Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, ९ सप्टेंबर २०१२
९ ते १५ सप्टेंबर २०१२
मेष : उपक्रम सुरू राहतील
सूर्य, गुरू, शुक्र यांच्यातील शुभ परिणाम नियमित उपक्रम सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील. शनी, मंगळातील काही परिणाम अष्टमात राहू आणि बुधाचे राश्यांतर संशयातून सफलता अवघड करू शकतात. शनिवापर्यंत सतर्क राहून गोड बोलून कार्यभाग साधावा. शुक्र-हर्षलाचा नवपंचम योग अनपेक्षित काही घटनांना अनुकूल कलाटणी देईल. यामुळे व्यापार, परिवार, प्राप्ती समस्यांच्या गर्दीतून बाहेर येतील. प्रवास आनंद देईल.
दिनांक : १०, ११, १४, १५ शुभकाळ.
महिलांना : सरळ मार्गाने यश मिळवता येईल. कला, साहित्यात चमकाल.
वृषभ : हवामान बघा, पुढे चला
शनि, मंगळ सहयोग शत्रूंना प्रोत्साहन देतो. खाण्या-पिण्यातील बदल आरोग्य दूषित करू शकतात. हवामान बघून कार्यस्वरूप ठरवणे योग्य. चतुर्थातील रवी प्रपंचात तणाव निर्माण करतो. वृषभ व्यक्तींना गुरू, राहूचे सहकार्य मिळणार. प्रसन्न शुक्राची अनुकूलता पंचमात येत असलेला बुध यातून ठरवलेले कार्यस्वरूप यश देईल. व्यापारात प्रश्न सुटतील. रंगभूमी व्यासपीठावर चमकाल. पैसा मिळेल. खात्रीशिवाय मिळालेल्या माहितीच्या आधारावर साहस मात्र नको.
दिनांक : १० ते १३ शुभकाळ.
महिलांना : सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात चमकाल. घरात तोंड बंद करा.
मिथुन : संयम हुशारीने यश
व्ययस्थानी गुरू, अनिष्ट राहू-केतू, चतुर्थात येत असलेला बुध प्रत्येक निर्णय हुशारीने घ्यावा आणि प्रत्येक शब्द जपून वापरावा. कृतीमध्ये संयम असावा. यातूनच आपल्या प्रतिष्ठेचे संरक्षण मजबूत राहू शकते. गुरुवारच्या शुक्र हर्षल नवपंचम योगाच्या आसपास अनपेक्षित महत्त्वाची प्रकरणे समस्यांच्या गर्दीतून बाहेर येतील. पराक्रमी सूर्य, पंचमातील शनी, मंगळातील थोडे चांगले परिणाम यांचा आधार संधी साधण्यास उपयुक्त ठरतो.
दिनांक : १० ते १५ येथील शुभ चंद्रभ्रमणाचाही उपयोग होईल.
महिलांना : प्रतीक्षा आणि प्रयत्न प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील. पुढे याल.
कर्क : यशस्वी ग्रहकाळ
लाभात गुरू, पंचमात राहू, सिंह, सूर्य आणि कन्या राशीत प्रवेश करणारा बुध या ग्रहांचे परिणाम प्रपंच ते प्राप्ती आणि शिक्षणात विदेश प्रवास यात सार्थकी प्रयत्नातून आपणास नव्या उत्साहाचा पुरवठा करतील. शुक्र, हर्षलाचा नवपंचम योग दिव्य-भव्यता त्यात निर्माण करू शकतो. चतुर्थातील शनी, मंगळाचे परिणाम तणाव निर्मितीच्या पुढे सरकू शकणार नाहीत. कला, साहित्यात चमकाल. आरोग्यावर रामबाण औषध सापडेल.
दिनांक : १२ ते १५ शुभकाळ.
महिलांना : अपेक्षित यशाचा आनंद मिळेल, नवीन जागा, नोकरी याचा समावेश त्यात राहील.
सिंह : व्यवहार संभ्रमात
सूर्य, गुरू, बुध अशा ग्रहांची अनुकूलता नियमित उपक्रमाची आधार असते. त्यातून प्रतिष्ठा सांभाळली जाते. व्यवहारातील पेचप्रसंग सोडवता येतात. शनी, मंगळ सहयोग, व्ययस्थानी शुक्र, चतुर्थात राहू यांच्या परिणामांनी व्यवसायातील काही गणिते संभ्रमात सापडतात. अचूक अंदाज येईपर्यंत कृती नको. मिळणारा पैसा, प्रतिष्ठितांचे सहकार्य, नवे परिचय, व्यापारात तेजी-मंदी यातून प्रयत्नात नवा उत्साह निर्माण होईल, प्रवास कारणी लागतील.
दिनांक : १०, ११, १४, १५ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नाने कार्यभाग साधता येईल, संसाराची घडी बसेल, प्रवास होतील.
कन्या : सोपी प्रकरणे यशस्वी ठरतील
भाग्यात गुरू, पराक्रमी राहू, लाभात शुक्र, गुरुवारचे बुध राश्यांतर याच ग्रहांचे प्रतिसाद, साडेसाती, शनी-मंगळ सहयोग, व्ययस्थानी रवी यांच्यामुळे अवघड झालेली काही प्रकरणे सोपी होतील. प्रयत्नाला वेग देऊन कार्यमार्गात थोडा बदल केला तर गुरुवारच्या शुक्र हर्षल नवपंचम योगाच्या आसपास सोपी प्रकरणे निर्दोष यशापर्यंत पोहोचू शकतील. व्यापारपेठ, राजकीय चळवळ, कलाप्रांत, अर्थप्राप्ती यांचा समावेश राहील. कार्यमार्गात बदल करताना अवघड वळणावर मात्र सावध राहा.
दिनांक : १० ते १३ यश देणारा काळ आहे.
महिलांना : संयम, शिस्त यांचा उपयोग करा. सामोपचाराने प्रश्न मिटतील.
तुला : संशय राहतील
राशीस्थानी शनी-मंगळ सहयोग असेपर्यंत कार्यवर्तुळातील भ्रमंतीमध्ये संशय राहणारच आहे. चर्चा, भेटी, बैठकी यांमध्ये तर विश्वासातील मंडळी ऐनवेळी दगाफटका करू शकतात. राहूची अनुकूलता सूर्य, शुक्र अनुकूल असल्याने प्रतिष्ठेला कशाचाही धक्का बसू शकणार नाही. कलाप्रांत, आर्थिक देवघेव, राजकीय समीकरणात निर्णय घेण्यास विलंब नको. शुक्र, हर्षलाचा नवपंचम योग जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास सहकार्य करणारा आहे.
दिनांक : १० ते १४ त्यामुळे येथे यश मिळेल.
महिलांना : प्रपंचातील प्रश्न सुटतील. कला, साहित्यात चमकाल.

वृश्चिक : समन्वय सोपा
राशीस्थानी राहू, सप्तमात गुरू आणि सूर्य, बुध, शुक्र यांच्यातील शुभ परिणाम प्रयत्न प्रगतीचा समन्वय साधण्यास उपयुक्त ठरतील. हवामानाचा अंदाज अचूक ठेवा, यश निश्चित होईल. शनि, मंगळाच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवता येईल. गुरुवारच्या शुक्र, हर्षल नवपंचम योगाच्या आसपास अवघड क्षेत्रात चकित करणारे यश मिळवू शकाल. त्यातून बौद्धिक प्रगल्भता प्रभाव प्रस्थापित करील. विदेश प्रवास ठरवू शकाल.
दिनांक : १२ ते १५ शुभकाळ.
महिलांना : समस्या दूर करून निर्दोष यश मिळवता येईल, त्यातून प्रतिष्ठा वाढेल.
धनू : उपक्रम सुरू राहतील
सूर्य, बुध अनुकूल असल्याने ठरवलेल्या मार्गावरील उपक्रम सुरू ठेवता येतील. अनिष्ट राहू, केतू, नाराज गुरू, शुक्र यांचा उपक्रमातील प्रवेश दूर ठेवण्यासाठी संयम, प्रार्थना यांचा उपयोग करा. शनी, मंगळातील काही परिणाम ऐनवेळी मदत करतील. त्यातून शब्दशक्तीचा प्रभाव वाढेल. आर्थिक प्रश्न, प्रापंचिक तणाव यांमधून आपली त्यामुळे थोडीतरी मुक्तता होईल. परिचितांच्या सहकार्याने व्यापारी घडी बसवू शकाल. अवघड वळणावर सावध राहा.
दिनांक : १०, ११, १४, १५ शुभकाळ.
महिलांना : जबाबदाऱ्या आणि उपक्रम यांचा समन्वय कार्यभाग साधण्यास उपयुक्त ठरेल.
मकर : उपक्रम परदेशात
गुरू, राहू, शनी, मंगळ यांच्यातील प्रतिक्रिया मकर व्यक्तींचा प्रभाव अनेक क्षेत्रांत व्यापक करणार आहे. शिक्षण ते कलाप्रांत, परिवार ते व्यवहार आणि समाज ते राजकारण यांमध्ये त्याचा प्रत्यय रविवारच्या चंद्र, नेपच्यून नवपंचम योगापासूनच येत राहील. गुरुवारच्या शुक्र, हर्षल नवपंचम योगाच्या आसपास काही प्रांतांत मोठी मजल मारता येईल. अधिकारी, सहकारी मदत करतील, उपक्रम परदेशातही पोहोचवता येतील. धर्मकार्यातून आनंद मिळेल.
दिनांक : ९, १२, १३ शुभकाळ.
महिलांना : चकित करणारे यश मिळणार आहे.
कुंभ : रागरंग बघा, पुढे चला
सूर्य, राहूची अनुकूलता इभ्रतीला आधार देणारी असली तरी चतुर्थात गुरू, केतू, शनी, मंगळ सहयोग यांचा पर्वकाळ सुरू असेपर्यंत साहसी कृती आणि अवास्तव अपेक्षा यांच्यापासून दूर राहणेच योग्य ठरेल. नोकरी, धंदा, राजकारण, कलाप्रांत यात रागरंग बघून कार्यभाग साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवा. गुरुवारी अष्टमात येणाऱ्या बुधामुळे आश्वासन आणि अंदाज यातून फसवणूक होणे शक्य आहे. देवाची प्रार्थना काळजीचे काही प्रसंग निश्चित दूर करणारी ठरेल.
दिनांक : १०, ११, १४, १५ येथे त्याची प्रचीती यावी.
महिलांना : कष्टाने कृती पूर्ण करावी लागेल. पुढे यश मिळेल.
मीन : घातपाताचा संभव, सावध राहा
गुरूची अनुकूलता, बुध, शुक्र प्रसन्न, राहूचे सहकार्य या ग्रहांमधून मीन व्यक्तींना व्यवहारांत अधिकाधिक संधी साधता येतील. काही विभागांत स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करू शकाल. परंतु अष्टमातील शनी, मंगळ घातपात करण्यात पटाईत असल्याने शनिवापर्यंत गुप्तता ठेवणे, सतर्क राहणे आवश्यक ठरेल. गुरुवारच्या शुक्र हर्षल नवपंचम योगाचा लाभ त्यामुळे निश्चित करता येईल, व्यापक बनवता येईल. कलाप्रांत, अर्थप्राप्ती यात अग्रेसर राहता येईल.
दिनांक : ९, १२, १३ शुभकाळ.
महिलांना : यशासाठी चर्चेपेक्षा वेगवान कृती उपयुक्त ठरेल. प्रवास कराल.