शिक्षकांनी नालायक ठरवलेला नोबेल विजेता ठरला! Print

पीटीआय , लंडन
जॉन गुरडॉन शिन्या यामानाका

शाळेतल्या अभ्यासात जो नालायक ठरतो तो पुढे जाऊन काही तरी करून दाखवतो, असे अनेक वैज्ञानिकांच्या आयुष्यातील कथा वाचल्यावर नेहमीच जाणवते. ब्रिटनचे वैज्ञानिक जॉन गुरडॉन यांना सोमवारी वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. त्यांनाही त्यांच्या शिक्षकांनी विज्ञानाचा अभ्यास करून वैज्ञानिक होण्याचे स्वप्न बाळगून वेळ वाया घालवू नकोस, असा प्रेमाचा सल्ला दिला होता. त्यांनी आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे तो मानला असता तर आज आपण एका वेगळय़ा संशोधकाला मुकलो असतो.


गुरडॉन यांच्या केंब्रिज येथील संशोधन कार्यालयात सोमवारी आनंदाचा सोहळा होता. तेथे त्यांचे जीर्ण झालेल्या कागदावरचे शाळेतील प्रगतिपुस्तक भिंतीवर लावले होते, असे वेलकम ट्रस्टने सांगितले. तेथे गुरडॉन हे अगोदर काम करीत होते. त्यांच्या प्रगतिपुस्तकात म्हटले आहे, की गुरडॉनला वैज्ञानिक बनायचे आहे, पण त्याची ही कल्पना फार खुळचट आहे. त्याने विज्ञानाचा अभ्यास करण्यात वेळ वाया घालवू नये, शिक्षकांचा वेळ वाया घालवू नये. त्याच्या शाळाशिक्षकांचे हे मूल्यमापन गुरडॉन यांनी खोटे ठरवले. त्यांनी विज्ञानावर खरे प्रेम केले अन् विज्ञानानेही त्यांना नोबेलचे मानकरी केले.
कर्तृत्ववान माणसाला नशीबसुद्धा साथ देते असे म्हणतात, तसे काहीसे गुरडॉन यांच्याबाबतीत झाले. ९० टक्के वेळा हवे तसे घडत नाही, पण जेव्हा ते घडते तेव्हा संधी सोडायची नसते, असेच त्यांचे तत्त्व आहे. त्यांच्या त्या प्रगतिपुस्तकात शिक्षकांनी लिहिले आहे, की जॉन नीट लक्ष देत नाही, पण तो जे करतो ते मन लावून करतो, त्यामुळेच तर गुरडॉन यांना नोबेल मिळाले.        
गुरडॉन, यामानाका यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल
स्टॉकहोम :  परिपक्व व विशेष पेशींचे रूपांतर मूलपेशीत करण्याचे तंत्र शोधून काढणाऱ्या ब्रिटनच्या जॉन गुरडॉन आणि जपानच्या शिन्या यामानाका यांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. सोमवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मूलपेशी संशोधनासाठी यामानाका हे गेली काही वर्षे नोबेल पारितोषिकाच्या दावेदारात होते; आता त्यांच्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोघांच्या संशोधनामुळे मानवी रोगांवरील मूलपेशी उपचारांत एक नवी आशा निर्माण झाली आहे.