मराठी पुस्तकांसाठी ऑनलाइन खरेदी लाखमोलाची! Print

शेखर जोशी , मुंबई

इंटरनेट, संगणकाचे आक्रमण आणि भ्रमणध्वनीच्या जाळ्यात अडकलेली आजची तरुण पिढी मराठी पुस्तके वाचत नाही, वाचनाची आवड कमी झाली आहे, पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तकांची खरेदी केली जात नाही, अशा तक्रारींचा सूर तीव्र  होत असतानाच, एक आशेची किनार आकार घेऊ लागली आहे. आंतरजालावरील विविध संकेतस्थळांवरून मराठी पुस्तकांची ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले असून, त्यांची वार्षिक उलाढाल काही लाखांच्या घरात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बुकगंगा, फ्लिपकार्ट, माय हँगआऊट स्टोअर, ग्रंथद्वार, रसिक साहित्य, मायबोली, सह्याद्री बुक्स, साहित्य संपदा, मी मराठी शॉप आदी संकेतस्थळे तसेच मेहता पब्लिशिंग हाऊस, पॉप्युलर, मोरया, ज्योत्स्ना आदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशा मराठी प्रकाशन संस्थांकडूनही त्यांच्या संकेतस्थळांवर मराठी पुस्तक खरेदीची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या साहाय्याने किंवा बँकेच्या खात्यात पैसे भरून पुस्तकांची खरेदी, पुस्तके थेट घरपोच मिळण्याची सुविधा, पुस्तक खरेदीवर १० ते ३० टक्के सवलत, पुस्तके हातात मिळाल्यानंतर पैसे देण्याची पद्धत आदींमुळे हल्लीची तरुण पिढी पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तके खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन पुस्तक खरेदीला अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
ऑनलाइन पुस्तकांच्या खरेदीचा वाढता कल ही स्वागतार्ह बाब आहे. आमच्या प्रकाशनाच्या संकेतस्थळावर शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे काही संच उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून चित्रकारांच्या चित्रांचे प्रात्यक्षिक, चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचे वॉलपेपर्स आदी मोफत डाऊनलोड करण्याची सोय आहे. लवकरच गोष्टींच्या पुस्तकातील एखाद्या गोष्टीचा ऑडिओ ट्रॅकही मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे यांनी सांगितले.     
१७ लाख वाचकांची भेट
* यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेपर्यंत ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी असणाऱ्या विविध संकेतस्थळांवर १७ लाख वाचकांची भेट. त्यातील ५७ टक्के वाचकांची ऑनलाइन पुस्तकांची खरेदी
* यातील काही टक्के वाटा मराठी पुस्तकांच्या खरेदीचा. २०११ मध्ये संकेतस्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या ११ लाख. यंदाच्या वर्षी त्यात सहा लाखांची भर.
(इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार)
पुस्तकविक्रीची संकेतस्थळे
बुकगंगा, फ्लिपकार्ट, माय हँगआऊट स्टोअर, ग्रंथद्वार, रसिक साहित्य, मायबोली, सह्याद्री बुक्स, साहित्य संपदा, मी मराठी शॉप आदी. तसेच मेहता पब्लिशिंग हाऊस, पॉप्युलर, मोरया, ज्योत्स्ना आदी मराठी प्रकाशन संस्थांची संकेतस्थळे.