मोदीपरीक्षा डिसेंबरमध्ये Print

* गुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर
* भाजपची काँग्रेसशी टक्कर
पीटीआय , नवी दिल्ली - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

भाजपचे ‘सुपरहीरो’ समजले जाणारे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या दाव्याची परीक्षा पाहणाऱ्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने बुधवारी केली. गुजरातमध्ये येत्या १३ व १७ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत, तर हिमाचल प्रदेशमध्ये ४ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. गेली दहा वर्षे गुजरातमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे मोदी विकासकामांच्या जोरावर हॅट्ट्रिक साधतात की २००२च्या दंगली व बनावट चकमकींची प्रकरणे त्यांचा वारू रोखतात, याचा फैसला डिसेंबरमध्ये होणार आहे.

त्याचबरोबर घोटाळय़ांच्या आरोपांनी अडचणीत आलेल्या काँग्रेसला नुकत्याच अमलात आणलेल्या आर्थिक सुधारणांच्या लाटेवर किती यश मिळते, याचा अंदाजही या निवडणुकीतून येणार आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता असून, दोन्ही ठिकाणी त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस आहे. त्यामुळे या निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकांचे ‘मिनी ट्रेलर’ ठरण्याची शक्यता आहे. कोळसा खाणवाटप, स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल अशा घोटाळय़ांच्या आरोपांनी अडचणीत आलेल्या काँग्रेससाठी ही काटय़ाची टक्कर असून, या निवडणुकीत मिळणाऱ्या यशाच्या आधारे त्यांना जनमताची चाचपणी करता येणार आहे.
रणधुमाळी विधानसभेची
गुजरात
एकूण जागा : १८२
मतदानाची तारीख : १३ व १७ डिसेंबर
सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप : ११७
काँग्रेस : ५९
इतर  : ६
हिमाचल प्रदेश
एकूण जागा : ६८
मतदानाची तारीख : ४ नोव्हेंबर
सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप : ४१
काँग्रेस : १९
इतर : ८
मतमोजणी २० डिसेंबर