Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
(७ ते १३ ऑक्टोबर २०१२)
मेष : व्यत्यय येतील
गुरू, शुक्र, शनी, बुध यांची अनुकूलता यश मिळवून देणारी असली तरी अष्टमात मंगळ-राहू एकत्र असेपर्यंत त्यात छोटे-मोठे व्यत्यय येत राहतील. त्याने विचलित होऊन सुरू असलेल्या उपक्रमांचा वेग कमी करू नका. गुरुवारच्या शनी-नेपच्यून नवपंचम योगाच्या आसपास अनेक प्रकरणांना अनपेक्षित कलाटणी मिळेल आणि व्यापार, शेती, राजकारण, शिक्षण, कलाप्रांत यामध्ये बाजी मारून जाल. प्रार्थना प्रसन्नता देणारी आहे.
दिनांक : ७, ८, १२, १३ शुभ काळ.
महिलांना : सरळ मार्गाने पुढे चला, अवघड प्रश्न सुटतील, प्रभाव वाढेल.
वृषभ : चित्र आकर्षक होईल
राशिस्थानी गुरू, चतुर्थात शुक्र, पंचमात सूर्य आणि मंगळवारचा रवी-गुरू नवपंचम योग . प्रगतीचे चित्र आकर्षक करणारी ग्रहस्थिती आहे. प्रयत्न आणि योजना यांचा समन्वय शनिवापर्यंत बरोबर ठेवा. अर्थप्राप्ती, नोकरीत बदल, व्यापारी सौदे, नवे राजकीय संपर्क यात कार्यभाग साधता येईल. शनिवारचा शनी प्रदोष धर्मकार्यातून आनंद देणारा आहे. षष्ठातला शनी जुने विकार, नवे शत्रू यांना प्रोत्साहन देतो. सावध राहा.
दिनांक : ७, ते १० शुभ काळ.
महिलांना : प्रापंचिक प्रश्न सुटतील, सांस्कृतिक क्षेत्रात चमकाल.
मिथुन : प्रवास नियंत्रणात ठेवा
शनी, शुक्र, बुध यांचे सहकार्य घेऊन सुरू असलेला मिथुन व्यक्तींचा प्रवास शनी-नेपच्यून नवपंचम योगामुळे बराचसा यशस्वी होणारा आहे; परंतु गुरू, राहू, मंगळ, केतू यांचा प्रखर विरोध असल्याने अवघड वळण, अवास्तव वेग यावर शनिवापर्यंत नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. संपर्क, चर्चा, कार्यमार्ग या संबंधात गुप्तता अधिक उपयुक्त ठरेल. आर्थिक देवघेव चोख ठेवा. तेजीमंदीत साहस नको. कलाप्रांतात चमकाल.
दिनांक : ८ ते १२ शुभ काळ.
महिलांना : रागरंग पाहून कृती करा, यश मिळेल.
कर्क : योजना यशस्वी ठरतील
सूर्य, शुक्र, गुरू यांची अनुकूलता सूर्य-गुरू नवपंचम योग प्रयत्न गुणिले कार्य बरोबर यश असे समीकरण शनिवापर्यंत सुरू ठेवता येईल. चतुर्थातील बुध, शनी संभ्रम, संशय निर्माण करतात; परंतु ठरविलेल्या योजना ठरविलेल्या पद्धतीनेच पुढे घेऊन चला. त्यात व्यापारी देवघेव, सामाजिक कार्ये, सांस्कृतिक उपक्रम, दूरचे प्रवास, नवे करार यांचा समावेश ठेवता येईल. मंगळ-नेपच्यून केंद्रयोगात अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोग्यासाठी योग्य औषधांचा उपयोग करावा.
दिनांक : १० ते १३ शुभ काळ.
महिलांना : विचाराने कृती करा, प्रश्न सुटतील.
सिंह : आगेकूच सुरू राहील
गुरूची कृपा, शनीची अनुकूलता बुध, शुक्र खूश आहेत. त्यातून कार्यपथावरील आगेकूच सुरूच राहणारी आहे. नवे तंत्र, अभिनव उपक्रम यांचा समावेश त्यात करता येईल. मंगळवारच्या सूर्य-गुरू नवपंचम योगामुळे त्यास वेगाने प्रतिसाद मिळू लागेल. चतुर्थातील मंगळ परिवारातील प्रश्न, आरोग्याच्या तक्रारी, मिळकतीची काही प्रकरणे यातून कटकटी निर्माण करतात; परंतु प्रगतीच्या वेगावर त्याचा परिणाम होणार नाही.
दिनांक : ७, ८, १२, १३ शुभ काळ.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, श्रेष्ठत्व सिद्ध करू शकाल.
कन्या : प्रबळ शुभ परिणाम
सूर्य, बुध, गुरू यांची राशी कुंडलीतील बैठक झकास आहे. मंगळवारच्या सूर्य-गुरू नवपंचम योगामुळे त्यांच्यातील शुभ प्रतिसाद प्रबळ होतील. त्यातून निर्णय, कार्य, कृती यांचा समन्वय साधून यश व्यापक करता येईल. पराक्रमी मंगळाच्या काही परिणामांचा आधार उपयुक्त ठरेल. त्यामुळे साडेसातीची चिंता नको, व्यापारी सौदे, नोकरीतील बदल, अर्थप्राप्ती, मंगल कार्याची चर्चा, निवासी जागेचा शोध यात शुभ परिणाम प्रचीतीस येतील.
दिनांक : ७ ते १० शुभ काळ.
महिलांना : सांस्कृतिक, सामाजिक प्रांतात चमकाल, संसारातील प्रश्न मार्गी लागतील.
तूळ : समस्या तीव्र होतील
साडेसाती, अष्टमात गुरू-केतू, व्ययस्थानी सूर्य. व्यवहारातील समस्यांची संख्या वाढत ठेवणारी तीव्र करणारी ग्रहस्थिती आहे. प्रपंच ते अर्थप्राप्ती यांचा त्यात समावेश राहील. बुध-शुक्राचे सहकार्य युक्ती आणि उत्साह यांच्यातून प्रतिष्ठा सुरक्षित ठेवणारी सफलता मिळवून देईल. शनिवारचा शनी-नेपच्यून नवपंचम योग व्यवहारात, धर्मकार्यात सत्कारणी परिश्रमांचा आनंद देऊ शकतो.
दिनांक : ८ ते १२ या शुभ काळात त्याचा उपयोग होईल.
महिलांना : निर्दोष यशासाठी प्रयत्न, कुशलता यांचा समन्वय आवश्यक राहील.
वृश्चिक : यश मिळेल
सूर्य, बुध, गुरू, शुक्र यांच्यातील प्रतिक्रिया प्रयत्नांना वेग देतील. अचूक निर्णयातून कृतीमधून यश व्यापक करतील. मंगळवारच्या सूर्य-गुरू नवपंचम योगाच्या आसपास याचा अनेक प्रांतांत ठसठशीत प्रत्यय यावा. साडेसाती मंगळ-राहू सहयोग म्हणजे आपत्तींना निमंत्रण. त्यात सत्य आणि संयम हीच अस्त्रे आपले संरक्षण करतील. आश्वासन आणि विश्वास यांचा जपून उपयोग करा.
दिनांक : ९ ते १२ शुभ काळ.
महिलांना : निराश होऊ नका, यश निश्चित मिळेल.
धनू : घटना स्मरणात राहील
सूर्य, बुध, शुक्र, शनी राशीकुंडलीत शुभस्थानी असल्याने प्रयत्नाने प्रश्न सोडविता येतील. काही प्रांतांत नेत्रदीपक यश मिळविता येईल. गुरुवारच्या शनी-नेपच्यून नवपंचम योगाच्या आसपास दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या घटनांचा समावेश असेल. दूरचे प्रवास, धर्मकार्ये, मोठय़ा व्यापारी संस्था आणि व्यक्ती यांच्याशी होणारे संपर्क महत्त्वाचे करार यांचा समावेश त्यात आहे, पण गुरू, राहू, मंगळ, केतू यांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी कृतीत गुप्तता, करारात नियम एवढे सांभाळा.
दिनांक : ७, ८, १२, १३ शुभ काळ.
महिलांना : प्रपंच आकर्षक कराल, नवीन कार्ये हाती घ्याल, प्रवास होतील.
मकर : दबदबा वाढेल
पंचमात गुरू, दशमात शनी, भाग्यात सूर्य, मंगळवारचा सूर्य-गुरू नवपंचम योग मकर व्यक्तींचा अनेक कार्यप्रांतांत दबदबा निर्माण होणारा आहे. नवे संपर्क, नवे परिचय यातून महत्त्वाच्या योजनांना आकर्षक आकार देऊ शकाल. समाजकार्यात तर बडी बडी मंडळी सहभागी होतील. व्यापारी चक्र वेगाने फिरत राहणार आहेत. मंगळ-राहू सहयोगातून होत असलेल्या मंगळ-नेपच्यून केंद्र योगाने दगाफटका करू नये यासाठी शनिवापर्यंत सतर्क राहा.
दिनांक : ९, १०, ११ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्नाने कार्यभाग साधता येईल, हुशारीने प्रतिष्ठा मिळविता येईल.
कुंभ : समस्या सुटतील
गुरू, सूर्य, केतू यांचे अशुभ परिणाम मंगळ-राहू सहयोगामुळे काही प्रांतात तीव्र होतील. परंतु भाग्यातील बुध-शनी सहयोग युक्ती आणि परिश्रम यातून सहकार्य करतील. यामुळे सामना, समस्या सोडवील. शनिवापर्यंत अपेक्षित स्थळी पोहोचलेले असाल. नोकरी, धंदा, राजकारण, कलाप्रांत या क्षेत्रांतील कुंभ व्यक्तींना याचा प्रत्यय येतच राहील. मंगळ-नेपच्यून केंद्रयोग साहस, स्पर्धा यात विघ्न आणतो, सावध राहा.
दिनांक : ११, १२, १३ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्नाने प्रश्न सुटतील आणि प्रतिमा उजळेल.
मीन : नियंत्रण ठेवा
पराक्रमी गुरू, सप्तमात सूर्य, सूर्य-गुरू नवपंचम योग यांचा आधार कार्यभाग साधण्यास, प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. अनिष्ट शनी-बुध आणि मंगळ-राहू सहयोगातील काही परिणामांनी यात दगा, धोका करू नये यासाठी सरळमार्ग, स्वच्छ कृती, शासकीय नियम, प्रवासाचा वेग यांचे नियंत्रण व्यवस्थित ठेवा. शनिवापर्यंत कार्यवर्तुळात हसत-खेळत प्रवेश होईल. शनी प्रदोष धर्मकार्यातून आनंद देईल.
दिनांक : ९, १०, ११ शुभ काळ.
महिलांना : आरोग्य, अधिकार यावर लक्ष ठेवा, समाज आणि संसार कार्यात यश मिळेल.