आर्थिक ओढाताण, रूढीवादाचाही बोजा.. Print

रेश्मा शिवडेकर, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

नवरा राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी. कसलेही व्यसन नाही. चटक फक्त एकाच गोष्टीची, क्रेडिट कार्डाची. वेगवेगळ्या बँकांची तब्बल १८ क्रेडिट कार्डे त्याने गंमत म्हणून घेतली. हॉटेलिंग, खरेदी क्रेडिटवर करायचाच; पण रोख रक्कमही क्रेडिट कार्डावर काढायची सवय त्याला लागली. ४० टक्के व्याजाने काढलेली ही रक्कम फेडण्यासाठी पुन्हा दुसऱ्या कार्डावरून पैसे काढायचे. दोन वर्षांत ७०-८० हजारांचे कर्ज साचत १०-१२ लाखांवर गेले. मग जे व्हायचे तेच झाले. वेगवेगळ्या बँकांचे एजंट वसुलीसाठी वेळीअवेळी घरी येऊ लागले.

घराबाहेर उभे राहून शिवीगाळ करणे, मोठय़ा आवाजात अपमानास्पद बोलणे, दाराबाहेर, इमारतीच्या प्रवेशद्वारावर वसुलीच्या नोटिसा लावणे, या प्रकाराने पत्नी आणि मुले कंटाळून गेली. महिन्याच्या ४०-५० हजार पगारात कर्जाचे डोंगर उपसणे शक्य नाही. दोन्ही मुली लग्नाला आलेल्या. बायकोनं या सगळ्याचा इतका धसका घेतला की या माणसाचं नावही यापुढे तिला आपल्या नावापुढे लावायचं नाही. वसुलीसाठी आलेल्यांपैकी कोणी आपल्याला किंवा मुलीला जाब विचारू नये म्हणून न्यायालयाकडून मिळालेली ‘विभक्ती’ची नोटीसच तिनं घराबाहेर लावून ठेवलीय!
* * *
त्याचा कपडय़ाचा व्यापार. घाऊक विक्रीची मुंबईत दोन दुकानं. पण, मंदीमुळे धंदा साफ बसलेला. अचानक कर्ज वाढलं. कर्ज फेडण्यासाठी दुकानं विकली. घरात उत्पन्नाचं कोणतंच साधन नाही. त्यामुळे, एलआयसी एजंट, सेल्समनशीपची कामे करून तो महिना १०-१५ हजार रुपये कमवू लागला. पण, कर्जामुळे लागलेली ठिगळे जोडण्यासाठी ते पुरसं नव्हतं. कर्जही खासगी सावकाराकडून ‘पठाणी’ दरानं घेतलेलं. घरी धनकोंचं येणंजाणं वाढलं. सुरुवातीला कर्ज फेडण्यासाठी पत्नीनं वडिलांकडून अडीच लाख रुपये आणून नवऱ्याला दिले. पण त्याने भागणारं नव्हतं. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत व्हायला लागली तेव्हा वडिलांनी सुनावलं, ‘आमची मदत हवी असेल तर नवऱ्याला सोड.’ ती मुलाला घेऊन माहेरी निघून आली. आता कुटुंब न्यायालयात विभक्त होण्यासाठी झगडते आहे.
* * *
महिन्याला एक-दीड लाखांचे उत्पन्न असलेले कुटुंब अचानक असं आर्थिक गर्तेत कोसळलं की घराचे कसे तुकडे पडतात, याची ही बोलकी उदाहरणं. फरक इतकाच की अचानक आलेल्या आर्थिक ओढाताणीने निराशेच्या फऱ्यात अडकलेल्या या कुटुंबातील महिलांनी टोकाचं पाऊल उचलून जिवाचं काहीबाही करून घेण्याऐवजी ठामपणे विभक्त होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे अपवाद वगळता नवऱ्यापासून वेगळं होऊन स्वतंत्रपणे जगण्याची भावना स्वत:त रुजविणे सर्वसाधारण महिलांना कठीण जातं आहे. त्यामुळे, कधी निधी गुप्ता तर कधी कृतिका पटेल यांसारखी आत्महत्येची प्रकरणं अधूनमधून होतात, आणि कसं होणार, या काळजीनं सुन्न व्हायला होतं.. या विवाहिता उच्चशिक्षित होत्या. मध्यम, उच्च मध्यमवर्गीय संस्कार असलेल्या कुटुंबातील होत्या. तरीही आपल्यासोबत आपल्या कोवळ्या मुलांचं आयुष्यही त्यांनी संपवून टाकलं. तेही एकाच प्रकारच्या भीषण पद्धतीनं.

आज महिलांमधील असुरक्षिततेची भावना पराकोटीला गेली आहे. ‘मी गेल्यावर मुलांचे हाल होणार’ या काळजीनेच बहुधा त्या आपल्यासोबत मुलांचाही बळी घेत असाव्यात. मुलगी असेल तर ही भावना अधिकच तीव्र असते. आपल्या नशिबात आलेले दुर्दैवाचे फेरे तिच्या नशिबी येऊ नयेत म्हणून तिलाही आपल्यासोबत संपवायचं. आपल्या या वर्तनातून कुटुंबीयांना ‘धडा’ शिकवितो, असंही त्यांच्या मनात कुठेतरी खोलवर असतं. पण महिलांना निराशेच्या फेऱ्यात ढकलण्यासाठी हुंडा, कर्ज या अनुषंगाने येणारा ‘पैसा’ हे एकमेव कारण ठरतं का?
कुटुंब न्यायालयातील समुपदेशक अजितकुमार बिडवे यांच्या मते विवाहित महिलांना निराशेच्या फेऱ्यात अडकविण्यासाठी केवळ ‘पैसा’ हाच मुद्दा कारणीभूत नसतो. ‘अनेकदा घरातील रूढीवादी, सनातनी वातावरणही महिलांची मानसिक ओढाताण करणारे ठरते,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
बी.एस्सी. झालेली आणि महिना १७ ते १८ हजार रुपये पगाराची नोकरी करणारी एक तरुणी अशाच रूढीवादाची बळी. तिचं लग्न झालं. पण, घरात फारच दुय्यम वागणूक दिली जायची. स्त्रियांनाही बरोबरीने वागवायला हवं, याची जाणीवच सनातनी विचारसरणी असलेल्या तिच्या कुटुंबीयांना नाही. सुरुवातीला मानसिक त्रास, शिवीगाळ, मारहाण या टप्प्याने घरातला छळ वाढत गेला. कर्ज काढून सात-आठ लाख रुपये खर्चून धुमधडाक्यात लग्न केलेलं. ते असं मोडायचं तरी कसं? शिवाय लहान बहीण लग्नाची. त्यामुळे माहेराहूनही ‘सहन कर’, ‘काय फरक पडतो’ असे सल्ले मिळायचे. त्यातून मुलगी झाली. छळात आणखीच भर पडली. नवरा तर तोंडावर बोलायचा, ‘सोडून दे. लग्नाच्या बोहल्यावर पुन्हा उभा राहिलो तर अजूनही हुंडा देऊन लग्न करणाऱ्या मुली मिळतील.’ शेवटी कंटाळून ती माहेरी निघून आली. वडील जावयाची समजूत काढायला गेले तर त्यांनाही अपमानाला सामोरं जावं लागलं. या सगळ्यामुळे ती मानसिकदृष्टय़ा इतकी खचून गेली की तिला समुपदेशकाकडे न्यावे लागले. तिची समजूत काढल्यानंतर मनस्थिती थोडी सुधारली. आज ती आपल्या सात वर्षांच्या मुलीच्या हसण्यात आनंद मानून जगते आहे.
सुदैवाने या विवाहितेला वेळीच समुपदेशकांची मदत मिळाली. पण, अशा कितीतरी महिला आहेत की ज्यांना समजुतीच्या गोष्टी सांगणारे कुणीच मिळत नाही. ‘नोकरीधंद्यामुळे येणारे आर्थिक स्वातंत्र्य, माहेरच्यांचं पाठबळ नसलं की महिला टोकाचे पाऊल उचलतात. काही ठराविक समाजातील रूढीवादी घरांमध्ये महिलांना स्वत:च्या भावना व्यक्त करण्याचेही स्वातंत्र्य नसते,’ अशी प्रतिक्रिया समुपदेशक डॉ. सुजाता चव्हाण यांनी व्यक्त केली.
एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करणाऱ्या अवघ्या १९ वर्षांच्या तरुणीची हीच गत. एकुलती एक आणि नाकीडोळी नीटस असलेल्या या मुलीला फॅशन करण्यापासून घरी कोणीच आडकाठी घेतली नाही. मुलीनेही याचा कधी गैरफायदा घेतला नाही. कायम नाकासमोर चालणारी ही मुलगी. पण, १९व्या वर्षीच वडिलांनी तिचं आपल्याच समाजातील मुलाशी लग्न ठरवून टाकलं. हा मुलगाही शिकत होता. त्याचं एमबीए पूर्ण झाल्यावर लग्न करायचं ठरलं. पण, मुलगा भलताच संशयी निघाला. पार्लर सुटण्याच्या वेळेस हा दररोज दत्त म्हणून बाहेर येऊन उभा राही. शिवाय कामाच्या वेळेस त्याचे फोन सुरूच असायचे. हे कपडे घालू नको, ते घालू नको, लग्नानंतर नोकरी करायची नाही, म्हणून कटकट असायचीच. तिची मानसिक कुचंबणा तिनं वडिलांच्या भीतीनं घरी कधीच सांगितली नाही. पण, हा ताण असह्य़ होऊन तिनं शेवटी कसलीशी ब्युटी क्रीम खाऊन आपला जीवन प्रवासच कायमचा संपवला. पुढे तिच्या आत्महत्येची फारशी वाच्यता नको म्हणून वडिलांनीही पोलीस तक्रार मागे घेऊन या प्रकरणाला तिथेच पूर्णविराम दिला.
घरातील रूढीवादी, सनातनी वातावरण, त्यातच आर्थिक स्वातंत्र्य नसल्याने होणारी कुचंबणा ही मुंबईसारख्या शहरांमध्ये महिलांची अवस्था आहे. गुजराथी किंवा उत्तरेकडील समाजांमध्ये तर ही कुचंबणा खूपच जास्त असते. ‘या समाजात महिलेची ‘नोकरदार’ ही ओळख आजही स्वीकारली गेलेली नाही. महिलांनी नोकरी करणं, हे या कुटुंबांना मान्यच नसतं. घरदार, मूलबाळ, पाहुणे यात स्वत:ला गुंतवून घ्यायचं, इतकीच बायकांकडून अपेक्षा. अशा स्त्रियांना घरात आलेला पैसा वापरण्याचं आर्थिक स्वातंत्र्य असतंच असं नाही. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे व्यक्तिगत खर्चासाठीचे पैसेही सासरा किंवा मोठय़ा दिराकडून मागून घ्यावे लागतात. एखाद्या शिकलेल्या स्त्रीची यात फारच कुचंबणा होते,’ असे बिडवे यांनी सांगितले.
म्हणजे एकीकडे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्याचे दोर कापून टाकायचे आणि दुसरीकडे घरातील आर्थिक व्यवहारांमध्ये तिला स्थान द्यायचे नाही, अशी एकूण परिस्थिती असते. ‘आमच्या समाजात नोकरदार विवाहिता ही संज्ञाच मान्य नाही. पाठिंबा देणं तर दूरच, पण नोकरी सोडण्यासाठीची भुणभूणच सतत मागे असते. त्यामुळे, लग्न करेन तर आईवडिलांपासून वेगळं राहण्यास तयार असलेल्या मुलाशीच. अन्यथा मला लग्नच करायचे नाही,’ असे पत्रकारिता करणाऱ्या एका गुजराथी तरुणीने जाहीर करून टाकले आहे. ‘या समाजातील बहुतांश पुरुष हे व्यवसाय किंवा धंद्यात असतात. घरात बऱ्यापैकी पैसा असल्याने बायकांनी नोकरी का करायची, अशी कुटुंबीयांची भूमिका असते. त्यामुळे, इतर समाजात नोकरदार स्त्रियांना जो मान किंवा पाठबळ लाभते ते या समाजात नसते,’ असे मत एका मराठी तरुणाशी लग्न केलेल्या गुजराथी महिलेने व्यक्त केले. सुजाता चव्हाण यांच्या मते आर्थिक दुरवस्था आल्याने विभक्त  होण्याचा निर्णय घेण्याचे प्रमाण सध्या आयटी क्षेत्रातील पाच आकडी पगारावरून शून्याकडे कोसळलेल्या दांपत्यांमध्येही बरेच आहे. पूर्वीची खर्चाची सवय आर्थिक ओढग्रस्त परिस्थितीत टिकविता येत नाही, म्हणून वेगळं होणारे तरुणतरुणी मोठय़ा संख्येने कुटुंब न्यायालयाची पायरी चढत आहेत.