शेअर बाजारातील गहजबाची चौकशी Print

अर्थमंत्री चिदम्बरम यांची माहिती

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
राष्ट्रीय शेअर बाजारात शुक्रवारी अवघ्या दोन मिनिटांत उडालेल्या गहजबाची खुद्द ‘एनएसई’ तसेच ‘सेबी’द्वारे चौकशी होत असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी शनिवारी दिली. राष्ट्रीय शेअर बाजारात घडलेल्या या घटनेबाबत काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी फेटाळून लावला. या प्रकरणात राष्ट्रीय शेअर बाजार व सेबीकडून संपूर्ण चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
नव्याने केंद्रीय अर्थमंत्री झाल्यानंतर चिदम्बरम यांचा मुंबईतील हा पहिला दौरा होता. त्यांनी आर्थिक राजधानीत मुख्यालय असलेल्या नियामक संस्थांच्या प्रमुखांशी दिवसभरात गाठीभेटी घेतल्या. यामध्ये भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव, सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांचा समावेश होता. यानंतर सायंकाळी उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा, वाहन, माहिती तंत्रज्ञानसारख्या क्षेत्रांतही अधिक गुंतवणूक होण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. राष्ट्रीय शेअर बाजारातील शुक्रवारी उडालेला गोंधळ ताजा असताना अर्थमंत्र्यांनी लगोलग मुंबईत दाखल होत प्रमुख बाजार नियंत्रकांशी चर्चा करणे गुंतवणूकदार जगतासाठी आशादायी पाऊल ठरले.
भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने कायम असली तरी सरकार राबवत असलेल्या आर्थिक सुधारणांची मालिका यापुढेही कायम राहील, असा विश्वास चिदम्बरम यांनी शनिवारी व्यक्त केला. विमा तसेच निवृत्तीवेतन क्षेत्रांतील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीबाबतच्या विधेयकासह, नवे बँक नियामक विधेयकही संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.     

वढेराप्रकरणी तपास
सत्ताधारी आघाडीच्या प्रमुख आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा आणि ‘डीएलएफ’ या बांधकाम क्षेत्रातील कंपनीदरम्यानचे कथित व्यवहार प्राप्तीकर विभाग तपासत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.