Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, २ सप्टेंबर २०१२
२ ते ८ सप्टेंबर २०१२
मेष : स्मरण ठेवा, यश मिळेल
पंचमात सूर्य, चतुर्थात शुक्र, गुरूची कृपा यांच्याच सहकार्याने बराच कार्यभाग साधता येणे शक्य आहे. शनी-मंगळ सहयोगातून संभ्रम निर्माण होतो तेव्हा अचूक अंदाज येईपर्यंत कृती करू नये. शनिवारच्या चंद्र-गुरू युतीपर्यंत याचे विस्मरण नसावे. त्यामुळे प्रतिष्ठेला कसलाही स्पर्श होणार नाही. उपासना, आराधना सत्कारणी लागेल. परिवारातील जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. विज्ञान आणि विद्वत्ता यातून प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी बुध-मंगळ शुभयोग उपयुक्त ठरेल.
दिनांक : ४ ते ७ शुभकाळ.
महिलांना : समस्या सुटतील. चिंता दूर होतील.
वृषभ : प्रश्नांमधून व्यत्यय
चतुर्थात सूर्य-बुध, षष्ठात शनी-मंगळ व्यवहारातील नवे नवे प्रश्न प्रवासात व्यत्यय आणतात. त्यामुळे संधी हुकण्याचा, यश सटकण्याचा संभव असतो. गुरू, शुक्राची अनुकूलता इभ्रत सांभाळण्यात उपयुक्त ठरते. हवामानाचा रागरंग बघूनच कार्यक्रमाचे स्वरूप ठरवावे. भेटी, चर्चा, संपर्क, नवे करार, दूरचे प्रवास, व्यापारी तेजी-मंदी यांचा समावेश त्यात ठेवावा. आरोग्याची काळजी घ्यावी. अटीतटीच्या प्रसंगी सत्य आपले निश्चित संरक्षण करील.
दिनांक : २, ३, ७, ८ शुभकाळ.
महिलांना : अडचणी, अडथळे यांच्याशी शर्यत करूनच मार्ग काढावे लागतील.
मिथुन : प्रकरणे पुढे सरकतील
गुरू, राहू, केतू यांची अनिष्टता कार्यपथावरील प्रवासात व्यत्यय निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. सूर्य, बुध, शुक्र सहकार्य करतील. त्यामुळे नियमित उपक्रम सुरू ठेवता येतील. बुधवारच्या बुध-मंगळ शुभयोगाच्या अनपेक्षितपणे काही प्रकरणे पुढे सरकतील. आश्वासन उत्साह निर्माण करतील, परंतु वाहनांचा वेग, आरोग्यावरचे उपचार, बैठकीतील चर्चा या संबंधात कोणतीही चूक करू नका. देवधर्म आनंद देणारा ठरेल.
दिनांक : २ ते ५ शुभकाळ.
महिलांना : संयम आणि प्रतीक्षा, परिश्रम कारणी लागतील.
कर्क : यश देणारा काळ
राशिस्थानी शुक्र, पंचमात राहू, लाभात गुरू, सिंह, बुध यांच्यातील परिणाम कर्क व्यक्तींच्या उलाढालींना यश मिळवून देण्यास उपयुक्त ठरतील. चर्चा आणि तडजोडीच्या प्रकरणात माघार घेऊ नका. प्रश्न प्रतिष्ठेचे करू नका. चतुर्थातील शनी-मंगळ सहयोगाचे अनिष्ट प्रतिसाद नियंत्रित करता येतील. त्यामुळे उलाढालीतले धोके कमी होतील. शनिवारची चंद्र-गुरू युती नोकरी, उद्योग, शेती यामध्ये कार्यभाग साधण्यास उपयुक्त ठरेल.
दिनांक : ३ ते ७ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नाने प्रपंच आणि आर्थिक समस्या सोडवता येतील.
सिंह : साहसाने सफलता नाही
राशिस्थानी सूर्य-बुध, दशमात गुरू नियमित उपक्रम, कार्यवर्तुळात असलेली प्रतिमा यांच्या संरक्षणासाठी या ग्रहांचे परिणाम उपयुक्त ठरतील, परंतु साहसाने सफलता मिळेल, व्यवहारात घबाड हाती येईल अशा कल्पनांना शनी-मंगळ सहयोगातील काही परिणाम चतुर्थात राहू, व्ययस्थानी शुक्र सतत अडचणीतच ठेवतील. परिवारातील असंतोष, अर्थप्राप्तीचे काही मार्ग यांचा समावेश त्यात होईल. वाहन जपूनच चालवा. बुध-मंगळ शुभयोगातील अनुकूलता युक्तीयुक्तीने उपयोगात आणा.
दिनांक : ४ ते ८ शुभकाळ.
महिलांना : संयम आणि परिश्रमातून बरीच प्रकरणे मार्गी लावता येतील.
कन्या : प्रतीक्षा प्रगतीची
साडेसातीची तीव्रता शनीच्या सहवासातील मंगळामुळे वाढते. सूर्य, बुध व्ययस्थानी असल्याने व्यवहारात प्रतीक्षाच प्रगतीसाठी उपयुक्त ठरणारी आहे. गुरू, शुक्र, राहू यांची अनुकूलता शिक्षण, कला, धार्मिक उपक्रम यातून आनंद मिळवून देतील. नवीन संपर्क अवघड समस्यांना अनुकूल कलाटणी देतील. शनिवारच्या चंद्र-गुरू युतीचे शुभ परिणाम स्थगित योजना, आरोग्यावरील उपचार, व्यापारी देवघेव यातून कार्यसिद्धीवर होतील.
दिनांक : २, ३, ७, ८ शुभकाळ.
महिलांना : कार्यचित्र आकर्षक करता येईल.
तूळ : गर्दीतून आव्हान
राशिस्थानचा शनी-मंगळ सहयोग आणि अष्टमात गुरू, केतू व्यवहारात समस्यांची गर्दी करणारी ग्रहस्थिती काही प्रांतांत प्रतिष्ठा आणि प्रगती यांना आव्हान देऊ शकते. सिंह, सूर्य, प्रसन्न बुध, शुक्र प्रयत्नातील उत्साह कमी होऊ देणार नाही. बरीचशी आक्रमणे हुशारीने रोखता येतील. बुधवारच्या बुध-मंगळ शुभयोगाच्या आसपास त्याची प्रचीती यावी. सत्य, संयम, शिस्त यांचा समन्वय शनिवापर्यंत संरक्षणासाठी उपयुक्त ठरणारा आहे.
दिनांक : ४, ५, ६ शुभकाळ.
महिलांना : थांबा, बघा, जमले तरच पुढे चला.
वृश्चिक : कटकटीचा काळ
साडेसातीची तीव्रता कार्यप्रांतात सातत्याने कटकटी निर्माण करणारी आहे. सूर्य, बुध, गुरू, शुक्र यांची अनुकूलता असल्याने कार्यपथावरील प्रवास कटकटी असूनही पूर्ण करता येईल. वेळापत्रकात छोटे-मोठे बदल फक्त करावे लागतील. आर्थिक नियोजन, शासकीय नियम, उपक्रमांचे स्वरूप यामध्ये शिस्त आवश्यक राहील. आरोग्य सांभाळा, वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवा. स्पर्धा नको.
दिनांक : ४ ते ८ शुभकाळ.
महिलांना : अडचणीतून यश मिळवता येईल.
धनू : साहस, स्पर्धा नको
भाग्यातील सूर्य, बुध हीच स्वच्छ सहकार्य करणारी ग्रहस्थिती. त्यात शनी, मंगळातील काही शुभ परिणाम समावेश करतील. त्यामुळे नियमित उपक्रम तरी आपणास सुरू ठेवता येतील. साहसी योजना, स्पर्धा, सावकारी, शासकीय प्रकरण यापासून शक्य तेवढे दूर राहणे योग्य ठरेल. अधिकारी, सहकारी ऐन वेळी मदत करतील. त्यामुळे नोकरीतील प्रतिष्ठा, व्यापारी उलाढालीत स्थिर राहू शकाल. उपासना-आराधना अशा काळात प्राणवायूसारखी उपयुक्त ठरते.
दिनांक : ४, ५, ६ शुभकाळ.
महिलांना : रागरंग बघून कार्यभाग साधा.
मकर : विस्मरण नको, यश मिळेल
गुरू, शुक्र, शनी, मंगळ यांच्यातील प्रतिक्रिया शिकस्तीच्या प्रयत्नाने आणि हुशारीनेच कारणी लावता येतील. व्यवहारातील आश्वासन, नियम, चर्चा यांचे विस्मरण नको. अष्टमातील सूर्य, बुधाचा त्रास त्यामुळे कमी होईल. सामोपचाराने मिटणारी प्रकरणे निष्कारण धुमसत ठेवू नका. शेतीकार्यात यश, राजकीय प्रतिष्ठा वाढेल, अर्थप्राप्ती निर्वेध व्हावी. बाजारातील तेजी-मंदीचा लाभ झटपट      उठवायला हवा.
दिनांक : २, ३, ७, ८ शुभकाळ.
महिलांना : सरळ मार्गाने स्वच्छ यश मिळेल.
कुंभ : नवीन संबंध प्रगतीकारक
भाग्यातील शनी, मंगळातील अनुकूल प्रतिसाद, सप्तमात सूर्य, बुध यातून महत्त्वाचे प्रश्न सुटतील. अनपेक्षित नवीन व्यक्ती आणि संस्थांशी संबंध येतील. त्यातून प्राप्तीचा नवा प्रवाह निर्माण करणे शक्य होईल. दशमातील राहू त्यात सहकार्य करतील. बुध-मंगळ शुभयोगातून यश व्यापक बनते. गुरू-केतू चतुर्थात असल्याने परिवारातील शांती सांभाळावी लागेल. अपरिचितांशी व्यवहार नको.
दिनांक : २ ते ५ शुभकाळ.
महिलांना : अंदाज अचूक ठरतील. यश व्यापक होईल.
मीन : वाद, अपघात टाळा
गुरू, शुक्र, राहू यांचे सहकार्य हीच मीन व्यक्तींच्या प्रतिष्ठेचा आधार आहे. अष्टमातील शनी, मंगळ वादाचे रूपांतर वादळात आणि वेगाचे रूपांतर अपघातामध्ये करू शकतात. शनिवापर्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या सर्वच उलाढालींत शनिवापर्यंत गुप्तता ठेवणे आवश्यक राहील. परिवारातील प्रश्न सुटतील. भागीदारीतील प्रकरणे मिटतील. शासकीय प्रकरणात मात्र चुका करू नका.
दिनांक : ३ ते ७ शुभकाळ.
महिलांना : सफलता देणारा शुभकाळ आहे.