Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक : रविवार, १६ सप्टेंबर २०१२
१६ ते २२ सप्टेंबर २०१२
मेष : सतर्क राहा, कार्यभाग साधा
शनी, मंगळ सहयोगातील प्रतिसाद संमिश्र असतील. अनुकूल गुरू शुक्राचा आधार उपक्रम सुरू ठेवण्यास उपयुक्त ठरणार आहे. षष्ठात येणारा सूर्य शत्रूंची कोंडी करतो. त्याचा लाभ काही प्रांतात करून घेता येईल. सतर्क राहा आणि कार्यभाग साधा हाच मंत्र शनिवापर्यंतच्या प्रवासात उपयुक्त ठरणार आहे. श्री गणेश चतुर्थी प्रसन्न घटनांची आहे. शुक्र, गुरू शुभयोगातून बरीच प्रकरणे पुढे सरकवता येतील. प्रवास कराल.
दिनांक : १८, १९, २० शुभ काळ.
महिलांना : निर्दोष यशासाठी शिस्तीचे प्रयत्न करावे लागतील.

वृषभ : प्रयत्नातून यश
षष्ठातील शनी मंगळाच्या प्रतिक्रिया आपल्या कार्यप्रांतात वादग्रस्त प्रकारांचीच अधिक निर्मिती करतील. त्यात प्रपंच, आर्थिक देवघेव, भागीदारीतील प्रकरणे, अधिकारातील स्पर्धा यांचा समावेश राहतो आणि आरोग्यही बिघडते. परंतु गुरू-राहूची अनुकूलता, पंचमात बुध, रविवारचे सूर्य राश्यांतर आणि शुक्र-गुरूचा शुभयोग यांच्या शुभ परिणामांमुळे प्रयत्न हुशारीच्या समन्वयातून वादग्रस्त प्रकरणे नियंत्रणात आणता येतील. त्यामुळे अनेक प्रसंगातील गंभीरता दूर होईल.
दिनांक : १६, १७, २१, २२ शुभ काळ.
महिलांना : विचलित होऊ नका, यश मिळेल.

मिथुन : प्रश्न गर्दी करतील
व्ययस्थानी गुरू केतू, चतुर्थात बुध त्यात रविवारी रवीचा प्रवेश प्रश्नांमधून प्रश्न निर्माण करणारी ग्रहस्थिती कार्यप्रांतात परीक्षेचे अनेक प्रसंग आणू शकते. शनी मंगळाचे सहयोगातील सहकार्य संशयास्पद असते, परंतु शुक्राची प्रसन्नता आपणास निराश होऊ देणार नाही. त्यातून नियमित कार्यचक्र फिरवत ठेवता येईल. त्यात गोड बोलून संधी साधणारे तंत्र अधिक उपयुक्त ठरेल. त्यात शुक्रवारच्या शुक्र गुरू शुभयोगाचे सहकार्य महत्त्वाचे ठरते.
दिनांक : १८ ते २० शुभ काळ.
महिलांना : अवघड प्रसंगात सावध राहा.

कर्क : बदल करू नका
सूर्य, बुध, गुरू, शुक्र अशा समर्थ ग्रहांचे सहकार्य घेऊन सुरू असलेला प्रवास शुक्रवारच्या शुक्र-गुरू शुभयोगाच्या आसपास वेगवान होणारा आहे. त्यामध्ये चतुर्थातील शनी, मंगळ व्यत्यय आणण्याचा खटाटोप करतील, परंतु विचलित होऊन कार्यमार्ग आणि निर्णय यात बदल करू नका. शेती, व्यवसाय, शिक्षण, राजकीय यश यामधील ग्रहपरिणाम दूषित होणार नाहीत. आरोग्य आणि परिवारातील प्रश्न या संबंधात मात्र लक्ष ठेवा.
दिनांक : १६, १७, २१, २२ शुभ काळ.
महिलांना : अल्पशा विलंबाने अस्वस्थ होऊ नका. परिश्रम वाढवा, यश निश्चित मिळेल.

सिंह :परिश्रमातून आनंद
सूर्य, बुध, गुरू यांचे सहकार्य सफल परिश्रमाचा आनंद मिळवून देतील. त्याचा प्रारंभ रविवारच्या सूर्य राश्यांतरापासून प्रत्ययास येत राहील. श्री गणेश चतुर्थी नवीन उपक्रमांची रूपरेषा ठरवण्यास उपयुक्त ठरणारी आहे. शनी-मंगळाच्या सहयोगातही प्रखरता नसेल. संधीचा झटपट उपयोग करून केलेली कृती अपेक्षित यशासाठी उपयुक्त ठरेल. प्रवास होतील, नवे परिचय वाढतील, महत्त्वाच्या उपक्रमांना वेग देता येईल. आर्थिक प्रकरणे मार्गी लागतील.
दिनांक : १६ ते १९ शुभ काळ.
महिलांना :  अपेक्षित सफलता देणारा शुभ काळ आहे.

कन्या : योजना वेग देतील
रविवारी सूर्य राश्यांतर होत आहे. शुक्रवारी शुक्र-गुरूचा शुभयोग होईल. यातील परिणाम कन्या व्यक्तींच्या अधिकाधिक योजना वेगवान करतील. श्री गणेश चतुर्थीमधून नवीन कार्यचित्र निर्मितीसाठी स्फूर्ती लाभणार आहे. त्यातून बऱ्याच महत्त्वाच्या समस्या सोडवून घेता येतील. समाज, संपर्क, अर्थप्राप्ती, व्यापारी उलाढाल, आकर्षक खरेदी, महत्त्वाच्या बैठकी यात कन्या व्यक्ती प्रसन्न राहतील. संयम आणि प्रार्थना, शनी मंगळातील दूषित परिणाम कमी करतील.
दिनांक : १६, १७, २१, २२ शुभ काळ.
महिलांना : ग्रहांचे परिणाम प्रगतिपथावरून पुढे पुढे घेऊन जाणार आहेत.

तुला : आव्हानांचा काळ
साडेसातीच्या काळात शनी-मंगळ एकत्र आणि रविवारी सूर्य व्ययस्थानी येणार आहे. नवे प्रश्न, नवी आव्हाने यातून समोर येत राहतील. त्यांच्याशी सामना करताना चुका टाळा. गुरूची कृपा, शुक्राची प्रसन्नता आणि शुक्र, गुरू शुभयोग प्रतिष्ठा सांभाळणारी सफलता मिळवून देतील. श्री मारुतीची उपासना, आराधना, आपत्तीवर नियंत्रण ठेवणारी बुद्धी देईल. स्तुतिपाठकांपासून दूर राहिलात, तर यश अधिक निश्चित होईल.
दिनांक : २०, २१, २२ शुभ काळ.
महिलांना : साहस आणि संघर्ष टाळा, संधी सफलता देतील.

वृश्चिक : यश मिळेल
व्ययस्थानी असलेले शनी-मंगळ प्रगतीच्या योजनांना अडचणीत आणण्याचा खटाटोप करतील, परंतु अनुकूल सूर्य, बुध आणि शुक्र, गुरूचा शुभयोग यांचे प्रतिसाद देववाणीसारखे ठरतील. वृश्चिक व्यक्ती अडचणीतून बाहेर येतील. काही नवीन उपक्रमांचा आरंभ श्री गणेश चतुर्थीला आपण करू शकाल. आर्थिक प्रश्न सुटतील, परिवारातील असंतोष कमी होईल, आर्थिक तणाव दूर होईल, परंतु आरोग्य अधिकार यावर लक्ष ठेवा. पुढे सरकत राहा. यश मिळेल.
दिनांक : १६, १७, २१, २२ शुभ काळ.
महिलांना : अचूक अंदाज, वेगवान प्रयत्न, शब्दांवर संयम बरोबर निर्दोष यश.

धनू : अंदाज येणार नाही
व्ययस्थानी राहू, अनिष्ट गुरू आणि शनी-मंगळ एकत्र अशा ग्रहकाळात व्यावहारिक खेळाचा अचूक अंदाज शेवटपर्यंत येत नसतो. त्यात संरक्षणाचा प्रभावी मार्ग असतो. सत्य आणि संयम यांचा समन्वय. शनिवापर्यंत यापासून विचलित होऊ नका. दशमातील बुध, रविवारचे सूर्य राश्यांतर यांचे प्रतिसाद नियमित उपक्रमातून प्रतिष्ठा सांभाळण्यास उपयुक्त ठरतील. युक्ती आणि नवे तंत्र संपर्क, चर्चा, बैठकी यामध्ये यश मिळवून देतील.
दिनांक : १६ ते १९ शुभ काळ.
महिलांना : सामोपचारानेच समस्या सुटतील.

मकर : घटना स्मरणात राहतील
पंचमात गुरू, सप्तमात शुक्र, भाग्यात बुध यांच्यातील शुभ प्रतिसाद रविवारच्या रवी राश्यांतरापासून कार्यप्रांतात मकर व्यक्तींचा प्रभाव अधिकाधिक प्रबल करीत राहतील. अभिनव कल्पना, नवीन योजना यामधून शुक्रवारच्या शुक्र, गुरू शुभयोगाच्या आसपास चकित करणारे यश मिळेल. व्यापार, शिक्षण, राजकारण, कलाप्रांत यामध्ये दीर्घकाळ स्मरणात राहण्यात अशा घटनांचा समावेश असेल. शनी-मंगळ सहयोग संशय निर्माण करू शकतो. विचलित होऊ नका, पुढे चला, संशय, समस्या एकत्र येणार नाहीत.
दिनांक : १७ ते २१ शुभ काळ.
महिलांना : नेत्रदीपक यशाने कर्तृत्व उजळून काढणारा ग्रहकाळ आहे.

कुंभ : प्रवास वादग्रस्त
कुंभ व्यक्तींचा कार्यपथावरील प्रवास वादग्रस्त राहणेच शक्य आहे. त्यात परिवार ते परिचित मंडळींच्या उपद्रवांचा समावेश अधिक राहणार आहे. चतुर्थात गुरू-केतू, नाराज शुक्र, अष्टमात बुध यांच्यातील अशुभ परिणाम रविवारच्या रवी राश्यांतराने तीव्र होतील. सफलताच त्यात सापडण्याचा संभव आहे. सतर्क राहणे, गुप्तता ठेवणे, वाद टाळणे, शासकीय नियम सांभाळणे सध्याच्या अशुभ काळात याच मार्गाने इभ्रत सांभाळता येऊ शकेल.
दिनांक : १८ ते २२ शुभ काळ.
महिलांना : सरळ मार्ग, स्वच्छ कृती, गोड बोलणे यातून सणवाराचा सप्ताह प्रसन्न ठेवता येईल.

मीन : कर्तृत्व उजळून निघेल
पराक्रमी गुरू, पंचमात शुक्र, सप्तमात बुध, भाग्यात राहू या ग्रहांचे परिणाम विचारात वेग देतील. प्रयत्नात उत्साह निर्माण करतील. काही प्रांतात कर्तृत्व उजळून निघेल याचा प्रत्यय प्रारंभ रविवारच्या सूर्य राश्यांतरापासून होईल. श्री गणेश चतुर्थी, शुक्र, गुरू, शुभयोगाच्या आसपासचा काळ, व्यापार, राजकारण, कला, साहित्य, शिक्षण या क्षेत्रांत अविस्मरणीय घटनांचा ठरणे शक्य आहे. आरोग्य, विरोधक, वाहनांचा वेग एवढे सांभाळा. शनी, मंगळाचा धोका संपेल.
दिनांक : १६, १७, २१, २२ शुभ काळ.
महिलांना : वेगवान प्रयत्न, अचूक निर्णय यामधून मीन राशीच्या महिला अनेक क्षेत्रांत चमकतील.