वढेरांच्या चौकशीची मागणी फेटाळली Print

काँग्रेस, सरकारकडून सोनियांचे समर्थन
विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली
केंद्रातील सत्ताधारी यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई व प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या शेकडो कोटींच्या मालमत्तेवरून शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच राहिल्या. वढेरा यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यांच्या चौकशीची मागणी यूपीए सरकार आणि काँग्रेसने फेटाळून लावली आहे. हा दोन व्यक्तींमध्ये झालेला व्यवहार असून, त्यावर प्रश्नचिन्ह लावता येणार नाही, असा बचाव केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला.
या प्रकरणी कसली चौकशी करायची आहे, असा प्रतिसवाल काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला. दोन खासगी व्यक्तींमध्ये झालेला व्यवहार बेकायदेशीर असतो काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केजरीवाल म्हणजे भाजपचा दुय्यम संघ असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपले आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध झाल्यास अब्रुनुकसानीच्या दाव्याला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरिवद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. बांधकाम व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी डीएलएफने वढेरा यांना विनातारण व बिनव्याजाचे ६५ कोटी रुपये दिले आणि त्याच पैशातून त्यांनी डीएलएफकडून अत्यंत स्वस्त दरात अतिशय महागडे आलिशान बंगले आणि फ्लॅट खरेदी केले. खरेदीच्या वेळी या संपत्तीचा बाजारदर तीनशे कोटी रुपये होता आणि आता तो ५०० कोटींवर पोहोचला असल्याचा दावा केजरीवाल आणि त्यांचे सहकारी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी शुक्रवारी केला होता. आपल्या आरोपांवर ठाम राहताना केजरीवाल यांनी या प्रकरणी बदनामीच्या खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दाखविली.
वढेरा यांच्या निमित्ताने थेट सोनिया गांधी यांनाच लक्ष्य करण्यात येत असल्यामुळे काँग्रेसचे नेते गांधी कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. केंद्रीय विधी व न्यायमंत्री सलमान खुर्शीद यांनी तर सोनियांसाठी आपण जीव द्यायलाही तयार असल्याचे जाहीर केले. या प्रकरणाशी सोनिया गांधींचा कवडीचाही संबंध नसताना त्यांचे नाव या वादात ओढले जात असल्याची टीका खुर्शीद यांनी केली. वढेरा यांच्यावर कोटय़वधींच्या घोटाळ्याचे आरोप करण्यामागे हा ‘जिजाजी घोटाळा’ असल्याचे व्यंग भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्मृती इराणी यांनी केले. डीएलएफ आणि वढेरा यांच्यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी माकपच्या नेत्या वृंदा करात यांनीही केली आहे. केजरीवाल निर्थक आरोप करीत असल्याची टीका राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी केली. समाजवादी पक्षाचे नेते व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र या मुद्दय़ाावर मौन बाळगले आहे, पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आजम खान यांनी मात्र वढेरा यांच्यावर टीकास्त्र सोडले.     

आरोपांमागे भाजप नेता?
सोनिया गांधी तसेच प्रियांका आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे काँग्रेसजनांचे म्हणणे  आहे. या आरोपांमागे भाजपच्या दिल्लीतील एका महत्त्वाकांक्षी नेत्याची प्रेरणा असल्याचाही संशय काँग्रेसच्या गोटात व्यक्त करण्यात येत आहे.

परिस्थितीला सामोरे जाऊ
आपण कोणत्याही नकारात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. आपण कोणतीही परिस्थिती हाताळू शकतो, असे रॉबर्ट वढेरा यांनी म्हटले आहे.