Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
(१४ ते २० ऑक्टोबर २०१२)
मेष : बाजी मारता येईल
गुरू, शुक्र, शनी यांच्यातील प्रतिसाद प्रयत्नांना वेग देतील. उलाढालीत उत्साह निर्माण करतील. परंतु अष्टमातील राहू-मंगळ छोटय़ा-मोठय़ा व्यत्ययातून वेळेवर सफलता मिळू देणार नाही. मंगळवारच्या रवी-राश्यांतरातून आरोग्याच्या तक्रारींचा समावेश त्यात होणे शक्य आहे. परंतु अशा प्रसंगात शनिवापर्यंत बुध-शुक्र शुभ योग सहकार्य करणार असल्याने व्यापारी सौदे, प्रापंचिक प्रश्न, राजकीय बैठकी, मिळकतीचे करार यामध्ये अखेर बाजी मारता येईल.
दिनांक : १६, १७, २० शुभ काळ.
महिलांना : विचाराने कृती करा. मार्ग सापडतील, यश मिळेल.
वृषभ : नवीन प्रश्नांचा काळ
राशिस्थानी गुरू, चतुर्थात शुक्र व्यवहार आणि परिवार यासंबंधात फारशी चिंता नसली तरी मंगळवारचा सूर्यबदल, शासकीय प्रकरणे, उपद्रवी शत्रू, आरोग्याच्या तक्रारी यांच्यातून नव्या प्रश्नांची आव्हाने उभी राहतील. त्यात शनीचा सहभाग मोठा राहील. परंतु निर्धाराने पुढे चालत राहा. मंगळ-हर्षलाच्या नवपंचम योगातून अनपेक्षित नवा प्रकाश दृष्टिपथात होईल. प्रकाश मार्गावरचा प्रवास सोपा होईल. त्यात व्यापार, कला, विज्ञान, सामाजिक उपक्रम यांचा समावेश राहील.
दिनांक : १४, १५, १८, १९ शुभ काळ.
महिलांना : निर्णय कृतीत आणताना घाईगर्दी नको. प्रयत्न कारणी लागतील.
मिथुन : प्रवास अडचणीत
गुरू, राहू, केतू, मंगळ यांच्या अशुभ परिणामांमुळे मिथुन व्यक्तींचा कार्यप्रांतातील प्रवास अडथळ्यांच्या शर्यतीत सापडलेला आहे. त्यात रवी-शनी सहयोगांचा होणारा समावेश नव्या तक्रारींना प्रवेश देऊ शकतो. साहस टाळा, मिळणारे सहकार्य स्वीकारा, नवरात्र पर्वामध्ये प्रार्थना उपयुक्त ठरेल आणि बुध-शुक्राचा शुभ योग नवीन मार्गानी प्रवासाला यशस्वी वळण देईल. त्यातून ललिता पंचमीचे अभिनव उपक्रम चांगला प्रतिसाद मिळवतील.
दिनांक : १६, १७, २० शुभकाळ.
महिलांना : प्रपंचात प्रसन्नता राहील. सामाजिक, धार्मिक उपक्रमातून आनंद मिळेल.
कर्क : चक्र वेगाने फिरतील
गुरूची कृपा, मंगळ-हर्षलचा नवपंचम योग, बुध-शुक्र शुभ योग आणि शारदोत्सवाचा प्रारंभ यामधून कर्क व्यक्तींची कार्यचक्रे वेगाने फिरू लागतील. त्यात नव्या नव्या उपक्रमांचा समावेश होऊ शकेल. अर्थप्राप्ती धर्मकार्यातील प्रसन्नता, उद्योगातील राजकीय प्रभाव यावर त्याचे शुभ परिणाम प्रचीतीत येतील. चतुर्थात सुरू होणारा रवी-शनी सहयोग आरोग्याच्या तक्रारी, भाऊबंदातील प्रकरणे यामधून थोडेफार स्वास्थ्य दूषित करील. विचलित होऊ नका, पुढे चालत राहा.
दिनांक : १४, १५, १८, १९ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न हुशारीने अवघड कार्यातही यश मिळवता येईल.
सिंह : समस्या सांभाळा
राशिस्थानी शुक्र, दशमात गुरू, बुध, शुक्राचा शुभ योग कार्यभाग साधण्यासाठी याच ग्रहांचे शुभ परिणाम शनिवापर्यंत सहकार्य करतील. त्यामुळे शारदोत्सवातील उत्साह ललिता पंचमीचे उपक्रम प्रगतीचे चित्र आकर्षक करतील. चतुर्थात राहू-मंगळ सहयोग असेपर्यंत घरातील असंतोष आणि सामाजिक समस्या यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. धंद्यात प्रगती होते. कला-साहित्यात चमकाल, दूरचे प्रवास ठरवाल.
दिनांक : १४ ते १७ शुभ काळ.
महिलांना : अपेक्षित सफलता मिळवता येईल, त्यामुळे आनंदी राहाल.
कन्या : सहज सफलता नाही
साडेसाती आणि मंगळवारी सुरू होत असलेला रवी-शनी सहयोग व्ययस्थानी शुक्र कन्या व्यक्तींना कल्पना आणि योजना सहज सफलता देऊ शकणार नाही. गुरूची अनुकूलता मंगळ-हर्षलाचा नवपंचम योग शारदोत्सवातील उपक्रमांना आधार देतील आणि दीपावलीपर्यंतच्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित होईल. त्याचा प्रारंभ ललिता पंचमीला होऊ शकेल. आर्थिक प्रश्न सुटतील, मंगलकार्ये ठरवता येईल. समाजकार्याला नवीन दिशा मिळेल. शिक्षणात यश मिळेल. शिकस्तीचे प्रयत्न मात्र आवश्यक.
दिनांक : १५ ते १८ शुभ काळ.
महिलांना : नवरात्रीतील उपक्रमात उत्साह राहील, नवीन उपक्रम हाती घेतले जातील.
तूळ : विचाराने निर्णय घ्यावा
साडेसाती, आठवा गुरू यांच्या चक्रात सापडलेल्या तूळ व्यक्तींना मंगळवारपासून रवी-शनी सहयोगाशी सामना करावा लागणार असल्याने कोणताही निर्णय कृतीत आणण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागेल. आश्वासन आशा, अपेक्षा तर्कशुद्ध व्यवहाराचे विचार फायदेशीर ठरणारा आहे. त्यात व्यावसायिक देवघेव, नोकरीतील बदल, मंगलकार्याची निश्चिती, महत्त्वाचे करार, दूरचे प्रवास यांचा समावेश त्यात ठेवावा. प्रार्थना प्रसन्नता देईल.
दिनांक : १६ ते २० शुभ काळ.
महिलांना : झगडूनच यश मिळवावे लागेल.
वृश्चिक : धोका स्वीकारू नका
साडेसाती, व्ययस्थानी बुध, त्यात मंगळवारी रवीचा प्रवेश होईल आणि व्यवहारात नवीन प्रश्न निर्माण होतील. त्यात सावकारी, शासकीय परिचित मंडळी यांचा समावेश राहील. यामध्ये धोका स्वीकारू नका. गुरू-शुक्राचे शुभ परिणाम मंगळ-हर्षल नवपंचम योग ऐन वेळी प्रतिष्ठा सांभाळता येईल, अशी रसद पोहोचवतील. त्यामुळे व्यापारी, राजकीय क्षेत्रात संरक्षण मिळेल. बौद्धिक कार्यातून प्रभाव निर्माण होईल. वाहन जपून चालवा, आरोग्य सांभाळा.
दिनांक : १४, १५, १८, १९ शुभ काळ.
महिलांना : शिकस्तीचे प्रयत्न कार्यभाग साधण्यास उपयुक्त ठरतील.
धनू : व्यवहार अडकतील
व्ययस्थानी राहू-मंगळ, षष्ठात गुरू-केतू यांच्या अशुभ परिणामांमध्ये व्यवहार अडकलेले असतील. मंगळवारच्या रवी राश्यांतरामुळे पुढे सरकणे अवघड होईल. परंतु बुध-शुक्राचा शुभ योग शारदोत्सवातील उत्साह कमी होऊ देणार नाही. त्यातून प्रतिष्ठा मजबूत ठेवणारी प्रकरणे मार्गी लावता येतील. अपूर्ण माहिती, अल्प परिचय यांच्या आधारावर मोठे साहस करू नका. प्रार्थना मन:शांतीसाठी उपयुक्त ठरेल. ऐन वेळी प्रवास करावे लागतील.
दिनांक : १४ ते १७ शुभ काळ.
महिलांना : झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या.
मकर : संधीचा उपयोग करा
दशमात शनी, पंचमात गुरू, मंगळ-हर्षलाचा नवपंचम योग संधीचा अधिकाधिक उपयोग करून अनेक प्रांतांत प्रभाव प्रस्थापित करू शकाल. त्यात शारदोत्सवपर्व विशेष लाभ देणारे ठरणार आहे. दीपावलीपर्यंतचे कार्यमार्ग निश्चित करू शकाल. व्यापारी सौदे, निवासी जागा, कला-साहित्यात नवे विषय, अभिनव राजकीय उपक्रम यांचा समावेश करता येईल. प्रतिष्ठितांकडून येणारे प्रस्ताव स्वीकारता येतील.
दिनांक : १५ ते १९ शुभ काळ.
महिलांना : अनपेक्षित प्रश्न सुटतील आणि ठरवलेले उपक्रम पूर्ण करता येतील.
कुंभ : परिश्रमातून आनंद
भाग्यात शनी, दशमात राहू-मंगळ, मंगळवारचे सूर्य राश्यांतर यांच्यातील अनुकूल प्रतिसाद सार्थकी परिश्रमातून आनंद देऊ शकतात आणि नवरात्रपर्वात नवीन उपक्रमांनाही मोठा प्रतिसाद मिळवता येऊ शकतो. प्रकृती, प्रपंच, प्रवास या संबंधातील समस्या सोडवण्यातच स्वतंत्र वेळ द्यावा लागणे शक्य आहे. ललिता पंचमीचे उपक्रम यश देतील. व्यापार, कला, विज्ञान, साहित्य यात कुंभ व्यक्ती आघाडीवर दिसू लागतील.
दिनांक : १६ ते २० शुभ काळ.
महिलांना : कला-साहित्यात चमकाल, सांसारिक प्रश्न सोडवता येतील.
मीन : प्रगती, प्रतिष्ठा मजबूत
पराक्रमी गुरू, भाग्यात राहू आणि मंगळ-हर्षलाचा नवपंचम योग मीन व्यक्तींना नवरात्रातील ठरवलेले उपक्रम पूर्ण करता येतील आणि दीपावलीपर्यंतचे कार्यस्वरूपही निश्चित करू शकाल. अष्टमात सुरू होणाऱ्या रवी-शनी सहयोगातून शत्रू आणि आरोग्य यांचा त्रास होतो. अनपेक्षित काही निर्णय बदलावे लागणे शक्य आहे. परंतु प्रगती आणि प्रतिष्ठा यावर त्याचे परिणाम होणार नाहीत, निर्धाराने पुढे चला, परमेश्वरी चिंतनातून उत्साह वाढेल.
दिनांक :  १४, १५, १८, १९ शुभ काळ.
महिलांना : संधीतून समाधान मिळेल, प्रपंच प्रसन्न राहील.