भाडे नाकारल्यास १००० रुपये दंड Print

प्रतिनिधी
मुंबई
रिक्षा किंवा टॅक्सीचालकाने यापुढे भाडे नाकारल्यास त्याला किमान १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यास आणि त्याला सहकार्य करणाऱ्यास फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याला सामोरे जावे लागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ शुक्रवारी जाहीर झाली तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाडे नाकारणाऱ्या तसेच मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परिवहन विभागानेही तीन महिन्यापूर्वीच भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यांच्यावर होणारी दंडात्मक कारवाईची रक्कम तीन पटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी रिक्षा किंवा टॅक्सीचालकांनी भाडे नाकारल्याची तक्रार एखाद्या प्रवाशाने केली तर त्याला २५० रुपये दंड होता.