शिवसेनेच्या दडपणाने आठवलेंची आरक्षणाला बगल Print

खास प्रतिनिधी / मुंबई

रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले, परंतु पदोन्नतीतील आरक्षण, सवर्णाना  २५ टक्के आरक्षण, दलित अत्याचार या प्रश्नांवर आंदोलन करण्याच्या आदल्या दिवशी घेतलेल्या निर्णयाची घोषणा करण्याचे त्यांनी टाळले. शिवसेनेच्या दडपणामुळे त्यांनी आरक्षण या विषयालाही बगल दिल्याची चर्चा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी वांद्रे येथे एमआयजी क्लबवर रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीला जवळपास २० राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत दलित, आदिवासी व ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता उच्चवर्णीयांना शासकीय नोकऱ्या व शिक्षणात २५ टक्के आरक्षण देण्यात यावे आणि केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने आणलेले मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देणारे विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मंजूर करावे, असे ठराव करण्यात आले. या दोन मागण्यांसह दलितांवरील वाढते अत्याचार, महागाई, भ्रष्टाचार आदी प्रश्नांवर २९ नोव्हेंबरला दिल्लीत संसद भवनावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मेळाव्यात यासंदर्भात घोषणा करण्यात येणार होती, परंतु आठवले यांच्या भाषणात त्याचा उल्लेख न झाल्याने कार्यकर्तेही गोंधळात पडले आहेत.
मेळाव्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची राज्यातील आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारावर आसूड ओढणारी भाषणे झाली. आठवले यांनीही त्यांच्याच सुरात सूर मिसळला. इंदू मिल जमिनीच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा उल्लेख तेवढा त्यांनी केला. मुंबई आरपीआयचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी त्यांना आरक्षणाच्या विषयाची आठवण करून दिली, मग आठवले यांनी पदोन्नतीतील आरक्षणाचा ओझरता उल्लेख केला, त्यावरही त्यांनी काँग्रेसने अयोग्य वेळी हे विधेयक आणले, असा टीकेचा सूर लावला. एकूणच आरक्षणाला शिवसेनेचा विरोध आहे, व्यासपीठावर उद्धव ठाकरे होते, त्यामुळेच आठवले यांनी आरक्षणाच्या विषयावर भाष्य करण्याचे टाळल्याची चर्चा आहे.