टोळीसत्ता, शास्त्रांचा बाजार आणि पोरके वास्तव Print

अतुल देऊळगावकर, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

हवामान बदलाचे सर्व दावे खोटे व अवैज्ञानिक आहेत, हवामान बदल व कर्ब उत्सर्जनाचा काही संबंध नाही, हे सतत ठसवण्याकरिता अमेरिकेतील हार्टलँड इन्स्टिटय़ूटचा वापर केला गेला. सर्व पर्यावरणीय दावे खोडून काढण्याची ८६ लाख डॉलरची सुपारी हार्टलँड इन्स्टिटय़ूटचे वैज्ञानिक पीटर ग्लिक यांनी घेतली. याची कबुली दस्तुरखुद्द ग्लिक यांनीच  दिली. त्यावरून हवामान बदलाच्या अर्थ-राजकारणाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे.. गेल्या ‘रविवार विशेष’मध्ये ग्लोबल वॉर्मिगसंबंधी प्रसिद्ध झालेल्या लेखाची दुसरी बाजू...

नायजेल लॉसन यांनी २००८ मध्ये लिहिलेल्या ‘अ‍ॅन अपील टू रीझन : कूल लूक अ‍ॅट ग्लोबल वॉर्मिंग’ या पुस्तकाचा मुख्य आधार घेऊन ‘जागतिक तापमानवाढ - प्रलय घंटावाद आणि वस्तुस्थिती’ या लेखात (रविवार विशेष, २१ ऑक्टोबर) राजीव साने यांनी ‘तापमानवाढ’ या संकल्पनेस झोडपले आहे. सर्वश्री लॉसन आणि त्यामुळे साने यांचे प्रतिपादन तेवढे तर्क आणि विज्ञानास धरून, तर बाकी सारे ‘घंटावादी’ असे लेखाचे सार आहे.
हिमालयातील हिमनद्या वितळण्याचे भाकीत (हिमालय नव्हे!) हे इंटर गव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आय.पी.सी.सी)चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार पचौरी (ज्यांचा उल्लेख पंकज पचौरी असा झाला आहे) यांनी केले नसून ते संशोधन हिमनदी तज्ज्ञ डॉ. सय्यद इक्बाल हस्नाइन यांचे होते. गेली १० वर्षे डॉ. हस्नाइन हे ऐन हिवाळ्यात, हिमालयात उणे १५ अंश सेल्सियस तापमान असताना बर्फाच्या भौतिक व रासायनिक बदलाचा अन्वय लावीत आहेत. त्यातूनच त्यांच्यावर हिमनद्यांच्या आकसण्याच्या अभ्यासाची जबाबदारी सोपवली गेली. त्यातून २३५० साली हिमनद्या वितळून जातील, असा त्यांचा निष्कर्ष निघाला. २००७ साली जगप्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिक ‘नेचर’मध्ये त्यांची ही मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यात ते वर्ष २०३५ असे छापले गेले. त्यामुळे तो दोष ‘नेचर’चे पत्रकार व डॉ. हस्नाइन या दोघांचा असू शकतो. पचौरीला बदनाम करण्यासाठी ही संधी हवीच होती. तो एक आंतरराष्ट्रीय अर्थ-राजकारणाचा भाग होता व आजही आहे.
ब्रिटनमधील सनातनी राजकारणी गटाचे  नायगेल लॉसन हे मार्गारेट थॅचर यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी २००६ पासूनच हवामान बदलाच्या अर्थ-राजकारणावर हल्ले चालू केले होते. त्यामागील कारणेसुद्धा राजकीयच होती. प्रस्तुत पुस्तक हा त्याच व्यापक राजकारणाचा एक भाग आहे. साने त्याला बळी पडले याचे सखेद आश्चर्य वाटते.
२००३ साली ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी हवामान बदलाच्या आर्थिक परिणामाची व्याप्ती तपासण्याची जबाबदारी जागतिक बँकेचे मुख्य अर्थ सल्लागार सर निकोलस स्टर्न यांच्यावर  सोपवली. स्टर्न यांनी ३० ऑक्टोबर २००६ ला ६०० पानांचा अहवाल सादर केला आणि लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’पासून ‘सायंटिफिक अमेरिकन’पर्यंत झाडून सारे गंभीर झाले. ‘येणाऱ्या दोन दशकांत आपण कसे वागतो यावर जगाचा भविष्यकाळ ठरणार आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी भीषण अवस्था येऊ घातली आहे. दोन महायुद्धे व महामंदीनंतर झाली ती क्षुल्लक वाटावी अशी आर्थिक व सामाजिक उलथापालथ होऊ शकते. कर्बवायूंचे उत्सर्जन रोखण्यासाठी निधीदेखील प्रचंड लागणार आहे. ती रक्कम वाचवण्याचा विचार जगासाठी विघातक ठरणार आहे. विचार करण्यासाठीसुद्धा सवड नाही, अशी युद्धजन्य स्थिती हवामान बदलाने आणली आहे.’ असा स्टर्न अहवालाचा पहिला परिच्छेद आहे. एरवी अमेरिका-इंग्लंडमध्ये सर्व पर्यावरणवाद्यांना अमेरिकाविरोधी, सोशॅलिस्ट अथवा अवैज्ञानिक ठरवून मोडीत काढलं जायचं. निव्वळ अर्थवादी ते पर्यावरणवादी अर्थकारण असा स्टर्न यांचा प्रवास झाला, असं त्यांनी स्वत:च म्हटलंय. ‘मी स्वत: पर्यावरणास फारसं मनावर घेत नव्हतो, परंतु २००३ पासून हवामान बदलाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करताना मुळापासून हादरून गेलो. हवेचे प्रदूषण पृथ्वीचा अंत घडवू शकते आणि तो काळ फार दूर नाही याचं भान आलं.’ ब्रिटनमधील कर्बवायूंचं उत्सर्जन चार दशकांत साठ टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा टोनी ब्लेअर यांनी केली होती. ब्लेअर यांच्या या उदार अर्थ-राजनीतीवर लॉसन यांचा हल्ला आहे.
२००६ पर्यंत जगातील माध्यमधुरिणांकरिता पर्यावरणाला बातमीमूल्य नव्हते. कोणी पर्यावरणीय कारणे दाखवून हवामान बदलाचा सिद्धान्त चुकीचा असल्याचा दाखला द्यायचे. कुणाला ती राजकीय खेळी वाटायची, तर प्रदूषण हे अर्थव्यवस्थेचे भूषण असल्याच्या आविर्भावात कित्येक अर्थतज्ज्ञ तुटून पडत. स्टर्न अहवालानंतर बी.बी.सी.ला जगाच्या हवामानातील बदल आणि वाढणारा उष्मा ही आणीबाणीची परिस्थिती वाटू लागली. सहा वर्षांत जगाच्या विचारविश्वाच्या लंबकाने असा हेलकावा घेतला. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांनी बेछूट आरोपांचे ‘उद्योग’ चालू केले.
प्रस्तुत पुस्तकानंतर २००९ च्या डिसेंबरमधील कोपनहेगन शिखर परिषदेसाठी अमेरिका जुलपासूनच तयारीला लागली होती. संयुक्त राष्ट्रसंघामधील अधिकाऱ्यांसंबंधी यच्चयावत माहिती प्राप्त करण्याचे आदेश अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला (सी.आय.ए.) दिले होते. वाटाघाटी करणाऱ्या चीन, फ्रान्स, रशिया, जपान, मेक्सिको व युरोपीयन युनियनच्या प्रतिनिधींची व्यक्तिगत माहिती, क्रेडिट कार्ड नंबर, वारंवार प्रवास (फ्रीक्वेंट फ्लायर) नंबपर्यंतचा तपशील अमेरिकेने हस्तगत केला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटर गव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजसाठी (आय.पी.सी.सी.) संशोधन करणाऱ्या ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील क्लायमेट रीसर्च युनिटचा सव्‍‌र्हरच हॅक केला गेला. वैज्ञानिकांच्या संगणकावरील अ‍ॅड्रेस बुक हॅक करून हजारो ई-मेल पाठवले, अनेक फाइल कॉपी करून घेतले गेले. ‘हवामान बदल होतच नाही, जगाचे तापमान वाढत नाही, विकासासाठी कर्ब उत्सर्जन आवश्यक आहे’ हे पटवून सांगणारी आकडेवारी व संशोधन असल्याची माहिती जगभर पोहोचवली गेली. क्लायमेट स्केप्टिक्स ब्लॉगोस्पीअर या ब्लॉगने या राजकीय खेळ्या जगासमोर आणल्या. स्तंभलेखक जेम्स डेलिगपोल यांनी या कारस्थानाला ‘क्लायमेट गेट’ म्हटले होते. कोपनहेगन परिषदेआधी या ‘क्लायमेट गेट’मुळे जगभर गदारोळ झाला होता. आय.पी.सी.सी.चे निष्कर्ष हे अमेरिकेला सोयीस्कर नव्हते. त्याचबरोबर आय.पी.सी.सी. अमेरिकेला बधत नव्हती. ‘प्रदूषण करणाऱ्यांनी भरपाई केली पाहिजे,’ ही आय.पी.सी.सी.ची न्याय्य भूमिका अमेरिकेला परवडणारी नव्हती. त्यामुळे आय.पी.सी.सी.भोवतीच संशयाचे धुके पसरवणे, ही अमेरिकेची गरज होती. आय.पी.सी.सी.ला साथ देणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाला बदनाम करण्याचे सत्र सुरू झाले. अमेरिकन लेखक रिचर्ड नॉर्थ आणि इंग्लंडचे लेखक-पत्रकार ख्रिस्तोफर बुकर या महाशयांनी लंडन येथील ‘द टेलिग्राफ’मधील लेखातून ‘संयुक्त राष्ट्रसंघ हे तिसऱ्या जगातील बौद्धिक क्षमता नसलेल्या मुत्सद्दय़ांचे व तज्ज्ञांचे कोंडाळे’ असल्याचे तारे तोडले. त्याच लेखात ‘आय.पी.सी.सी.चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार पचौरी हे त्या पदास लायक नाहीत, ते भ्रष्ट आहेत’ असे व्यक्तिगत हल्ले केले होते. इराणचे वैज्ञानिक  डॉ. मुस्तफा जाफरी यांची आय.पी.सी.सी.च्या उपाध्यक्षपदी नेमणूक करू नये. अन्यथा अमेरिकेकडून मिळणाऱ्या निधीमध्ये कपात करण्याचा दबाव डॉ. पचौरी यांच्यावर टाकला होता. (इस्रायल व अमेरिकेला न बधणाऱ्या इराणला वाळीत टाकण्याच्या डावाचा हा एक भाग होता.) परंतु पचौरींनी त्याला भीक घातली नाही. त्यामुळे काही दिवसांतच नालस्ती सुरू झाली होती. आय.पी.सी.सी.चे अध्यक्ष म्हणून विनामोबदला कार्य करणाऱ्या पचौरी यांच्या समर्थनार्थ जगभरचे पर्यावरणतज्ज्ञ व अनेक संस्था एकवटल्या. पर्यावरणाच्या अभ्यासात हयात घालवणाऱ्या पचौरी यांनी त्यांना मिळालेले पुरस्कार ‘टेरी- द एनर्जी रीसर्च इन्स्टिटय़ूट’ला देऊन टाकल्याचा हवाला अनेक शास्त्रज्ञांनी ‘द टेलिग्राफ’ला दिला. पुढे काही दिवसांतच ‘द टेलिग्राफ’ला पचौरी यांची जाहीर माफी मागावी लागली.
हवामान बदलाचे सर्व दावे खोटे व अवैज्ञानिक आहेत, हवामान बदल व कर्ब उत्सर्जनाचा काही संबंध नाही, हे सतत ठसवण्याकरिता अमेरिकेतील हार्टलँड इन्स्टिटय़ूटचा (शिकागो) वापर केला गेला. सर्व पर्यावरणीय दावे खोडून काढण्याची ८६ लाख डॉलरची सुपारी हार्टलँड इन्स्टिटय़ूटचे वैज्ञानिक पीटर ग्लिक यांनी घेतली. याची कबुली दस्तुरखुद्द ग्लिक यांनीच २०१२ च्या फेब्रुवारीमध्ये दिली. त्यावरून हवामान बदलाच्या  अर्थ-राजकारणाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. त्यामागे जग चालवणारी टोळीसत्ता आहे. ‘कॉर्पोरेटोक्रसी’ ही काल्पनिक गोष्ट नसून वारंवार समोर येणारे प्रखर वास्तव आहे. अवघे जग हे काही कुबेरांच्या हातात आहे. कोणत्याही राष्ट्रावर सत्ता कोणत्याही राजकीय पक्षाची असो, त्यावर खरा ताबा हा काही पुढारी, उद्योगपती व नोकरशहा यांच्याकडेच असतो. ही टोळीसत्ता (ऑलिगार्ची) राष्ट्रांवर आणि जगावर सत्ता गाजवत आहे. ही टोळीसत्ता पर्यावरणाचा विनाश घडवून अजस्र संपत्ती गोळा करीत असते.
तापमानवाढ व त्यामुळे होणारी हानी हा भ्रम असल्याची मांडणी साने (लॉसन यांचा तर्क आणि विज्ञानाचा आधार घेऊन) करतात. २०१२ च्या उन्हाळ्यात श्रीनगर भागातील रहिवाशांची काहिली झाली, उन्हाचा पारा ३५ अंशावर गेला. कधीही पंखा न लागणाऱ्या काश्मीर राज्यामध्ये पंखा व एअरकंडिशनरची प्रचंड विक्री झाली. ही बातमी लंडनच्या ‘टेलिग्राफ’ने ठळक छापली. नेपाळमधील हिमालयाच्या कुशीतील शेतकरी म्हणतात, ‘पाऊस वेळेवर येत नाही. जून आणि ऑक्टोबरमधला फरक समजत नाही.’ कठीण बर्फावरून पाय घसरतो म्हणून गिर्यारोहण करताना भुसभुशीत बर्फ पाहूनच चालावे लागते. यंदाच्या वर्षी भुसभुशीत किंवा नवा बर्फ पुरेसा दिसला नाही. म्हणून एव्हरेस्ट शिखर सर करण्यास निघालेल्या पथकाला त्यांची मोहीम रद्द करावी लागली आहे. हिमनद्यांच्या जागी दोन किलोमीटर लांब, एक किलोमीटर रुंद, १०० मीटर खोलीची सरोवरे नव्याने दिसत आहेत. कधीही गवत उगवत नव्हते तिथे मेंढपाळांसाठी कुरणं तयार झाली आहेत, तर २०११ हे साल गेल्या १३२ वर्षांच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष होते. याच वर्षी पाकिस्तानमध्ये उन्हाचा पारा ५३.७ अंशावर गेला होता. ‘हवामानातील उष्मा व शीतलता यांची चरमता (एक्स्ट्रीमिटी) वाढीस लागल्यामुळे अवर्षण व महापुरांची तीव्रता असह्य होत आहे’ असा अमेरिकेच्या ‘नासा’ (नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)च्या अहवालाचा निष्कर्ष आहे.
कर्ब उत्सर्जनाची मर्यादा आणि हवामान बदल अनुयोजन निधी (क्लायमेट चेंज अ‍ॅडाप्टेशन फंड) या दोन मुद्दय़ांवरच जग विभागले गेले आहे. कोपनहेगन व कानकूनमध्ये  वाटाघाटी तिथेच अडून राहिल्या. ‘हवामान बदलाचा सामना करण्यासाठी अविकसित राष्ट्रांना द्यावयाचा १०० अब्ज डॉलर (सुमारे सव्वा पाच लाख कोटी रुपये) हरित निधी (ग्रीन क्लायमेट फंड) रोखून धरणार.’ २०११ ची डरबन परिषद सुरू होण्यास काही तास शिल्लक असताना, अमेरिका व सौदी अरेबिया यांनी अशी धमकी दिली होती. ‘चीन, ब्राझील व भारताने कर्ब उत्सर्जनाची पातळी वाढवली असल्यामुळे त्यांनीही उत्सर्जनात कपात करावी,’ असा धोशा अमेरिकेने लावला आहे. १९५० ते २००० या ५० वर्षांत एकंदरीत उत्सर्जनापकी २८ टक्के उत्सर्जन अमेरिकेने, २५ टक्के युरोपीय देशांनी केले. या काळातील कर्ब उत्सर्जनात चीनचा वाटा नऊ टक्के,तर भारताचा वाटा केवळ दोन टक्के होता. या ऐतिहासिक उत्सर्जनाचे काय करायचे? प्रत्येक राष्ट्राला विकासाचा हक्क आहे. त्यांना स्वच्छ व कर्बरहित तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी अवधी लागणार आहे. तोपर्यंत त्यांना सवलत हवी आहे. गेल्या दहा वर्षांत युरोप व अमेरिकेच्या कर्ब उत्सर्जनात कपात न होता वाढच झाली आहे. ते लपविण्यासाठी प्रदूषकांचा कांगावा चालू आहे. त्याला खतपाणी घालण्याचे कार्य साने यांच्याकडून झाले आहे. बाजारावर वर्चस्व असणारे म्हणतील तेच विज्ञान, असा तर्क प्रस्थापित केला जात आहे.
शास्त्रांचा बाजार भरला,       देवांचा गलबला झाला,
लोक कामनेच्या व्रताला,      झोंबोनि पडती,
ऐसे अवघे नासले,            सत्यासत्य हरपले
अवघे अनायक झाले,        चोहीकडे
मतमतांचा गलबला,           कोणी पुसेना कोणाला,
जो जे मती, सापडला,         तयासि तेचि, थोर वाटे
रामदासांची ही ओवी अनुभवयास वारंवार मिळत आहे.