एक ना एक नानाविध प्रश्न मुंबईकरांना बेचैन करतात.

काही घटनांचे गूढ उकलते, तर काही घटना कायमच्या गूढ होऊन राहतात. काहींची उत्तरं मिळतात.. पण त्यातूनही, हा प्रश्न कायमचा संपत नाहीच.. या हृदयद्रावक घटना घडतच राहतात..
वाढत्या आत्महत्या आणि त्यातही महिलांच्या आत्महत्या हा चिंतेचा गंभीर विषय असला तरी नवा नाही. परंतु गेल्या वर्ष-दीड वर्षांत मुंबईच्या विशेषत: उपनगरात महिलांच्या आत्महत्यांमुळे महानगर धास्तावले. या घटनांमध्ये अनेक समान धागे आहेत. उंच इमारतीवरून, आधी पोटच्या मुलांना फेकायचं, मग स्वत: उडी मारून आत्महत्या करायची. कारणं काहीही असतील, कधी कौटुंबिक वाद, सासरच्या मंडळींकडून छळ, आर्थिक चणचण, विवाहबाह्य़ संबंध किंवा अन्य काही.. पण त्यांनी यातून बाहेर पडण्याचं उत्तर शोधलं, ते म्हणजे स्वत:च्या जीवनाचा अंत.. आपल्या मागे आपल्या चिमुरडय़ांची परवड होऊ नये म्हणून त्यांनाही संपविण्याचा अघोरी निर्णय.. मागील काही महिन्यांतल्या तीन घटना याच पद्धतीने घडल्या आहेत. ८ मार्च २०११ ला निधि गुप्ता या महिलेने इमारतीवरून सहा आणि तीन वर्षांच्या मुलांना फेकून मग आत्महत्या केली.. त्याच्या पुढच्याच महिन्यात दहिसर येथे दीप्ती चौहान या ३४ वर्षीय महिलेने पाच वर्षांच्या मुलाला इमारतीवरून फेकून आत्महत्या केली. चालू
वर्षांत १५ फेब्रुवारीला बोरिवली येथील नंदिता अग्रवाल या महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला इमारतीवरून फेकून आत्महत्या केली.. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांनी सर्वानाच विचार करायला लावलं आहे.

या सर्वच महिला सुखवस्तू आणि उच्च मध्यमवर्गीय घरातल्या होत्या. या सर्व घटनांत एखादा समान धागा दिसतो. निधि गुप्ताने आपल्या दोन मुलांना इमारतीवरून फेकून आत्महत्या केली. ती घटना सगळीकडे चर्चिली गेली. त्यामुळेच तशाच स्वरूपाच्या घटना घडत गेल्या, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे मत आहे. कृतिका पटेलचा पैशांसाठी मानसिक छळ होत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नव्हती. परंतु अनेक प्रकरणांत महिला पोलीस ठाण्यात तक्रारी करतात. त्या केवळ अदखलपात्र म्हणून नोंदवून ठेवल्या जातात. त्यांना योग्य प्रकारे त्याच वेळी न्याय दिला तर अनेक अनर्थ टळू शकतात. पोलिसांत जाऊन प्रकरण अधिक बिघडविण्याची मानसिकता महिलामंध्ये नसते. महिला तक्रारी करत नाहीत, मानसिक कोंडमारा होतो आणि सर्वात शेवटी मग त्यांना असे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनाही वाटते.

महिलांना मानसिक आधाराची गरज!
मानसिक नैराश्य हे सर्व स्तरांतील महिलांमध्ये आढळते. फक्त प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात. परंतु कुटुंबांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने मानसिक कोंडमारा वाढतो. महिलांना मानसिक आधार मिळाला, त्यांना कुटुंबातील व्यक्तींकडून धीर आणि आधार मिळाला तर अशा घटना बऱ्याच प्रमाणात रोखू शकल्या जाऊ शकतात असे त्या म्हणाल्या. इमारतीवरून मुलांसह उडी मारणाऱ्या निधिी गुप्ता आणि कृतिका पटेल या दोन्ही घटना हुंडाबळीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उच्च वर्गातही अजूनही हुंडाबळी अजूनही रुजलेला असल्याचे विदारक सत्यही या निमित्ताने समोर आले आहे.
- पोलीस अधीक्षक रश्मी करंदीकर

सहन करण्याची शक्तीच क्षीण!
सहन करण्याची शक्ती क्षीण झाली असल्याने लगेच जीवन संपविण्याचा निर्णय घेतला जातो. जर त्या वेळी कुणी त्या व्यक्तीला भेटले, संवाद साधला गेला, तर तो आपले विचार बदलू शकतो. आत्महत्येचे विचार बळावत असतानाच कुणीतरी भेटल्याने, कुणाशीतरी बोलल्याने किमान १० ते १५ जणांनी आपले विचार बदलल्याची उदाहरणे आपण स्वत: पाहिली आहेत.
- पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील