Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक
(२९ जुलै ते ४ ऑगस्ट २०१२)
मेष : खळबळ निर्माण होईल
सप्ताहाच्या प्रारंभी व्यवहारात काही खळबळ निर्माण करणाऱ्या घटना घडतील. त्यात रवी-बुध-मंगळ-राहू यांचा समावेश असल्याने प्रपंच आणि प्राप्ती, सामाजिक प्रतिष्ठा यामधील घडामोडी महत्त्वाच्या ठरतील. कोणतेही साहस करू नका. नियमित उपक्रम संयमाने सुरू ठेवा. शनिवारी शनीचे राश्यांतर होताच कार्यचित्र बदलू लागेल. त्यातून काही नव्या आशा निर्माण होतील. नवीन मार्ग दिसू लागतील. सफलतेसाठी श्रद्धा आणि सबुरी हाच मार्ग उपयुक्त ठरणारा आहे.
दिनांक : १ ते ४ आशा पल्लवित होतील.
महिलांना : थांबा, शोध घ्या, विचाराने पुढे चला, चांगले मार्ग निश्चित सापडतील.

वृषभ : कार्यभाग साधता येईल

राशिस्थानी गुरू, सप्तमात राहू, पराक्रमी सूर्य-बुध या ग्रहांमधील शुभ परिणाम कार्यभाग साधण्यास उपयुक्त ठरतील आणि मंगळवारच्या रवी-हर्षल-नवपंचम योगाच्या आसपास काही अवघड प्रकरणेही मार्गी लावता येतील. शुक्र राश्यांतर प्रयत्नांत उत्साह निर्माण करणार असल्याने प्राप्ती आणि प्रपंचात नवी प्रसन्नता निर्माण करू शकाल. आरोग्य सुधारेल, कृषी उपक्रमात यश मिळेल, शनिवारचे शनी राश्यांतर शत्रूंना प्रोत्साहन देऊ शकते एवढे फक्त लक्षात ठेवा. अचानक प्रवास होतील.
दिनांक : १ ते ४ शुभकाळ.
महिलांना : संसारातील नव्या घडामोडी आनंद देतील. समाजकार्यात चमकाल, रंगभूमी गाजवाल.

मिथुन : प्रगतीला प्रारंभ

नवीन सप्ताहाचा प्रारंभ नव्या आशा पल्लवित करणारा आहे. समस्यांच्या गर्दीतून बाहेर येण्यासाठी नवे मार्ग दृष्टिपथात येतील. त्यातून प्रयत्नात निर्धार आणि जिद्द समावेश करील. प्रारंभ मंदगतीने पण प्रगतीच्या दिशेने पावले टाकता येतील. मंगळवारी शुक्र राशिस्थानी येत आहे. शनिवारी शनीची अनिष्टता संपेल, अनुकूल रवी-बुध सहकार्य करतील. यातून आर्थिक, व्यावहारिक, सामाजिक, कलाविश्व या संबंधात नवे कार्यपत्रक तयार करता येईल. चतुर्थात मंगळ असेपर्यंत संसारात लक्ष ठेवा आणि षष्ठात राहू आहे. शत्रूंचे स्मरण ठेवा आणि पुढे चला.
दिनांक : ३०, ३१, ३, ४ शुभकाळ.
महिलांना : प्रश्न सुटू लागतील, नवा उत्साह निर्माण होईल, संधीचा झटपट उपयोग करा.

कर्क : समस्यांचा प्रवेश
कर्क व्यक्तींच्या कार्यवर्तुळामध्ये नव्या नव्या समस्यांचा प्रवेश होऊ लागेल. त्यातून निर्णयकृतीमधील पवित्रा संशयात सापडेल. मंगळवारचे शुक्र राश्यांतर, शनिवारी चतुर्थात येत असलेला शनी ही त्याची केंद्रस्थाने असली तरी शोध घेऊन प्रयत्नाला वेग देऊन नवी-जुनी मंडळी हाताशी धरून जमतील. तेवढी प्रकरणे मार्गी लावून टाका. रवी-हर्षल नवपंचम योग गुरुकृपा आपणास यश मिळवून देतील. चुका नको, गप्पा टाळा, प्रवास सफल होईल.
दिनांक : २९, १, २ येथील संधीचा उपयोग करा.
महिलांना : प्रगतीसाठी शिकस्तीचे प्रयत्न आवश्यक ठरतील.

सिंह : उपक्रम निश्चित कराल
साडेसाती शनिवारी संपणार आहे. त्याची पूर्वचिन्हे मंगळवारच्या शुक्र राश्यांतरातील प्रसन्नतेमधून दृष्टिपथात येतील. गुरूची अनुकूलता कार्यमार्ग निर्वेध करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. निरीक्षण आणि शोध यांचा उपयोग करून काही उपक्रमांचे वेळापत्रक निश्चित करता येईल. प्रतिष्ठितांची आश्वासनेही उत्साह निर्माण करतील. व्यापार, राजकारण, कलाप्रांत, अर्थप्राप्ती यातील सिंह व्यक्तींच्या उलाढाली गतिमान होतील.
दिनांक : ३०, ३१, ३, ४ शुभकाळ.
महिलांना : प्रश्न सुटू लागतील, प्रयत्नांचा वेग वाढवा.

कन्या : साडेसाती संपली
साडेसातीचा शनी अखेरच्या वर्तुळात प्रवेश करीत आहे. त्यातील अशुभ परिणामही बरेच कमी होत असल्याने कन्या व्यक्तींच्या विचारात, कृतीत नवा उत्साह निर्माण होईल. त्याचा प्रारंभ मंगळवारच्या शुक्र राश्यांतरापासून होऊ शकेल. रवी-हर्षल नवपंचम योग अनपेक्षित संधीतून आपणास नोकरी, धंदा, राजकारण, शेती या विभागांत पुढे घेऊन जाणार आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन प्रसन्न घटनांचे ठरतील. नवीन कार्याची रूपरेखाही ठरवता येईल.
दिनांक : २९, १, २ शुभकाळ.
महिलांना : पुढे चला, मार्ग सापडतील, यश मिळेल.

तुला :  संधीचा उपयोग करा
सूर्य, बुध, राहू यांचे अनुकूल परिणाम मंगळवारी भाग्यात येत असलेल्या शुक्रामुळे अधिक पक्के, व्यापक होतील. साडेसातीचे खडतर पर्व शनिवारी संपत असल्याने नजीकच्या काळात तूळ व्यक्तींचे उपक्रम यशस्वी ठरण्याची शक्यता वाढलेली आहे. रवी-हर्षलाचा नवपंचमयोग त्यासाठी संपर्क संबंधातून नव्या संधी समोर आणू शकतो. गुरू-अष्टमात व्ययस्थानी मंगळ असल्याने संधीमुळे हुरळून जाऊ नका. प्रत्यक्ष कृतीसाठी त्याचा उपयोग करा.
दिनांक : ३०, ३१, ३, ४ शुभकाळ.
महिलांना : नवे मार्ग सापडतील, प्रयत्न सोडू नका.

वृश्चिक : पूर्वसूचनांचा फायदा
साडेसातीचे पर्व शनिवारपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी अष्टमात शुक्राचा होणारा प्रवेश म्हणजे काही अशुभ घटनांची पूर्वसूचना; परंतु गुरूची अनुकूलता, भाग्यात रवी-बुध आणि रवी-हर्षलाचा नवपंचम योग पूर्वसूचनांच्या आधाराने व्यवहारातील महत्त्वाच्या क्षेत्रात संरक्षण योजनांची निर्मिती सोपी होईल. कार्यभाग साधणारी नवीन योजनाही तयार करू शकाल. त्याचा लाभ साडेसातीत प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी सतत होणार आहे.
दिनांक : ३० ते २ शुभकाळ.
महिलांना : समस्यांवर विजय मिळवता येईल. चुका मात्र करू नका.

धनू : समीकरणे बाहेर येतील
गुरूची नाराजी, अष्टमात सूर्य-बुध या काळात समीकरणे अडचणीत असतात, परंतु मंगळवारी शुक्र राश्यांतर होईल. शनिवारी शनीचे लाभात आगमन घडेल आणि काही समीकरणे अडचणीतून बाहेर पडू लागतील. त्यातून प्रयत्न हुशारीत उत्साह प्रकटेल. त्याचा परिणाम अर्थप्राप्ती, सामाजिक चळवळी, कृषी कार्ये, शिक्षण मार्ग यामध्ये फायदेशीर होईल. आरोग्य, अधिकार, उपद्रवी, शत्रू यांच्यावर मात्र लक्ष ठेवा. नारळी पौर्णिमा प्रसन्न घटनांची ठरेल.
दिनांक : ३०, ३१, ३, ४ शुभकाळ.
महिलांना : अपेक्षित यश मिळवता येईल. पुढे चला.

मकर : बदल गतिमान होईल
गुरूची कृपा, सूर्य-बुध अनुकूल, लाभात राहू यातून मकर व्यक्तींना आपली अनेक प्रकरणे पुढे घेऊन जाता येतील. मंगळवारच्या रवी-हर्षल नवपंचम योगापासून अनपेक्षित होत राहणारे बदल त्यात गतिमानता आणतील आणि शनिवारी शनीचा प्रवेश दशमात होताच अल्पावधीत प्रतिष्ठेला संरक्षण देता येईल. एवढे यश मिळवू शकाल. शासकीय नियम, आश्वासन, ठरवलेले मार्ग यात कोणतेही बदल नको. शेतीत सफलता, व्यापार पैसा देईल, बौद्धिक प्रगल्भता, नवी प्रतिमा तयार करील.
दिनांक : १ ते ४ शुभकाळ.
महिलांना : कुचंबणा संपेल, विवंचना दूर होतील, प्रभाव निर्माण कराल.

कुंभ : चिंता नको, पुढे चला
शुक्र-शनीचे राश्यांतर कुंभ राशी कुंडलीचे आकर्षण आहे. नजीकच्या काळात कार्यवर्तुळात उमटणारे प्रतिसाद नव्या योजना निश्चित करण्यास उपयुक्त ठरतील. कृषी प्रयोगातील यश, व्यापारी नवे तंत्र, राजकीय समीकरणे यातून प्रतिमा उजळत राहणार आहे. चतुर्थातील गुरू-केतू सहयोगात परिवारातील प्रश्न अडकतील, पण चिंता नको. त्यावरही मार्ग शोधू शकाल. अर्थप्राप्ती मजबूत करण्यासाठी अनुकूलता उपयोगात आणा. परदेशी प्रवास संभवतात.
दिनांक : ३०, ३१, ३, ४ शुभकाळ.
महिलांना : पेचप्रसंग मिटतील, प्रगतीचा आनंद मिळेल.

मीन : धास्ती नको, यश मिळवा
गुरू पराक्रमी, मंगळवारचे शुक्र राश्यांतर, रवी-हर्षलाचा नवपंचम योग नियमित उपक्रमात या ग्रहांचे शुभ परिणाम यश मिळवून देतील. व्यवहारातील इभ्रत सांभाळली जाईल. बौद्धिक वर्तुळातील आपली छाप कायम ठेवता येईल. अष्टमात येत असलेल्या शनीची धास्ती सध्या नको. राखीपौर्णिमा प्रसन्नता देणारी आहे. रवी-गुरू शुभयोगात अर्थप्राप्ती वाढते. प्रतिष्ठितांचे सहकार्य मिळते. उपासना, आराधना, रवी-हर्षल नवपंचम योगामुळे चमत्कारातून श्रद्धा शक्तींना संघटित करणार आहे.
दिनांक : ३० ते २ शुभकाळ.
महिलांना : सूर्य, बुध, शुक्र व्यवहार आणि परिवारात महिलांचा प्रभाव निर्माण करतील.