टीम केजरीवालचे रॉबर्ट वडेरांवर भ्रष्टाचाराचे आरोप Print

alt

नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर २०१२
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे जावई आणि प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वडेरा यांच्यावर टीम केजरीवालनी आज (शुक्रवार) भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. रॉबर्ट वडेरांची मालमत्ता ५० लाखांवरून ३०० कोटींवर कशी गेली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत ते बालत होते. वडेरा यांनी ३०० कोटींची मालमत्ता ५० लाखांना कशी विकत घेतली, असा प्रश्न टीम केजरीवालचे सदस्य प्रशांत भूषण यांनी विचारला आहे.
टि टे्वन्टी क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक असणा-या 'डिएलएफ' कंपनीला दिल्ली, हरयाणा येथे जमिनी मिळाल्या आहेत आणि त्यासाठी रॉबर्ट बडेरा यांनी मदत केली असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. रॉबर्ट वडेरा यांना 'डिएलएफ'कडून बीनव्याजी कर्ज कसे दिले गेले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वडेरा यांनी २०१२ मध्ये सहा नवीन कंपन्या स्थापन केल्याचेही त्यांनी म्हटले.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलन छेडणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फारकत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गांधी जयंतीचे निमित्तसाधून २ ऑक्टोबरला नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. मात्र आपल्या पक्षाचे नाव गुलदस्त्यात ठेवतानाच व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपला पक्ष कटिबद्ध राहील, अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिली. देशाची राज्यघटना अमलात आल्याच्या दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर रोजी केजरीवाल आपल्या पक्षाचे नाव जाहीर करणार आहेत.