प्रतिसाद Print

रविवार, ४ नोव्हेंबर २०१२

जै सुवार्ता तै कारस्थानु।
पै कुवार्ता चि परिवर्तनु
रविवार, २८ ऑक्टोबरच्या अंकातील अतुल देऊळगावकर यांचा जागतिक तापमानवाढीवरील लेख, हा माझ्या २१ ऑक्टोबरच्या अंकातील लेखाचे खंडन करणारा असेल अशी आशा मला (त्याच्या पहिल्या परिच्छेदावरून) वाटल्याने, मी नेमका कुठे चुकतो आहे हे समजेल, या उत्सुकतेने वाचला.

एवढे एकच कळले की पचौरी यांचे नाव राजेंद्र असूनही मी ते पंकज असे लिहिले. या चुकीबद्दल मी दिलगीर आहे. परंतु पुढे माझे एकही तथ्यात्मक विधान वा युक्तिवादात्मक विधान उद्धृत करून त्याचे खंडन देऊळगावकरांनी केल्याचे मला तरी आढळले नाही. इतकेच नव्हे तर ‘कबरेत्सर्जनात प्रचंड योगदान असलेले अमेरिका/युरोप हे स्वत: त्यात काहीही कपात करीत नाहीत आणि भारत, चीन, ब्राझील या कमी दोषी असणाऱ्या राष्ट्रांनी मात्र कपात करावी हा धोशा लावतात’ ही देऊळगावकरांची तक्रार, हाच माझ्या लेखाचाही निष्कर्ष आहे. कळीच्या मुद्दय़ावर आमचे एकमत असल्याने त्यांचा लेख हा माझे खंडन करणारा कसा काय ठरतो? हेच मला कळले नाही.
मी पुन्हा विचारतो की माझ्या लेखातले कोणते विधान चुकीचे आहे? तरंगणारे बर्फ वितळण्याने पाण्याची पातळी वाढत नसते, हे? हरितगृह-परिणाम करण्यात बाष्प आणि ढग यांचा सर्वाधिक वाटा असतो हे? कुजण्यातून सुटणारे वायू वनस्पती परत शोषू शकत नाहीत हे? औद्योगिक क्रांतीनंतर सोडलेल्या एकूण CO2 पैकी १/३ CO2 वातावरणातून गायब झाला हे? पृथ्वीचे तापमान विसाव्या शतकात ०.७ सें.ने वाढले.. त्याचा कमाल िबदू १९३४ सालीच येऊन गेला.. १९४० ते १९७५ हा रशिया जोरात असूनही ग्लोबल कुलिंगचा कालखंड होता.. २१व्या शतकाच्या पहिल्या दशकाअंती शून्य वाढ झाली, हे? मालदीव बुडायच्या ऐवजी वर वर येते आहे व तुवालू बेटांपासची समुद्रपातळी वार्षिक दीडऐवजी फक्त अध्र्या मिलीमीटरने काही वर्षेच वाढली, हे? थंड प्रदेशात शेतीला, घरांना व आरोग्याला वॉर्मिग हे वरदानच ठरेल, हे? की अणु-ऊर्जा कबरेत्सर्जक नसते, हे? माझे चुकीचे विधान सांगा. ते का चुकीचे हे सांगा. मी ते मागे घेईन.
देऊळगावकर हे ‘अलीकडे पुण्यात उकाडा फार वाढलाय, नाही?’ अशी किस्सेवजा विधाने भरपूर करतात आणि लोकसंख्येच्या दाटीमुळे ती स्थानिक पातळीवर खरीही असतील. पण अशा विधानांवरून  ध्रुव-प्रदेशातील बर्फ वितळवणाऱ्या जागतिक-तापमान-वाढीचे अनुमान काढता येत नसते. खरे तर ज्याला ‘विश्वाचे आर्त’ नेमके समजलेले आहे त्याने एखादे तरी भौतिक, वैश्विक आणि वस्तुनिष्ठ विधान करायला काय हरकत होती?
नायगेल लॉसन जे जे म्हणतो तेच खरे अशी माझी अजिबात श्रद्धा नाही. किंबहुना नायगेल लॉसनची कोणकोणती म्हणणी नेमकी कशावरून चूक आहेत हे समजावे याबद्दल मला प्रामाणिक जिज्ञासा आहे. लॉसन हे मार्गारेट यांचे ऊर्जामंत्री होते हे विधान लॉसन या व्यक्तीविषयीचे विधान आहे. ते लॉसनच्या कोणत्याच विधानाविषयीचे विधान नाही. काय म्हणणे आहे हा प्रश्न टाळून म्हणणारा ‘कोण’ आहे यावर घसरणे हा अ‍ॅड होमीनम नावाचा वाददोष (फलसी) आहे. खरे तर देऊळगावकरांचा आख्खा लेखच जगात कोण सच्चे आहेत आणि कोण खोटारडे आहेत याचीच मुख्यत: माहिती (?) देणारा आहे.
कोणी कोणाला ८६ लाख डॉलरची ‘सुपारी’ दिली यांसारख्या गोष्टींबाबत, माझा आंतरराष्ट्रीय हेरगिरी या क्षेत्रात अजिबात वावर नसल्याने व त्या विषयात रसही नसल्याने मी काय उत्तर देणार? देऊळगावकरांच्या लेखाचे सार ‘जे जे सुवार्ता सांगतात ते कारस्थानी/ प्रस्थापितवादी असतात (किंवा जे कारस्थानाला बळी पडल्याचे सखेद-आश्चर्य वाटावे असे माझ्यासारखे भोळे तरी असतात.) आणि जे जे कुवार्ता सांगतात ते खरे तळमळीचे/ परिवर्तनवादी असतात.’ मी सोळा वर्षांचा होतो तेव्हा मी अशा गटात होतो की जेथे, जो आपल्यापेक्षा वेगळे बोलेल त्याला सी.आय.ए.चा एजंट म्हणावे, अशी पद्धत होती. आज मी ५६ वर्षांचा झालो आहे. आम्हा परिवर्तनवाद्यांपैकी काही मित्रांना आजही ‘कारस्थान-उपपत्ती’चाच (कॉन्स्पिरसी थिअरी) आधार घ्यावा लागतो आहे आणि ‘शत्रू जे बोलतो त्याच्या उलटे ते सत्य’ हेच ‘ज्ञान-शास्त्र’ चालवावे आहे, याचे मला अतीव दु:ख होते आहे.
प्रलय होवो वा न होवो, अश्म-इंधनांवरील अवलंबित्व शक्य तितके कमी करायलाच हवे, असेही माझे ठाम मत आहे. तापमानवाढ जर नको इतकी होत असेल आणि रोखता येत असेल तर रोखलीच पाहिजे. पण ज्यांनी ती जास्त केली त्यांनी प्रथम त्याग केला पाहिजे यावरही माझे दुमत नाही. पण या दोनही गोष्टी, भारताच्या ऊर्जावाढीच्या अत्यंत तातडीच्या निकडीला बाधा न आणतादेखील, साधता येतील की काय? अशी मला एक आशावादी सु-शंका आहे इतकेच!
व्यक्तिगत हितसंबंध आणि आत्मनिष्ठ निरीक्षण म्हणाल तर पुण्यातला उकाडा वाढला आहे, हे मात्र खरे.
- राजीव साने, पुणे.

ही लेखाची दुसरी बाजू नव्हेच!
रविवार, २८ ऑक्टोबर रोजी अतुल देऊळगावकर यांनी ‘टोळीसत्ता, शास्त्रांचा बाजार..’ हा राजीव साने यांच्या ‘प्रलय घंटावाद’ या लेखाचा प्रतिवाद करणारा लेख लिहिला. खरे तर दोघांचेही मुद्देच वेगळे आहेत. दोघांचेही म्हणणे खरेच असल्याने प्रतिवाद होतच नाही. प्रतिवाद म्हणायचेच असेल तर राजीव सानेंचे सर्व मुद्दे देऊळगावकरांच्या प्रतीवादानंतरही अबाधित राहतात. मुळात सानेंनी अत्यंत सोप्या भाषेत जागतिक तापमान या नावाचे भूत कसे खोटे आहे याबद्दल माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’मध्येच गेल्या पंधराशे वर्षांचे दाखले देऊन भूकंप, पूर, अतिउश्म- अतिशीतल वातावरण, हिमनग वितळणे, वादळे अशा अनेक गोष्टी वेळोवेळी घडल्या असल्याचे आणि त्यामागे कोणतीही औद्योगिक क्रांती वगरे नसल्याचे स्पष्ट करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. राजीव सानेही तेच म्हणताहेत. गेल्या दोनशे वर्षांतील वातावरणबदल आणि त्यामागे असलेली कारणे यांचा कार्यकारणसंबंध आजपर्यंत कोणीही प्रस्थापित करू शकला नाही. जगभर या विषयावर झालेल्या हजारो बठका आणि हजारो संशोधन प्रबंध जागतिक तापमानाचा औद्योगिक क्रांती अथवा अणू-ऊर्जा वापराशी शास्त्रशुद्ध आणि त्रिकालाबाधित सत्य संबंध जोडू शकलेले नाहीत. कबरेत्सर्ग हे एकच कारण तापमानवाढीस कारणीभूत नाही हेही आता स्पष्ट झाले आहे. अतुलजींनी सानेंच्या कित्येक शास्त्रशुद्ध मुद्दय़ांचा उल्लेखही केलेला नाही तर कित्येक मुद्दय़ांवर सहमती दर्शवली आहे. या दोन्हीही लेखांचे शेवटचे परिच्छेद वाचले तर कोणाच्याही लक्षात येईल की, या दोन लेखांना स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे. एका लेखाची दुसरी बाजू असे नाही. जागतिक तापमानाबद्दल आकांत करून स्वार्थ साधण्याची योजना आखलेल्या देशांचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या नावाखाली अर्थ-राजकारण करून जगाची फसवणूक करण्याचा घाट घातलेल्या देशांचा बुरखा फाडण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशीच एक वेबसाइट वाचकांच्या माहिती साठी देतोय. www.friendsofscience.org
- प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक

पीटर ग्लिक हे ‘हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटचे वैज्ञानिक’ नाहीत!
अतुल देऊळगावकर यांचा राजीव साने यांच्या  लेखावर प्रतिक्रिया देणारा लेख वाचला. राजीव साने यांची राजेंद्र पचौरी यांचा उल्लेख पंकज पचौरी असा केल्याची चूक त्यांनी वाचकांच्या नजरेस आणून दिली हे चांगलेच केले. कोणाच्याही नावाचा विपर्यास होऊ नये. परंतु या लेखात त्यांनी एक प्रचंडच सत्यविपर्यास केला आहे, तो आपल्या नजरेस आणून देऊ इच्छिते. त्यांच्या लेखातील हा साफ चुकीचा भाग चौकटीत वापरला असल्यामुळे तर ती चूक आकारमानानेही फार ठळक झाली आहे.
पीटर ग्लिक हे हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटचे वैज्ञानिक असून त्यांनीच हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटने ८६ लक्ष डॉलर्सची सुपारी घेऊन मानवनिर्मित पर्यावरण हानीच्या विरोधातील प्रचारआघाडी उघडल्याची कबुली दिली, असे या लेखात आणि चौकटीत म्हटले आहे.
बिचारे देऊळगावकर आणि बिचारे पीटर ग्लिक. पीटर ग्लिक हे वैज्ञानिक मानवनिर्मित पर्यावरणहानीच्या भूमिकेच्या बाजूने हिरिरीने भूमिका मांडणारे पॅसिफिक इन्स्टिटय़ूटचे जल वैज्ञानिक आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाही. हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटचे त्यांच्या दृष्टीने काळे धंदे उघडकीस आणण्यासाठी त्यांनी खोटी ओळख (आपण हार्टलॅण्ड इन्स्टिटय़ूटचेच प्रतिनिधी असल्याचे खोटे सांगून) दाखवून माहिती घेतली आणि ती वृत्तपत्रांकडे दिली. या त्यांच्या तोतयागिरीचा त्यांच्या विरोधी गटातूनच नव्हे तर त्यांच्या बाजूच्या वैज्ञानिकांतूनही निषेध झाला. तर काहींनी पर्यावरण रक्षणासाठी असला खोटेपणा करण्यास काहीच हरकत नाही असाही निर्वाळा दिला.
टोळ्या तर असतातच.. पर्यावरणवादी भूमिका आग्रहाने मांडणाऱ्या आणि पर्यावरण म्हणजे काही फारच नाजूक कचकडय़ाचे बाहुले नसून मानवाच्या विकसनसील कृत्यांमुळे ते ध्वस्त होणार नाही हे मांडणाऱ्या सर्वानाच आपापल्या टोळ्या बनवाव्या लागतातच.. अशी आजची जागतिक सामाजिक परिस्थिती आहेच.
पण या नाही तर त्या टोळीची बाजू घेऊन टणत्कारी लिहिणाऱ्यांनी आपल्या लेखनघाईत असल्या चुका करणे हे त्यांच्या अनभ्यस्तपणाचेच निदर्शक ठरते आणि ज्यांचे काहीच वाचन नाही, माहिती नाही अशांसाठी माहिती छापणाऱ्या वृत्तपत्रांसाठी लेखन करताना अशी चुकीची माहिती देणे हे बेजबाबदारपणाचे निदर्शक ठरते.
- मुग्धा कर्णिक,
संचालक, मुंबई विद्यापीठ
बहि:शाल शिक्षण विभाग.