किंग ऑफ बॅड टाइम्स! Print

किंगफिशरचे संकट आणखी गहिरे
व्यापार प्रतिनिधी ,मुंबई

मर्यादित टाळेबंदीसह तिकीट विक्री, उड्डाणे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनाला अधिक विलंब लावणाऱ्या किंगफिशर एअरलाइन्ससमोर संकटांची मालिका निर्माण झाल्याने ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ असे बिरूद मिरवणाऱ्या या कंपनीची अवस्था ‘किंग ऑफ बॅड टाइम्स’ अशी झाली आहे.
कंपनी सचिवाचा राजीनामा
किंगफिशर एअरलाईन्सचे कंपनी सचिव भारत राघवन यांनी राजीनामा गुरुवारी राजीनामा दिला. कंपनीच्या अंशत: टाळेबंदीचा गुरुवारी शेवटचा दिवस असतानाच राघवन यांनी राजीनामा दिला आहे. वाढत्या तोटय़ाचा सामना करावे लागलेल्या या कंपनीतून गेल्या अनेक महिन्यांमध्ये २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी सेवेवर पाणी सोडले आहे.

यामध्ये वैमानिकांचा अधिकतर समावेश आहे. किंगफिशरच्या अन्य उर्वरित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांनाही गेल्या अनेक महिन्यांपासून मासिक वेतन मिळालेले नाही.
कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या
वित्तीय संकटातील किंगफिशर एअरलाईन्समधील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने गुरुवारी आत्महत्या केली. गेल्या पाच महिन्यांपासून पतीला पगार मिळत नसल्याने आर्थिक चणचणीपोटी ४५ वर्षीय सुश्मिता चक्रवर्ती यांनी आत्महत्या केल्याचे सांगतिले जाते. पती मानस चक्रवर्ती हे कंपनीत विमान हाताळणी विभागात कार्यरत होते. सुश्मिता यांनी त्यांच्या दिल्लीतील मंगलपुरी भागातील राहत्या फ्लॅटमध्ये दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याजवळून आर्थिक समस्येमुळे आत्महत्या केल्याची चिठ्ठी पोलिसांना आढळून आली.