मध्य रेल्वेवरील १५ डब्यांची गाडी १५ ऑक्टोबरपासून Print

नवे वेळापत्रक जाहीर
प्रतिनिधी , मुंबई

मध्य रेल्वेवरील बहुचर्चित १५ डब्यांची उपनगरी गाडी अखेर १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मध्य रेल्वेवरील उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये १८ ने वाढ करण्यात आली आहे. तर रात्री ८ नंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणाऱ्या जलद गाडय़ांची संख्याही आता ८ वरून ११ करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचे बहुचर्चित उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रक बुधवारी अखेर जाहीर झाले असले तरी ते फक्त मेन लाइनचे आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गासाठी नव्या गाडय़ा आल्यानंतरच नवे वेळापत्रक जाहीर होणार आहे. मेन लाइनवरील उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या आता ७८५ ऐवजी ८०३ झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले.

१५ डब्यांची गाडी दिवसभरात १६ फेऱ्या करणार असून ऐन गर्दीच्या वेळेत पाच फेऱ्या वाढणार आहेत. जलद गाडय़ांच्या फेऱ्यांची संख्या २०६ वरून २३३ करण्यात आली आहे. १२ डब्यांच्या आठ फेऱ्या आता १५ डब्याच्या गाडीच्या फेऱ्यांमध्ये परीवर्तित करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ६.००, ८.२८, दुपारी १.००, ३.१७, ८.१० आणि ९.५४ वाजता ही गाडी सुटेल, दादर येथून सकाळी १०.४५ आणि सायंकाळी ५.२९ वाजता ही गाडी कल्याणच्या दिशेने निघेल. तर कल्याणहून सकाळी ७.१४, ९.५० (दादरसाठी), ११.४८, दुपारी २.०९, ४.२८, सायंकाळी ६.२४, रात्री ८.४६ आणि ११.०५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी ही गाडी सुटणार आहे. ही गाडी भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली या स्थानकांवर थांबणार आहे.
या व्यतिरिक्त दोन नव्या फेऱ्या ठाणे ते बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान तर एक फेरी कुर्ला ते टिटवाळा दरम्यान सुरू करण्यात आल्या आहेत.
रात्री ९.४० नंतर कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनस साठी तीन जलद गाडय़ा सोडण्यात येणार आहेत तर छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रात्री आठ नंतर सुटणाऱ्या जलद गाडय़ांच्या फेऱ्यांची संख्या ८ वरून ११ करण्यात आली आहे.