Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१२
मेष : प्रवासात सतर्क राहा
मेष व्यक्तींनी घेतलेले निर्णय, केलेली कृती, दिलेले आश्वासन यासंबंधात दीपावलीपर्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. गुरुकृपा, शनीचे सहकार्य प्रतिष्ठेला धक्का बसू देणार नाहीत; परंतु प्रवास सोपा, सरळ होईल, अशा भरवशावर योजनांची निर्मिती करू नका. कोजागरी पौर्णिमा उत्साहाची राहील. व्यापारी देवघेव, शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्ये यांमध्ये सतर्कता अधिक यश देणारी ठरेल. नवीन मंडळी आपल्या उपक्रमात सहभागी होतील. सत्य आपले सतत संरक्षण करीत राहणार आहे.
दिनांक : २९ ते २ शुभ काळ.
महिलांना : अपेक्षा आणि कुशलता यांचा समन्वय संसार, समाजकार्यात सफलता देईल.
वृषभ : समीकरणे साधतील
राशिस्थानी गुरू, पंचमात शुक्र, वृश्चिक, मंगळ यांच्यामुळे उपक्रम आणि परिश्रम यांच्यातील समीकरणे अचूक साधता येतील. त्यात रवी-शनी सहयोगाच्या अडचणी असूनही शनिवापर्यंत सफलता मिळत राहील. शुक्र-हर्षल प्रतियोगाने प्रलोभनात अडकू नये याची मात्र काळजी ठेवा. पुढे चला, प्रपंच, प्राप्ती, प्रवास, परिचय, प्रस्ताव यामध्ये निर्णयात्मक कृती करू शकाल. कोजागरी पौर्णिमा आणि देवधर्म आनंद देतील.
दिनांक : ३१ ते ३ शुभ काळ.
महिलांना : दीपावलीतील योजना कृतीत येतील. शुभ कार्ये ठरतील.
मिथुन : रागरंग बघा, पुढे चला
मिथुन व्यक्तींचे प्रयत्न, यश आणि ठरवलेले उपक्रम व्ययस्थानी गुरू, अनिष्ट राहू, केतू, मंगळ यांच्या चक्रव्यूहात सापडणे शक्य आहे; परंतु संयम सोडू नका. रागरंग बघून पुढे चालत राहा. चतुर्थात शुक्र, पंचमात शनी सहकार्य करतील. त्याचा परिणाम नवे मार्ग शोधण्यात, मिळणारी सफलता, व्यापार, अर्थप्राप्ती, सामाजिक कार्ये यातील प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरेल. प्रतीक्षा आणि प्रार्थना शनिवारी होणाऱ्या चंद्राचा शनी, नेपच्यूनशी होणारा नवपंचम योग संपुष्टात आणू शकेल.
दिनांक : २८, २९, ३०, ३ शुभ काळ.
महिलांना : कष्टसाध्य यशाचा ग्रहकाळ आहे.
कर्क : उपक्रमाचे स्वरूप ठरेल
चतुर्थात रवी, शनी, पंचमात राहू-मंगळ दोन्ही सहयोग प्रश्नांमधून प्रतिकूलता निर्माण करणार असल्याने कार्य आणि कृती यामध्ये शनिवापर्यंत सावधच राहावे लागेल. गुरू, शुक्राची अनुकूलता नियमित व्यवहार सांभाळण्यास उपयुक्त ठरणारी आहे. कोजागरी पौर्णिमा त्यात उत्साह निर्माण करील. दीपावलीपर्यंतच्या उपक्रमांचे स्वरूप ठरविता येईल. भेटी, चर्चा, संपर्क यांचा त्यातील सहभाग यशस्वी होईल. आरोग्यावर मात्र लक्ष ठेवा.
दिनांक : २९ ते २ शुभ काळ.
महिलांना : साहसापेक्षा युक्तीचा उपयोग करा, यश निश्चित मिळेल.
सिंह : आव्हाने नियंत्रणात येतील
गुरू, बुध, शुक्र यांच्यातील प्रतियोग शनीच्या सहकार्यातून कार्यभाग साधण्यास सहकार्य करतील. कोजागरी पौर्णिमा त्याचा शुभारंभ करणारी आहे. शनिवारी चंद्राशी शनी-नेपच्यून यांच्याशी होणारे शुभ योग सफल कार्य व्यापक करू शकतात. सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक वर्तुळातील प्रवास यशस्वी होत राहील. चतुर्थातील मंगळ, राहू परिवारातील असंतोषातून नवी आव्हाने समोर उभी करतील. चंद्राच्या शुभ भ्रमणामुळे त्यावरही आपण नियंत्रण ठेवू शकाल.
दिनांक : २९ ते २ शुभ काळ.
महिलांना : अपेक्षित यशासाठी परिश्रम, हुशारीचा उपयोग मोठय़ा प्रमाणात करावा लागेल.
कन्या : स्पर्धेत संधी साधा
साडेसाती, रवी-शनी सहयोग आणि अनुकूल गुरू, शुक्र, बुध यांच्यातील अशुभ-शुभ घटनांची स्पर्धा निर्णयात्मक आपल्या बाजूने आणायची असेल तर शनिवापर्यंतचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. शिकस्तीचे प्रयत्न आणि कुशलता यातून संधीचा अचूक उपयोग करावा. व्यापार, अर्थप्राप्ती, कला, साहित्याचे विषय यात प्रभाव प्रस्थापित करणारे यश मिळवू शकाल. चुका, वेळेचा अपव्यय, वाद, प्रलोभन यांपासूनचा धोका मात्र लक्षात ठेवा आणि टाळा.
दिनांक : ३१, १, २, ३ शुभ काळ.
महिलांना : स्थगित प्रकरणे चर्चेतून पुढे सरकतील, संसार प्रसन्न ठेवाल, पैसा मिळेल.
तूळ : सहकार्याचा उपयोग करा
रवी-शनी सहयोग, मंगळ-राहू एकत्र यांच्यातील परिणाम अशुभ असतात. त्यातील तीव्रता कल्पना-कृती यश यांच्या समीकरणात सततचा व्यत्यय आणणारी असल्याने गुरुकृपेने मिळणाऱ्या यशावर समाधानी राहा आणि दीपावलीपर्यंतच्या उपक्रमांचा अचूक आढावा घ्यावा. शुभ ग्रहातील तीव्रता अल्पकाळानंतर संपणारी आहे. अधिकारी, सहकारी, परिचित यांचे सहकार्य नाकारू नका. प्रश्न प्रतिष्ठेत अडकवू नका.
दिनांक : २९, ३०, ३ शुभ काळ.
महिलांना : प्रतीक्षा प्रयत्नाने कमी करता येईल. हुशारीने यश सोपे होईल.
वृश्चिक : विचलित होऊ नका
राशिस्थानी राहू-मंगळ, व्ययस्थानी रवी-शनी यांच्यातील समस्या ठरविलेल्या उपक्रमांमध्ये अडचणी आणतच असतात. सहज सोपी वाटणारी प्रकरणेही त्यात अडकतात; परंतु विचलित होऊ नका. रविवारचा चंद्र-गुरू शुभ योग कोजागरी पौर्णिमेतील आनंद आणि लाभातील शुक्रामधून मिळणारा उत्साह यामुळे समस्या प्रतिष्ठेपर्यंत पोहोचू शकणार नाही. व्यापारी सौदे, आर्थिक प्रश्न, राजकीय चर्चा, प्रापंचिक प्रश्न यामध्ये संयम, शिस्त ही शस्त्रे आपले संरक्षण करतील.
दिनांक : २८, ३१, १, २ शुभ काळ.
महिलांना : अचूक अंदाज येईपर्यंत साहसी कृती नको, प्रपंच मात्र खूश राहील.
धनू : कल्पना कृतीत येतील
लाभातील बुध, शनी, दशमात शुक्र कोजागरी पौर्णिमा आणि शनिवारी चंद्राशी शनी-नेपच्यून यांच्याशी होणारे शुभ योग धनू व्यक्तींच्या कल्पना कृतीत येण्यासाठी सहकार्य करणारी ही ग्रहस्थिती आहे. त्याचा फायदा उद्योगातील यशापासून उपद्रवी शत्रूंना रोखण्यापर्यंत अनेक विभागांत होऊ शकेल. दीपावलीचे कार्यक्रम ठरविता येतील. राहू-मंगळ, गुरू कुंडलीत नाराज आहेत याचे स्मरण ठेवा. सत्य आणि आणि शिस्त याच मार्गाने त्यावर यश मिळविता येईल.
दिनांक : २९, ३०, ३ शुभ काळ.
महिलांना : दीपावलीपर्यंतच्या योजना कल्पनेमधून कृतीत येऊ लागतील.
मकर : ग्रह बैठक झकास
पंचमात गुरू, दशमात शनी, लाभात मंगळ, भाग्यात शुक्र राशिकुंडलीतील ग्रहबैठक झकास आहे. प्रयत्न, हुशारीचा समन्वय साधला तर प्रगतीचा वेग वाढेल आणि व्यापकता आकर्षक होईल. सोमवारच्या कोजागरी पौर्णिमेपासून प्रक्रियेला प्रारंभ होईल. व्यावसायिक सौदे, समाज उपक्रम, ठरणारे प्रवास, कला-साहित्याचे करार यामधून त्याची प्रचीती येत राहील. आरोग्याच्या तक्रारी, परिवारातील कुरबुरी यावर यशस्वी मार्ग शोधू शकाल. धर्मकार्य आनंद देईल.
दिनांक : २८, ३१, १, २ शुभ काळ.
महिलांना : प्रपंच, सामाजिक कार्य, सांस्कृतिक उपक्रम यामध्ये अचूक निर्णय यश देतील.
कुंभ : अवघड जबाबदाऱ्या नको
भाग्यात शनी, दशमात राहू यांचा आधार कार्यभाग साधण्यास उपयुक्त ठरेल. बुध, नेपच्यून केंद्रयोग शुक्र-हर्षल प्रतियोग प्रलोभन ते फसवणूक यामधून अडचणीत आणू शकतात. सध्या तरी अवघड जबाबदाऱ्या स्वीकारू नका. व्यापार, राजकारण, कलाप्रांतातील करार, जागेचे व्यवहार यात सावध राहा. संधी समोर येईपर्यंत साहसी प्रयोग करू नका. दीपावलीचे स्वरूप अंदाजाने ठरविता येईल. प्रवास संभवतात.
दिनांक : २८, २९, ३०, ३ शुभ काळ.
महिलांना : समस्यांशी सामना करून यश मिळवावे लागेल.
मीन : सीमारेषा सांभाळा
भाग्यात बुध-मंगळ, सप्तमात शुक्र, पराक्रमी गुरू या ग्रहांमधून मोठय़ा अपेक्षा पूर्ण होणे अवघड असते. तरी नियमित उपक्रम पूर्ण करणे शक्य होईल. व्यवहारातील प्रतिष्ठा त्यामुळे मजबूत राहील. अष्टमात रवी-शनी सहयोग, शुक्र-हर्षलचा प्रतियोग होत असल्याने शक्ती-बुद्धीच्या सीमारेषा सतत सांभाळणे आवश्यक असते. मिळालेल्या माहितीची खात्री करून घ्यावी. नंतर पुढची कृती करावी. परमेश्वरी प्रार्थना आनंद देईल.
दिनांक : २८ ते १ शुभकाळ.
महिलांना : मिळेल तेवढे यश पदरात पाडून घ्या.