राज्यासाठी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारकडून येतो - सोनिया गांधी Print

alt

राजकोट, ३ ऑक्टोबर २०१२
लोकपाल, भ्रष्टाचार यांसारख्या विषयांवर भाजपच्या बोलण्यात आणि करण्यात जमीन-आसमानचा फरक आहे. राज्यासाठी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारकडून येतो, हे मोदी सरकार गुजरातच्या जनतेला सांगत नाही, असा आरोप सोनिया गांधींनी केला. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या निवडणुक प्रचाराची आज राजकोट येथून सुरूवात केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मात्र, एका बाजूला कॉंग्रेस पक्षाचे गुजरातच्या प्रगतीमधील योगदान विषद करतानाच आपल्या परदेश वारीवर मोदींनी केलेल्या आरोपाबाबत कोणतेही विधान करणे त्यांनी टाळले.
विरोधकांनी कितीही आरोप केले तरी राष्ट्रउभारणीसाठी कॉंग्रेस वचनबध्द आहे असल्याचे सांगत त्यांनी योग्य माहितीच्या आधारावर टिकेला प्रत्युत्तर देऊ असंही त्या म्हणाल्या. गुजरातमध्ये विकास कामांची सुरूवात आणि शेतक-यांसाठी विविध योजना कॉंग्रेसनेच जाहीर केल्या होत्या. भाजपने राज्यसभेत लोकपाल विधेयक अडवून ठेवल्यामुळेच ते अमलात येऊ शकले नाही, असं त्या म्हणाल्या. भाजप भ्रष्टाचाराविरोधात लढत नसून फक्त कॉंग्रेसच्या विरोधात लढत आहे. विदेशी गुंतवणूक स्वीकारायची की नाही हा प्रत्येक राज्याचा प्रश्न आहे, मग हा हंगामा कशाला, असा सवाल सोनिया गांधीनी उपस्थित केला. कॉंग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना तीन एलपीजी सिलेंडर अधिक मिळतात. मग, गुजरात सरकार ही योजना का राबवत नाही? असंही त्या पुढे म्हणाल्या. गुजरातमध्ये व्हॅट सर्वाधिक आहे, मग मोदी सरकार त्यामध्ये कपात का करत नाही? तसेच तेलांच्या किमतीबाबत राज्य सरकार जनतेच्या बाजूने का निर्णय घेत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.    
सोनिया गांधी सभेनंतर रॅलीमध्‍येही सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये  'सोनियांची क्रूरता' असे शीर्षक असलेल्या पत्रिकेचे वाटप करण्यात आले असून ती गुजराती भाषेत आहे.
गुजरातमध्ये महिला सुरक्षित नसून, जेव्हा दलित त्यांचे हक्क मागायला जातात तेव्हा त्याचे उत्तर त्यांना गोळीने मिळते, असं त्या म्हणाल्या. इतरांनी केलेल्या चांगल्या कामाचं श्रेय स्वत:कडे घेणं ही काही लोकांची सवयच आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मोदींना हाणला. गुजरातचे नागरिक त्यांच्या कष्टाने यशस्वी झाले आहेत. कॉंग्रेसने आजवर महात्मा गांधीच्या विचारांना धरून वाटचाल केली असून विरोधकांनी कितीही आरोप केले तरी राष्ट्रउभारणीसाठी कॉंग्रेस वचनबध्द असल्याचे त्या म्हणाल्या.