लोकमानस : गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२ Print

ही माणुसकी की देशाचे दुर्दैव?
मुंबई हल्ल्यातील पकडण्यात आलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबने विशेष न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत स्वत:ला फाशीच्या शिक्षेपासून वाचविण्यासाठी कायदेशीर लढा दिला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतरही कसाबने फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्याचे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून कळते. कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बातम्यांमध्ये म्हटले आहे की, कसाबला त्याच्या फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी पर्याय सुचवण्यात आले. तसेच त्याबाबत प्रक्रियाही समजावून सांगण्यात आली. याला काय म्हणावे, देशाचे दुर्दैव की कारागृहातील अधिकाऱ्यांची माणुसकी?
खरे म्हणजे देशावर अथवा देशाच्या कोणत्याही भागावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबसारख्या क्रूरकम्र्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार असूच नये. राष्ट्रपतींनीसुद्धा असे दयेचे अर्ज प्रलंबित न ठेवता फेटाळून लावावेत.
रफीक साखरकर, मुंब्रा, ठाणे.

तिथे गोबरगॅस,
सूर्यचूल नाही?
‘आनंदवनाचा आनंद गॅसवर’ हे वृत्त वाचले, आणि काहीसे आश्चर्य वाटले. आनंदवनात गोबर प्लांट किंवा सूर्य चुली वापरल्या जात नाहीत का? तिथे जे कार्य चालते त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. हा प्रश्न माझ्या मनात अगदी प्रामाणिकपणे उभा राहिला म्हणून हे पत्र.
अभय दातार, ऑपेरा हाउस, मुंबई

२०१४ सालीही संभ्रमावस्था?
‘उशिरा सुचलेले शहाणपण’ हा अन्वयार्थ व ‘टीम अण्णा : आंदोलनाची दिशा काय?’ हे उमेश स्वामींचे पत्र (दोन्ही २१ सप्टेंबर) वाचले. अरविंद केजरीवाल व अण्णा हजारे यांचे मार्ग वेगळे झाले. स्वामीनी उपस्थित केलेले मुद्दे सर्वसामान्य माणसाची तळमळ दर्शवतात. सर्वसामान्य माणसास भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर लढणारी टीम अण्णा भावली होती. पण याच टीमने स्वच्छ राहण्याच्या अट्टहासापायी मिळणारी मदत, कुमक नाकारत राहिले व स्वत:ची कार्यकर्ते फौज देशभरात नसताना मोठमोठय़ा वल्गना केल्या. दोनच वर्षांत हे सगळे आवाक्याबाहेरचे आहे व नेतृत्वाची चारी दिशांना वैचारिक ओढाताण होते आहे हे वास्तव समोर आले आहे. उपोषण काळात जमणारे हौसे, नवशे व (गवशेही!) गायब झाल्यावर पाठीशी चार दिशांना तोंडे असणारे निवडकच शिल्लक आहेत हे लक्षात येताच अण्णा व अरविंद यांनी आपले मार्ग वेगळे असल्याचे मान्य केले व एकमेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय पक्ष स्थापणे व चालवणे म्हणजे सध्या असलेल्या असंख्य (राष्ट्रीय, प्रादेशिक वगैरे) पक्षात एकाची भर इतकाच अर्थ जनता घेणार ही अण्णाना धास्ती, तर नुसत्या आंदोलनाने ‘साध्य’ (जनलोकपालाचे) केवळ मृगजळ ठरेल व पक्ष स्थापणे हाच पर्याय केजरीवालना अपरिहार्य वाटतो. या सर्वाचा राजकीय फायदा प्रस्थापित पक्ष उठविल्याशिवाय राहाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. १९६८ पासून संसदेत दहा वेळा येणारे लोकपाल विधेयक आणू शकणार नाही हेही सत्यच आहे. या विधेयकाचे मारेकरीच या नव्या पक्षाला पाचोळ्यासारखे उडवून लावतील वा महत्त्व देणार नाहीत, जे त्यांच्या सोयीचे आहे. तसेच या नव्या पक्षाचे ‘सहानुभूतीदार’ खूप मोठय़ा संख्येने असले तरी पक्ष वाढण्यासाठी जे ‘मार्ग’ चोखाळावे लागतात त्यांचे वावडे असल्यामुळे व कितीही चांगले विचार/ आदर्श असले तरी आपोआप रुजत नसल्याने हा नवा पक्ष शक्तिहीन राहील व आशा पल्लवित झालेल्या सर्वसामान्यांना संभ्रमावस्था अनुभवावी लागणार हे २०१४ साली उरणारे वास्तव आहे.
चंद्रशेखर परांजपे, दहिसर (प.)

सवलती बंद केल्याने प्रश्न सुटतील?
सगळेच अर्थतज्ज्ञ आíथक तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवत असतात; ते योग्यही असतात, त्याविषयी सुशिक्षित शंका घेत नाही; परंतु एकही अर्थतज्ज्ञ सरकारला   नॉन-प्लान खर्च कमी वा बंद करण्यास सांगत नाही. सर्वच राजकारण्यांची चनबाजीची राहणी आपल्या या गरीब देशाला परवडण्यासारखी नसताना पंतप्रधान कसे खपवून घेतात? शेवटी त्यांनीच या गोष्टींना आळा घालायला हवा. जनतेवर किती आíथक भार, बोजा टाकावयाचा याचे सर्वच नेत्यांनी भान ठेवावयास हवे. कनिष्ठ मध्यम आणि गरीब वर्ग आत्महत्या करण्याची भाषा बोलू लागल्याचे पत्र आहे, त्याचीही दखल ‘विजयपथ’सारखे अग्रलेख (२ ऑक्टो.) लिहिताना  घेतली पाहिजे. दुसरीकडे हजारो कोटींचे घोटाळे आहेतच. हे असेच चालू राहिले तर आíथक तूट सहाच काय १० टक्क्यांवरही जाईल. (या दृष्टीने डॉ. बिमल जालन यांचेो४३४१ी ऋ कल्ल्िरं  हे पुस्तक वाचण्याजोगे आहे.) नुसत्याच सवलती बंद करून हा आíथक तुटीचा प्रश्न सुटणार आहे का, हेही जनतेला  कळायला हवे, तर कदाचित ती काही दिवस महागाई सहनदेखील करेल.
अनिल जांभेकर. ठाणे.

गांधी आणि नवा पक्ष..
आजपर्यंत गांधी जयंतीच्या दिवशी अनेक शासकीय योजना जाहीर होताना पाहिलेल्या आहेत, पण यंदाच्या गांधी जयंतीला एक राजकीय पक्ष जाहीर होताना दिसत आहे. ज्या लोकांनी दुसऱ्या गांधींची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला त्याच लोकांना आज पक्षाची स्थापना करण्यासाठी खऱ्या गांधींचा आधार घ्यावा लागतो हा केवढा मोठा विरोधाभास? यांच्या गांधींनी यांना स्वत:चे नाव व फोटो वापरण्यास मज्जाव केला म्हणून हे लागलीच खऱ्या गांधींच्या फोटोला हार घालून व त्यांच्या विचारतत्त्वांवर आधारित आपला राजकीय पक्ष जाहीर करून मोकळे झाले, ही यांची गांधीगिरी.
यांचे गांधी यांच्यासाठीच अस्पृश्य झाले, पण खरे गांधी कोणालाही अस्पृश्य नव्हते आणि नाहीत म्हणूनच भारतातील प्रत्येक पक्षाने गांधींजींना आपापल्या सोयीनुसार वापरलेले आहे, पण खंत या गोष्टीची वाटते
की, समाजरचनेत गांधीजींना हवी असलेली सोय यातील एकाही पक्षाने केलेली नाही. यासाठी नवा पक्ष तरी अपवाद असावा आणि आजपर्यंत गांधी जयंतीच्या दिवशी जाहीर झालेल्या योजनांचे काय झाले तसे या नव्या पक्षाचे होऊ नये, हीच गांधीबाबांच्या चरणी प्रार्थना आणि पक्षस्थापकांना शुभेच्छा!
उमेश स्वामी, माटुंगा.