आशा भोसले यांच्या मुलीची आत्महत्या Print

alt

‘प्रभुकुंज’मधील दुर्घटना, कारण अद्याप अज्ञात
प्रतिनिधी , मुंबई
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची मुलगी वर्षां भोसले (५६) यांनी सोमवारी प्रभुकुंज येथील आपल्या राहत्या घरी बंदुकीची गोळी डोक्यात झाडून आत्महत्या केली. वर्षां यांनी आत्महत्या केली त्या वेळी घरात कुणीच नसल्याने दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी लिहून ठेवलेली नव्हती. त्यामुळे या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आशा भोसले सिंगापूर येथे मिफ्टा पुरस्कार सोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्या सोमवारी रात्री उशिरा परतल्या. मंगळवारी सकाळी वर्षां यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमी येथे अन्त्यसंस्कार होणार असल्याचे समजते.
 वर्षां भोसले या पेडर रोडवरील ‘प्रभुकुंज’ या इमारतीमध्ये आशा भोसले यांच्या सोबत राहत होत्या. सोमवारी सकाळी त्यांच्या घरी काम करणाऱ्या दीपाली माने हिने दरवाजा ठोठावूनही तो उघडला गेला नाही.  त्यानंतर दीपालीने आशा भोसले यांच्या चालकाला बोलावले. त्या दोघांनी मिळून लता मंगेशकर यांच्या घरातून आशा भोसले यांच्या घरात प्रवेश मिळवला. त्या वेळी वर्षां यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.  अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,  १९९८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून त्या निराश होत्या. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांनी बेल्जिअम बनावटीच्या ०.६ एमएम या पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.  हे पिस्तुल आशा भोसले यांचे कनिष्ठ पुत्र हेमंत यांचे असल्याचे   पोलिसांनी सांगितले.