Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, २३ सप्टेंबर २०१२
(२३ ते २९ सप्टेंबर २०१२)
मेष : वाद, स्पर्धा नको
गुरू, शुक्राची अनुकूलता, सूर्य-बुधाचे सहकार्य नियमित उपक्रमांसाठी उपयुक्त ठरतील. त्यांचा उपयोग संरक्षण मजबूत करण्यासाठी करावा. शुक्रवारचे मंगळ राश्यांतर नवीन आव्हान समोर घेऊन येणार असल्याने स्पर्धा-साहस-वाद असे प्रसंग प्रारंभापासून कटाक्षाने टाळा आणि व्यापार अर्थप्राप्ती, बौद्धिक प्रांत यामध्ये बुधवारी होणाऱ्या बुध, गुरू नवपंचम योगातील संधीचा उपयोग करून पुढची रूपरेखा पक्की करा.
दिनांक : २४ ते २८ येथील चंद्रभ्रमण त्यात उपयुक्त ठरेल.
महिलांना : रागरंग बघून कार्यभाग साधा. गुरूकृपेने महत्त्वाचे प्रश्न सुटतील.
वृषभ : झकास जम बसेल
राशिस्थानी गुरू, पंचमात सूर्य-बुध, प्रसन्न शुक्राचे सहकार्य वृषभ व्यक्तींना वेळापत्रकाप्रमाणे कार्यपथावरील प्रवास सुरू ठेवता येईल. बुधवारच्या बुध-गुरू नवपंचम योगाच्या आसपास अनपेक्षित संधी पुढे येतील. परिवार ते व्यापार, शिक्षण ते कला साहित्याचे प्रांत यामध्ये झकास जम बसवता येईल. शुक्रवारी मंगळ राश्यांतर होईल. त्याचा थोडाफार आधार मिळेल.
दिनांक : २५ ते २८ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.
मिथुन : श्रद्धा सबुरी आवश्यक
मिथुन व्यक्तींची राशी कुंडली सध्या अनिष्ट ग्रहांच्या चक्रात असल्याने श्रद्धा आणि सबुरी हाच मंत्र कार्यप्रांतात आधार देईल. पितृपक्षाचा उपयोग करून महत्त्वाची प्रकरणे पुढे सरकवता येतील. त्यातून विचारांना स्थिरता येईल. कृती, स्वरूप ठरवता येईल. त्यात बुध-गुरू नवपंचम योगाचा उपयोग होईल. शुक्रवारच्या मंगळ राश्यांतरापासून शनीचे निर्दोष प्रतिसाद प्रयत्नात उत्साह निर्माण करतील.
दिनांक : २३, २४, २७, २८ शुभकाळ.
महिलांना : अचूक अंदाज येईपर्यंत कृती करूच नका.
कर्क : सफलता व्यापक होईल
सूर्य, बुध, गुरू, शुक्र अशा ग्रहांचे शुभ परिणाम कर्क व्यक्तींना सफलता व्यापक करण्यासाठी उपयुक्त ठरतील. बुधवारच्या बुध, गुरू नवपंचम योगाच्या आसपास मोठय़ा योजनांचाही समावेश त्यात करता येईल. कार्यपत्रक अचूक करा, निर्दोष बनवा, परंतु पितृपक्ष संपेपर्यंत कृतीसाठी थांबा, नियमित कारभार पूर्ण करण्यास बराच वेळ द्यावा लागेल. आर्थिक प्रश्न मात्र त्रास देणार नाहीत.
दिनांक : २५, २६, २९ शुभकाळ.
महिलांना : अपेक्षित यश, अपेक्षित वेळेमध्ये मिळवता येईल.
सिंह : स्पर्धा बदला नको
शनि, मंगळ सहयोगांचे पर्व शुक्रवारी संपेल आणि राहू मंगळाच्या सहयोगाला प्रारंभ होईल. कमी-अधिक प्रमाणात परिस्थिती सारखीच राहील. परंतु शनीची निर्दोष हात राहणारी अनुकूलता प्रयत्नाला वेग देणारी ठरेल. राशिस्थानी येणारा शुक्र त्यात उत्साह निर्माण करील. गुरूकृपा यश देईल. नजीकच्या काळात बदलाचे प्रत्यंतर सुरू असलेल्या उपक्रमात येत राहील. तरीही साहस, स्पर्धा बदला. यासाठी हा काळ प्रबळ नसल्याने विचाराने पुढे चालत राहा.
दिनांक : २३, २४, २७, २८ शुभकाळ.
महिलांना : नव्या कल्पना, नवे तंत्र, यश निर्दोष करण्यास उपयुक्त ठरेल.
कन्या : मोठय़ा अपेक्षा नको
राशिस्थानी सूर्य-बुध, भाग्यात गुरू, बुधवारचा बुध-गुरू नवपंचम योग व्यवहार व्यवस्थित ठेवण्यासाठी या ग्रहांचे सहकार्य मिळणार आहे. त्याचा योग्य उपयोग करा, कार्यभाग साधा, साडेसाती आहे. शुक्र व्ययस्थानी येत आहे. मंगळ-राहू एकत्र येणार आहेत. त्यामुळे मोठय़ा अपेक्षा दूर ठेवा. मिळेल तेवढय़ा यशावर पुढचा प्रवास सुरू ठेवा. श्रीमारुतीची उपासना, आराधना साडेसातीवर नियंत्रण ठेवू शकते.
दिनांक : २५, २६, २९ शुभकाळ.
महिलांना : प्रपंचातील प्रश्न सुटतील, आरोग्य सुधारेल, समाजात प्रभाव वाढेल.
तूळ : जपून बोला, जपून चला
साडेसाती आणि मंगळाचा शनी, राहूशी संपर्क, व्ययस्थानी सूर्य-बुध प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल, प्रत्येक शब्दाचा उपयोग हुशारीने करावा लागेल. तेव्हाच समस्यांची गर्दी थोडी फार कमी करता येईल. त्यात प्रयत्न, संयम यांचा सहभागही आवश्यक राहील. आर्थिक, व्यावसायिक, राजकीय प्रांतांत साहसी प्रयोग नको, प्रकृती सांभाळा. शनिवारच्या रवी-हर्षल प्रतियोगापर्यंत चुका आणि धोका यातून अपघाताची शक्यता आहे. सावध राहा.
दिनांक : २३, २४, २७, २८ शुभकाळ.
महिलांना : फसवणुकीचे प्रसंग येतील. आरोग्य बिघडेल. वाद टाळा, पुढे चला.
वृश्चिक : आधार मजबूत ठेवा
सूर्य, बुध, गुरू, शुक्र याच ग्रहांचा आधार व्यावहारिक उलाढालींची शक्ती आहे. साडेसाती आणि मंगळाचे शनी राहूशी असणारा संपर्क, साहस आणि स्पर्धा यातून शक्तीला धोका होऊ शकतो. शनिवारच्या रवी-हर्षल प्रतियोगापर्यंत कोठेही संयम सोडू नको. शासकीय नियम मोडू नका आणि विकारांची पथ्ये सांभाळा. वाहन जपून चालवा, त्यातून आधार मजबूत राहील. प्रार्थना, उपासना सत्कारणी लागेल. शुक्र राश्यांतरातील उत्साह नवीन निर्णयास उपयुक्त ठरेल.
दिनांक : २३ ते २६ शुभकाळ.
महिलांना : सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात चमकाल, शुभकार्ये ठरतील.
धनू : थांबा, बघा, पुढे चला
सूर्य, बुधाचे प्रतिसाद संधी आणि युक्तींच्या समन्वयासाठी उपयुक्त ठरतील. तरीही शुक्रवारचे मंगळ राश्यांतर अनिष्ट गुरू, राहूचे अशुभ परिणाम प्रबळ करणार असल्याने झटपट कृती आवश्यक राहील. विलंब झालाच तर अचूक अंदाज येईपर्यंत थांबा. नोकरी, धंदा, राजकारण यांमध्ये त्यांचा उपयोग होईल. भाग्यात येत असलेला शुक्र विचारांमध्ये उत्साह निर्माण करील. त्यामुळे नवे मार्ग शोधणे शक्य होईल.
दिनांक : २३ ते २७ या शुभकाळाचा त्यासाठी उपयोग होईल.
महिलांना : प्रयत्न आणि कार्ये यांचा समन्वय यश मिळवून देईल.
मकर : प्रकरण मार्गी लागतील
गुरूची अनुकूलता निर्दोष होत असलेले शनीचे सहकार्य, भाग्यात सूर्य, बुध महत्त्वाची प्रकरणे याच ग्रहकाळात मार्गी लागतात आणि नवीन उपक्रमांची रूपरेखा तयार करता येते. बुधवारच्या बुध, गुरू नवपंचम योगाच्या आसपास संपर्क संबंधातून व्यापार, राजकारण, शिक्षण, अर्थप्राप्ती या संबंधात केलेली कृती यशस्वी होईल. वाहन जपून चालवा, आरोग्य सांभाळा, रवी-हर्षल प्रतियोगातील आपत्ती टाळता येतील.
दिनांक : २५ ते २८ शुभकाळ.
महिलांना : नव्या योजना समोर येतील, त्यातून प्रपंच, समाज कार्ये यात कार्यभाग साधता येईल.
कुंभ : नवा शोध घ्या
अष्टमात सूर्य-बुध, चतुर्थात गुरू-केतू यांच्यामुळे कार्यक्षितिजावरील दूषित हवामानाचा त्रास सुरू आहे. शनिवारच्या रवी-हर्षल प्रतियोगापर्यंत त्यात काही नवीन समस्या प्रवेश करतील, त्याची वादळ तयार करतील, सतर्क राहणे आवश्यक आहे. नव्या शांतिमार्गाचा शोध शुक्रवारी होणाऱ्या शुक्र, मंगळ राश्यांतरामुळे सोपा होईल. त्यातील शनीचा निर्दोष होत राहणारा सहभाग महत्त्वाचा ठरेल.  
दिनांक : २३, २४, २७, २८ शुभकाळ.
महिलांना : प्रसंग आणि प्रश्न यावर नवे मार्ग शोधा, यश मिळेल.
मीन : प्रतिष्ठा मजबूत
अष्टमातील शनी-मंगळ सहयोग संपण्याच्या मार्गावर आहे. पराक्रमी गुरू, बुध, गुरू नवपंचम योग सप्तमात सूर्य यांच्यातील प्रतिसाद कार्यप्रांतांत प्रतीष्ठा सांभाळणारी सफलता देतील. पितृपक्षाची ढाल पुढे करून काही प्रकरणे पुढे सरकवता येतील. साहसी प्रयोग आणि व्यवहार यात सहभागी होऊ नका. शुक्रवारचे मंगळ राश्यांतर समस्यातील तीव्रता कमी करणार आहे.
दिनांक : २३ ते २६ शुभकाळ.
महिलांना : निर्धार आणि सत्य यांचा कार्यभाग साधण्यास उपयोग होईल.