किंगफिशरची बेगमी महिन्याचीच Print

पीटीआय , मुंबई/नवी दिल्ली
सात महिन्यांच्या थकलेल्या पगारावरून किंगफिशर एअरलाइन्स व्यवस्थापन आणि अभियंते तसेच पायलट्स यांच्यात बुधवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली. किंगफिशरवरील संकट गडद झाले आहे. कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार देण्याचा  कंपनी व्यवस्थापनाचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांनी फेटाळून लावला, तर दुसरीकडे हवाई वाहतूक महासंचालनालयाने सुरक्षेची खातरजमा केल्याखेरीज किंगफिशरच्या विमानांना उड्डाणे करण्यास प्रतिबंध केल्याने कंपनीसमोरील समस्या आणखी वाढल्या आहेत.
कंपनी व्यवस्थापनाने एक महिन्याचा पगार तातडीने म्हणजे १५ ते २० दिवसांनी देण्याचे मान्य करून उर्वरित सहा महिन्यांचा थकीत पगारही उपलब्धीनुसार देण्यात येईल, असे संपकरी कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाचा प्रस्ताव फेटाळला आहे. कंपनीकडे पैसे नसल्यामुळे ते दिलेले आश्वासन पाळू शकत नाहीत. त्यामुळे पायलट्स आणि अभियंते आपला संप सुरूच ठेवणार असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी कॅप्टन विक्रांत पाटकर यांनी सांगितले.