सहा महिन्यांत सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधा Print

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
पीटीआय , नवी दिल्ली

देशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधांसह पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे येत्या सहा महिन्यांत उभारावीत, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. न्या. के. एस. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्रासह सर्व राज्य सरकारांना वेळेची मर्यादा आखून दिली आहे. एका जनहित याचिकेवर निर्णय देताना येत्या सहा महिन्यांत  देशातील सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सोयी पुरवाव्यात, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
गेल्या वर्षी १८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी तातडीने स्वच्छतागृहे उभारण्याचे निर्देश सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिले होते. शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव असल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना (विशेषत: मुलींना) शाळेत पाठविण्याचे बंद केल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मुलींसाठी तातडीने स्वच्छतागृहे उभारण्याचे आदेश दिले होते.