वेस्ट इंडिजच्या आक्रमणापुढे ऑस्ट्रेलिया नतमस्तक Print

प्रशांत केणी, कोलंबो
शुक्रवारची रात्र साक्षात ‘बरसात की एक रात’च होती. त्याचे दोन भले-बुरे रंग क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी १४ षटकार आणि १३ चौकारांची ‘बरसात’ करीत धावफलकावर दोनशेचा टप्पा ओलांडला, तेव्हाच डॅरेन सॅमीच्या सेनेने अर्धी लढाई जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कॅरेबियन गोलंदाजांपुढे अक्षरश: शरणागती पत्करली. तब्बल ७४ धावांनी ऑस्ट्रेलियाला हरविल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाने आपल्या खास ‘कॅलिप्सो’ नृत्याच्या शैलीत विजयाचा जल्लोष साजरा केला. आता रविवारी रात्री श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विजेता चौथ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरेल.