गणितसूर्याचा अस्त Print

डॉ. श. अ. कात्रे, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
(लेखक पुणे विद्यापीठात गणित विभागप्रमुख आहेत.)

जागतिक कीर्तीचे गणितज्ञ प्रा. श्रीराम शंकर अभ्यंकर यांच्या निधनाची बातमी त्यांच्या नातेवाईकांनाच नव्हे तर गणित संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वानाच सुन्न करणारी आहे.  मुंबई विद्यापीठातून बीएससी पदवी संपादन केल्यावर ते अमेरिकेत गेले व हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी प्रा. झारिस्की यांच्याकडे संशोधन करून पीएच.डी. मिळविली.

त्यानंतर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, भारत, ऑस्ट्रेलिया येथील विविध विद्यापीठात व संशोधन संस्थांत त्यांनी काम केले आहे. इंडियाना, यूएसए मधील पडर्य़ू युनिव्हर्सिटीत प्राध्यापक म्हणून ते १९६३ पासून रुजू झाले. त्यानंतर १९६७ पासून शेवटपर्यंत मार्शल डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स या पदावर ते कार्यरत होते. याशिवाय १९८७ व ८८ पासून यांना प्रोफेसर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग व प्रोफेसर ऑफ कॉम्प्युटर सायन्स या अतिरिक्त जागाही मिळाल्या.

प्राध्यापक अभ्यंकरांचे गणित संशोधनातील स्थान अत्यंत वरच्या दर्जाचे आहे. अल्जेब्राइक जॉमेट्री या विषयात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल दिओदोने, हिरोनाका (फील्ड्स- मेडलप्राप्त) अशा विख्यात गणितज्ञांनी गौरवोद्वार काढलेले आहेत. प्रा. अभ्यंकरांचे १९० हून जास्त शोधनिबंध व पुस्तके जागतिक कीर्तीच्या संशोधन नियतकालिकात व इतरत्र प्रसिद्ध झाली आहेत. २८ विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डी. साठी मार्गदर्शन केले. त्यापैकी ११ भारतीय होते. प्रा. अभ्यंकरांनी अल्जेब्राइक सरफेसेस, फंडामेंटल ग्रुप्स, रेझोल्युशन ऑफ सिंग्युलॅरिटीज, जॅकोबियन प्रॉब्लेम, यंग ताब्लो, गॅल्वा ग्रुप ऑफ इक्वेशन्स, डायक्रिटिकल डिव्हायजरस अशा विविध विषयांवर संशोधन केले.
प्रा. श्रीराम अभ्यंकरांनी १९७६ साली ‘भास्कराचार्य प्रतिष्ठान’ या गणित विषयाला वाहिलेल्या संशोधन संस्थेची स्थापना केली. त्यामुळे पुण्यातील प्राध्यापकांचा व विद्यार्थ्यांचा गणिताच्या संशोधनाकडे ओढा वृद्धिंगत झाला. प्रा. अभ्यंकरांना मराठी व संस्कृत यांचे प्रेम होते. अमेरिकेत खूप वर्षे वास्तव्य असले तरी गेली कित्येक वर्षे वर्षांतून महिनाभर तरी ते भारतात येत असत. त्यांच्या पत्नी  या अमेरिकन असल्या तरी अस्खलित मराठी बोलत. मुले हरी व काशी यांचे शालेय शिक्षण भारतातच व्हावे यासाठी व भारतीय संस्कृतीची त्यांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी स्वत: भारतात वास्तव्य केले. या कालावधीत १९७८ ते १९८५ या वर्षांत त्यांनी पुणे विद्यापीठात गणित विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले. २०१० साली त्यांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यासाठी पुणे विद्यापीठ गणित विभाग व भास्कराचार्य प्रतिष्ठान यांनी आंतरराष्ट्रीय परिषद व कार्यशाळा आयोजित केली होती. या वर्षीही २२ ते २४ डिसेंबर  या कालावधीत प्रख्यात भारतीय गणिती रामानुजन यांच्या १२५ व्या जन्मवर्षांनिमित्त गणित विभाग ‘संशोधन परिषद’ आयोजित केली आहे. या परिषदेत व्याख्यान देण्याचेही प्रा. अभ्यंकरांनी मान्य केले होते. परंतु त्यांच्या अचानक निधनाने आता ते राहून गेले आहे.
प्रा. अभ्यंकर यांना गणिताचा मोठा ध्यास होता. जेव्हा मी गणिताचा विचार करतो तेव्हाच मी सर्वात सुखी असतो, असे ते म्हणत. गणिताची भारतात भरभराट व्हावी याची त्यांना आस होती. गणितातील अवघड व गुंतागुतीच्या प्रश्नांवर विचार करायचा तर त्यात सातत्य असणे व त्यासाठी शांतता असणे फार आवश्यक आहे. याची कल्पना असल्याने खूपदा त्यांची विद्यार्थ्यांबरोबर संशोधनविषयक चर्चा रात्री जेवणानंतर सुरू होई ती पहाटे दुसऱ्या दिवसाचा चहा घेऊनच संपे.
रामानुजन, हरिश्चंद्रा या गणितज्ज्ञांनी भारताचे नाव जगात अजरामर केले. याच काळात जागतिक स्तरावरील गणिताच्या संशोधनात प्रभाव पाडणाऱ्या भारतीय गणितज्ज्ञात उच्च स्थान मिळवणाऱ्या या गणितसूर्यास शतश: प्रणाम.