Print

अरविंद पंचाक्षरी, नाशिक, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
(४ ते १० नोव्हेंबर २०१२)
मेष : वसुबारसपासून शुभ
दीपावली उपक्रम गुरूची कृपा, शनीचे सहकार्य यामधून पूर्ण करता येतील. मंगळाची दीर्घकालीन अनिष्टता दीपावलीपूर्वीच संपत असल्याने प्रयत्नात उत्साह असेल. कृतीत विश्वास राहील. शनिवारच्या वसुबारसपासून आगेकूच वेग घेत राहील. बाजारपेठेतील प्रतिष्ठा अर्थप्राप्तीला आकर्षक आकार देईल. शिक्षण, साहित्य विषयात प्रभाव ठेवता येईल. परिवारातील प्रश्न झटपट सोडविता येतील. अष्टमात राहू, नाराज बुध, शुक्र यांचे कार्यप्रांतातील अशुभ परिणाम हुशारीने दूर करता येतील.
दिनांक : ४, ५, ८, ९ शुभ काळ
महिलांना : प्रगतीची समीकरणे प्रयत्नाने सुटतील.
वृषभ : उत्साहाची ग्रहस्थिती
राशिस्थानी गुरू, पंचमात शुक्र, दीपावलीच्या पर्वात प्रसन्नता ठेवणारी ग्रहस्थिती परिवार ते व्यवहारात आपणास उत्साहित ठेवणारी आहे. त्यात अर्थप्राप्ती, आकर्षक खरेदी, ठरणारी शुभकार्ये, नवीन क्षेत्रातील निर्वेध होणारे प्रवेशमार्ग यांचा त्यात समावेश राहील; परंतु मंगळाचे राश्यांतर, रवी-शनी सहयोग असल्याने साहस आणि स्पर्धा असे प्रसंग टाळा. शुक्र-गुरू नवपंचमयोग कलाप्रांत आणि शिक्षण क्षेत्रात वृषभ व्यक्तींना अविस्मरणीय घटनांचा ठरेल.
दिनांक : ४ ते ७ शुभ काळ
महिलांना : अपेक्षित यशाचा आनंद प्रयत्नातून मिळविता येईल.
मिथुन : शनी, मंगळाचे सहकार्य
गुरू, राहू, केतू यांची अनिष्टता आणि समोरून दीपावली येत आहे. तणावात असलेल्या मिथुन व्यक्तींना पंचमातील शनी शुक्रवारचे मंगळ राश्यांतर यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे दीपावलीतले महत्त्वाचे बहुतेक उपक्रम हसतखेळत पूर्ण करता येतील. दडपण कमी होईल. उपासना, आराधना प्रसन्नता निर्माण करील आणि शुक्राची अनुकूलता संसारात आनंद देणारी आहे. आरोग्य आणि अधिकार या संबंधात लक्ष ठेवा. प्रवास होतील.
दिनांक : ४ ते ८ शुभ काळ
महिलांना : परिवारातून प्रतिसाद मिळेल. दीपावलीतला प्रवास निर्दोष ठेवता येईल.
कर्क : प्रभाव वाढत राहील
गुरूची अनुकूलता, पराक्रमी शुक्र, शुक्र-गुरूचा नवपंचम योग, शनिवारची वसुबारस म्हणजे दीपावली प्रारंभ- कर्क व्यक्ती नवीन कल्पना, नवीन योजनांसाठी त्याचा उपयोग करता येईल. पंचमातील राहूचे निर्दोष सहकार्य मुलांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. व्यापार, शिक्षण, कला, विज्ञान, अर्थप्राप्ती यामध्ये कर्क व्यक्तींचा प्रभाव सातत्याने वाढत राहणार आहे. षष्ठात येत असलेला मंगळ शत्रूंना पुढे सरकू देणार नाही.
दिनांक : ६ ते ९ शुभ काळ
महिलांना : संसार आणि सांस्कृतिक कार्यात चमकाल.
सिंह : प्रवास यशस्वी होईल
पराक्रमी शनी, दशमात गुरू, शुक्रवारी पंचमात येणारा मंगळ आणि शुक्र-गुरूचा नवपंचम योग- दीपावलीकडे सुरू होणारा प्रवास अधिकाधिक यशस्वी व्हावा असे प्रतिसाद या ग्रहांमधून प्रचीतीस येतील. रविवारच्या चंद्र-सूर्य नवपंचम योगापासूनच त्याचा प्रारंभ होईल. व्यापारी सौदे, सामाजिक कार्ये, सांस्कृतिक यश, सांसारिक कार्ये यामधून सिंह व्यक्ती प्रसन्न होत राहतील. अनपेक्षित नवीन मार्ग दृष्टिपथात येईल. त्यातून प्रगतीचा प्रवास वेगवान होईल.
दिनांक : ४ ते ७ शुभ काळ
महिलांना : प्रयत्नातून समीकरणे सुटतील, प्रपंच, प्राप्ती, प्रवास प्रसन्नता देईल.
कन्या : यश मिळेल
साडेसाती, रवी-शनी सहयोग, चतुर्थात प्रवेश करीत असलेला मंगळ अशा ग्रहकाळात प्रारंभापासून संरक्षण व्यवस्था मजबूत करून कार्यक्रमांना निर्णयकृतीमध्ये बसवावे. राशिस्थानी शुक्र, भाग्यात गुरू आणि शुक्र-गुरू नवपंचम योग यांचे प्रतिसाद अशा कार्यक्रमातून आकर्षक यश देऊ शकतात. उद्योग, अर्थप्राप्ती, सामाजिक उपक्रम, प्रपंचातील संधी यातून त्याची प्रचीती येईल. श्री मारुतीची उपासना, आराधना मन:शांतीसाठी उपयुक्त ठरेल.
दिनांक : ४ ते ७ शुभ काळ
महिलांना : योजना पुढे सरकतील, यश मिळत राहील.
तूळ : साहस टाळा, यश मिळवा
साडेसाती, अष्टमात गुरू आणि व्ययस्थानी शुक्र परिवार ते व्यवहार या मार्गावर नवे नवे प्रश्न निर्माण करणारी ग्रहस्थिती- उपक्रम छोटे असोत किंवा मोठे, अवास्तव साहस त्यात नको. त्यामुळे  नियमित उपक्रमांवर लक्ष केंद्रित करता येईल. शुक्रवारी मंगळ पराक्रमी प्रवेश करील आणि कार्यभाग साधणे सोपे होईल. चंद्रभ्रमणातील प्रतिसाद प्रयत्नातील उत्साह नवीन वर्तुळातील प्रवेश सोपा करणारा आहे.
दिनांक : ५ ते ९ येथे त्याची प्रचीती यावी.
महिलांना : प्रयत्न आणि संयम यातून समस्या सुटतील, प्रसन्नता मिळेल.
वृश्चिक : प्रसंगावर लक्ष ठेवा
गुरूची अनुकूलता, शुक्राचे सहकार्य आणि शुक्र-गुरूचा नवपंचम योग- वृश्चिक व्यक्तींचे अधिकाधिक परिश्रम सत्कारणी लावणारी ग्रहस्थिती आहे. साडेसाती, व्ययस्थानी सूर्य यांच्यातील समस्या शुक्रवारच्या मंगळ राश्यांतराच्या सहकार्याने नियंत्रणात आणता येतील. व्यापारी सौदे, आर्थिक देवघेव, राजकीय कृती, नवे करार या संबंधात प्रसंग आणि प्रतिनिधी यांच्या संबंधात सतर्क राहणे आवश्यक आहे. दीपावलीच्या योजना मार्गी लावता येतील.
दिनांक : ६ ते १० हा काळ त्यासाठी उपयुक्त ठरेल.
महिलांना : समस्यांच्या गर्दीतून सफलता मिळवावी लागेल. गुरुकृपा त्यात यश देईल.
धनू : अंदाज अचूक ठरतील
लाभातील शनीचे सहकार्य, दशमातील शुक्राची अनुकूलता, शुक्रवारी राशिस्थानी येत असलेला मंगळ, या ग्रहांमधील प्रतिसाद, योजनांची निर्मिती आणि मार्गाची निश्चिती यांच्यासाठी करून घेता येईल. दीपावलीचा प्रवास पुढे याच आधाराने सुरू ठेवता येईल. अनिष्ट राहू, केतू, गुरू यांचे अशुभ परिणाम संयम, शिस्त यांच्यातून नियंत्रणात ठेवता येतील. व्यापारी सौदे, सामाजिक चळवळी, कला, शिक्षण, साहित्य या संबंधातील अंदाज अचूक ठरतील. वाद, स्पर्धा नको.
दिनांक : ४, ५, ८, ९ शुभ काळ
महिलांना : प्रयत्नाला प्रतिसाद मिळेल, हुशारी यश देईल.
मकर : गणिते अचूक सुटतील
पंचमात गुरू, भाग्यात शुक्र, दशमात शनी आणि शुक्र-गुरूचा नवपंचम योग- व्यावहारिक प्रगतीची गणिते अचूक सोडविण्यासाठी या ग्रहपरिणामांचा लाभ होईल. पुढे दीपावली प्रवेश त्यामुळे सोपा होईल. धनू राशीतील मंगळाचा प्रवेश अर्थप्राप्तीची गणिते कोडय़ात टाकू शकतो. विचलित होऊ नका. व्यापार, राजकारण, कला, साहित्य यामध्ये नवीन पद्धती शोधा आणि स्वीकारा, यश मिळेल.
दिनांक : ६, ७, १० शुभ काळ
महिलांना : प्रपंचात खूश राहाल, आरोग्य सुधारेल, पाहुणे येतील.
कुंभ : संभ्रमात बदल नको
भाग्यात शनी, दशमात राहू, लाभात येणारा मंगळ- कार्यमार्गावरील बऱ्याच अडचणी दूर होतील. त्यामुळे निर्णयकृतीत उत्साह येईल. नवीन कार्यमार्ग निश्चित करू शकाल. रविवारच्या चंद्र-रवी नवपंचम योगापासून प्रक्रिया प्रत्ययास येऊ लागेल. चतुर्थात गुरू, अष्टमात शुक्र अल्पकाळ संभ्रमात टाकतील; परंतु व्यापार, कला, शिक्षण, राजकारण यात संभ्रमकाळात कोणतेही बदल करू नका. धर्मकार्य आनंद देईल. प्रवास कराल.
दिनांक : ४, ५, ८, ९ शुभ काळ
महिलांना : उपक्रम मार्गी लावून संसार खूश ठेवता येईल.
मीन : प्रशंसनीय यश
गुरूची अनुकूलता, खूश असलेले बुध-शुक्र आणि शुक्रवारचे मंगळ राश्यांतर- मीन व्यक्तींच्या कार्यपथावरील प्रवास वेगवान करणारी ग्रहस्थिती आहे. सोपे उपक्रम यशस्वी ठरतील. अवघड प्रकरणे मार्गी लावता येतील. अष्टमातील शनीची चिंता शुक्र-गुरू नवपंचम योगातून कमी होईल. राजकीय प्रभाव वाढेल, बाजारात नवी प्रतिमा तयार होईल. बौद्धिक वर्तुळात चमकाल, कला, साहित्यात प्रशंसा होत राहावी. शनिवारचा चंद्र-बुध शुभयोग त्यात सहभागी असेल.
दिनांक : ६, ७, १० शुभ काळ
महिलांना : संसार, समाजकार्ये, सांस्कृतिक प्रांत, यशस्वी कृतीमुळे प्रतिष्ठा वाढेल.