वारे मध्यावधीचे Print

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२

किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यापासून निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष या सरकारमधील मित्रपक्षांनीच बुधवारी आणखी खतपाणी घातले. देशात राजकीय अस्थिरता वाढली असून पक्षातील कार्यकर्त्यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बसपच्या प्रमुख मायावती यांनी आपापल्या पक्षांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिला. तर दुसरीकडे, भाजपने गोपीनाथ मुंडेंकडे महाराष्ट्रातील निवडणुकांची जबाबदारी सोपवून मध्यावधीसाठी सज्जता सुरू केली. या पाश्र्वभूमीवर देशात मध्यावधी निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत.   

 

भाजपचा ‘झेंडा’ मुंडेंच्या खांद्यावर!

मुंबई : भाजपमध्ये केंद्रीय पातळीवर मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे ‘घुसमटत’ असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे राज्यातील सर्वाधिकार देत त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय भाजपने बुधवारी जाहीर केला आहे. त्यामुळे आता मुंडेंचा झंझावात राज्यात पुन्हा सुरू होणार आहे. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा निर्धार  व्यक्त करून मुंडे यांनी आगामी रणनीतीचे संकेत दिले.       

‘हत्ती’ची तिरकी चाल!
लखनऊ :
केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायचा की नाही यासंदर्भातील निर्णय बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी गुलदस्त्यातच ठेवला असतानाच मध्यावधी निवडणुकांना तयार राहण्याचे संकेत पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. मायावतींच्या या दबावतंत्राला काँग्रेसने मात्र फारशी किंमत न देता, त्या कोणताही निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचे स्पष्ट केले आहे.

कामाला लागा, पवारांचा आदेश
मुंबई :
लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका केव्हाही होण्याची शक्यता असल्याने तयारी सुरू करा, असा संदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्याने, केंद्रातील अस्थिर राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांचे वारे आणखीनच गडद झाले आहेत. गुजरातेत बडोदा येथे सुरू असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर बोलताना पवार यांनी मध्यवधी निवडणुकांची शक्यता वर्तविली.राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची आधीच तयारी सुरू केली असून, लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर पवा्रर म्हणाले,‘आम्ही आमच्या मित्र पक्षांनाही निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.’ त्याचवेळी, सध्यातरी यूपीए सरकारला कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुजरात विधानसभा निवडणुकीकरिता गेल्या वेळप्रमाणेच काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी पवार यांनी दर्शविली. मात्र, पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.