Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, शनिवार, २९ सप्टेंबर २०१२
३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१२
मेष : उपक्रमांत यश
गुरू, शुक्र, शनी यांच्यातील निर्दोष शुभ परिणामांचा प्रभाव प्रयत्न, विचार, कृती यांच्यावर होईल. त्यातून अनेक उपक्रम यशस्वी करता येतील. सोमवारचे बुध राश्यांतर त्यात व्यापकता निर्माण करू शकते. बौद्धिक प्रांत, व्यापारी क्षेत्र, राजकीय कार्ये, अर्थप्राप्ती यात त्याची प्रचीती येतच राहील. पितृपक्षामुळे नवीन कार्याचा शुभारंभ पुढे सरकवावा लागेल. पूर्वतयारी शनिवापर्यंत करता येईल.
दिनांक : २ ते ५ शुभकाळ. त्यास सहकार्य करील.
महिलांना : प्रयत्नाने पेचप्रसंग सुटतील.
वृषभ : साहस टाळा, यश मिळेल
शनी, मंगळ, राहू यांचा कमीअधिक प्रमाणात त्रासच होणार आहे. त्यात घरगुती प्रश्नांपासून व्यापारी सौदे, शासकीय प्रकरणे यांचाही समावेश राहील. चुका आणि साहस एवढे टाळा. गुरूची अनुकूलता, शुक्राची प्रसन्नता, पंचमात सूर्य यांच्यामुळे काही प्रकरणे मार्गी लावून अवघड प्रश्नांवर लक्ष केंद्रित करता येईल. शत्रू त्यामुळे पुढे सरकू शकणार नाही. आरोग्य नियंत्रणात राहील. पितृपक्षातील उपक्रमांत परिवार सहभागी करून घेता येईल.
दिनांक : ३०, १, ४, ५ शुभकाळ.
महिलांना : शक्ती, बुद्धीच्या सीमारेषा सांभाळा, यश सोपे होईल.
मिथुन : कृतीत यश
गुरू, राहू, केतू यांची अनिष्टता चतुर्थात रवी असेपर्यंत तीव्र राहील; परंतु शनीचे निर्दोष सहकार्य, पंचमात येत असलेला बुध, त्यात शुक्रातील उत्साह, अचूक निर्णय घेऊन केलेली प्रत्येक कृती शनिवापर्यंत यश मिळवून देणारी ठरणार असल्याने विचलित होऊ नका आणि मस्ती करू नका. बुध-नेपच्यून-नवपंचम योग व्यापार, अर्थप्राप्ती, देवघेवीचे व्यवहार, धर्मकार्ये यामधून आनंद देणार आहे. पितृपक्ष आहे, नवीन उपक्रम टाळा.
दिनांक : ३० ते ३ शुभकाळ.
महिलांना : निर्दोष यशासाठी शिकस्तीचे प्रयत्न आवश्यक राहतील.
कर्क : कार्यभाग साधता येईल
गुरू, शुक्र, राहू, रवी यांच्यातील परिणाम अधिकाधिक कार्यभाग साधण्यास कर्क व्यक्तींना सहकार्य करण्यास उपयुक्त ठरणार आहे. सोमवारच्या बुध राश्यांतरापासून चतुर्थातील शनीचा उपद्रव वाढत राहील. त्यामुळे संशय, घोटाळे यांच्यातून काही प्रकरणे अडचणीत सापडतील. संयमाने शोध घ्या, मार्ग काढा, पुढे चला हा मंत्र चंद्रभ्रमणातील शुभ परिणाम यशस्वी करतील. आर्थिक, प्रापंचिक प्रश्न त्यामुळे सोडविता येतील. प्रवास कराल. नवीन संपर्क काही प्रश्न सोडवतील.
दिनांक : १ ते ५ शुभकाळ.
महिलांना : कल्पकता, परिश्रम यश निश्चित करतील.
सिंह : आलेख उंचावत राहील
राशिस्थानी शुक्र, पराक्रमी शनी, दशमात गुरू आणि बुध-नेपच्यून-नवपंचम योग सिंह व्यक्तींच्या प्रगतीचा आलेख उंचावत नेणारी ग्रहस्थिती यातून नव्या उद्योगाची चर्चा सुरू होईल. परिवारातील प्रश्न सुटतील, सामाजिक चळवळी गाजतील. कला प्रांतात चमकाल, नोकरीत बदल संभवतात आणि दूरचे प्रवास निश्चित करता येतील. चतुर्थात मंगळ, राहू एकत्र असेपर्यंत निर्णय, कृती, माहिती मिळवणे, कृषी कार्ये यात चुका करूच नका.
दिनांक : २ ते ६ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नाने प्रगतीचा टप्पा गाठता येईल.
कन्या : संधी साधता येतील
पराक्रमी राहू, मंगळातील संमिश्र प्रतिसाद संधी साधण्यास उपयुक्त ठरतील. सोमवारचे बुध राश्यांतर त्यातून प्रगतीचा नवा टप्पा गाठण्यास सहकार्य करणार आहे. त्यात गुरूची अनुकूलता महत्त्वाची ठरेल. व्यापारी गाडी रूळावर येईल. राजकीय प्रतिष्ठा वाढेल. शिक्षणात नवे मार्ग दृष्टिपथात येतील. चर्चा, संपर्क, नवरात्रातील उपक्रम ठरवण्यास उपयुक्त ठरतील. त्यात बुध-नेपच्यून-नवपंचम योग यश देईल.
दिनांक : ३०, १, ५, ६ शुभकाळ.
महिलांना : समस्यातून सफलता मिळवावी लागेल.
तूळ : प्रगती, शांती अडचणीत
साडेसाती, राहू-मंगळाचा सहयोग, अष्टमात गुरू-केतू यांच्यातील परिणाम प्रगती आणि शांती यांच्यावर आक्रमण करणार असल्याने शनिवापर्यंत साहसी निर्णय, कृती, प्रलोभन यांपासून कटाक्षाने दूर राहा. व्यसन, प्रलोभन, शुक्र-नेपच्यून प्रतियोगात हैराण करतात. राशिस्थानी येणारा बुध लाभात, शुक्र-बुध-नेपच्यून-नवपंचम योग यांच्या आधाराने नियमित प्रवास सुरू ठेवता येईल. त्यातही अवघड वळणावर सावध राहा. प्रगतीचा टप्पा गाठता येईल.
दिनांक : २, ३, ४ शुभकाळ.
महिलांना : अपरिचित व्यक्ती आणि मार्ग, कृती यापासून दूर राहा. फायदा होईल.
वृश्चिक : अधिकार, पैसा जपून वापरा
सूर्य, गुरू, शुक्र, मंगळ यांच्यामधील काही शुभ परिणाम वृश्चिक व्यक्तींना समस्या सोडवून घेण्यास उपयुक्त ठरतील. अधिकार आणि पैसा यांचा जपून वापर करा. शासकीय नियम सांभाळा, त्यामध्ये साडेसातीचे अशुभ परिणाम कमी त्रास देतील. सोमवारचे बुध राश्यांतर संशयचक्र निर्माण करतो. सतर्क राहा आणि गोड बोलून कार्यभाग साधा. बुध-नेपच्यून-नवपंचम योग धर्मकार्यातून आनंद देईल.
दिनांक : ३०, १, ५, ६ शुभकाळ.
महिलांना : अवघड कार्याची जबाबदारी घेऊ नका.
धनू : पितृपक्ष फायद्याचा
व्ययस्थानी राहू-मंगळ, षष्ठात गुरू-केतू या ग्रहांमुळे व्यवहाराची गणिते चुकतात आणि अपेक्षित अंदाज फसतात. प्रारंभापासून सतर्क राहा. रागरंग बघून कार्यभाग साधा, अवघड निर्णयकृतीसाठी पितृपक्षाची कारणे पुढे करता येतील. त्याचाही फायदा उठवा. दशमात सूर्य, लाभात शनी, भाग्यात शुक्र प्रतिष्ठा मजबूत राहील एवढे यश निश्चित मिळवून देतील. शुक्रवारचा बुध-नेपच्यून-नवपंचम योग धर्मकार्यातून आनंद देणारा आहे. प्रवास कराल.
दिनांक : २, ३, ४ शुभकाळ.
महिलांना : संसारात शांती, व्यवहारात हुशारी, समाजात संयम हे सफल कार्यमार्ग आहेत.
मकर : यश मिळविता येईल
पंचमात गुरू, अनुकूल सूर्य-बुध, बुध-नेपच्यून-नवपंचम योग कार्यप्रांतात यश मिळविण्यासाठी या ग्रहांमधील परिणाम लाखमोलाचे सहकार्य करतील. दशमातील शनी प्रतिष्ठा मजबूत करणार असल्याने नवीन व्यापारी केंद्राचे प्रस्ताव स्वीकारता येतील. नवे राजकीय संपर्क प्रगतीचे ठरतील. धार्मिक उपक्रमातून आनंद मिळेल, शिक्षणकार्यात नवे शोध घेता येतील, धावपळीत आरोग्याच्या तक्रारींवर मात्र दुर्लक्ष नको.
दिनांक : २० ते २४ शुभकाळ.
महिलांना : अचूक यशासाठी निर्दोष परिश्रम महत्त्वाचे ठरतील.
कुंभ : अखेर मार्ग सापडतील
चतुर्थात गुरू-केतू, सहयोग सूर्य अष्टमात मंगळ-राहूमधील काही अशुभ परिणाम कुंभ व्यक्तींच्या कल्पना आणि योजना यांच्यामध्ये अडचणी आणतील. अचूक अंदाज येईपर्यंत कृती करू नका; परंतु भाग्यात शनी, सोमवारचे बुध राश्यांतर, शुक्रवारचा बुध-नेपच्यून-नवपंचम योग यांची देवासारखी मदत मिळणार असल्याने अडचणीमधून बाहेर पडता येईल. काही योजना पुढे नेता येतील. शुक्र-शनी शुभयोग प्रपंचात प्रसन्नता ठेवतो. अचानक हाती येणारा पैसा उत्साह निर्माण करील.
दिनांक : ३० ते ३ शुभकाळ.
महिलांना : प्रारंभापासून स्वच्छ विचार, सरळ कृती यांचा उपयोग करा, यश निश्चित मिळेल.
मीन : सहकारी सांभाळा
गुरू, राहू, मंगळ यांच्यामधील काही शुभ परिणाम सप्तमात सूर्य आणि शिकस्तीचे प्रयत्न, कृतीत शिस्त यांचा शनिवारपर्यंत समन्वय ठेवला तर अष्टमात शनी-बुधाचे राश्यांतर आणि शुक्राची नाराजी आपणास त्रास देऊ शकणार नाहीत. अधिकारी, सहकारी, भागीदार यांना नाराज करू नका. प्रतिक्रिया देऊन राजकारण गरम करू नका. परिवार शांत ठेवा, बुध-नेपच्यून-नवपंचम योग धर्मकार्यातून आनंद देईल. प्रलोभनापासून दूर राहा. शुक्र-नेपच्यून प्रतियोग अस्वस्थ करणार नाही.
दिनांक : १ ते ५ शुभकाळ.
महिलांना : प्रपंचात शांत राहा. कला, क्रीडा प्रांतांत कृती नको, धर्मकार्यातून आनंद मिळेल.