मध्य रेल्वेवर जलद फेऱ्यांची संख्या वाढली Print

प्रतिनिधी , मुंबई

मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक सोमवारपासून अमलात येत असून १५ डब्यांच्या गाडय़ांच्या १६ फेऱ्यांसह एकूण १८ फेऱ्यांची भर पडली आहे. रात्री आठनंतर जलद गाडय़ा वाढविण्याची मागणी होती, पण प्रशासनाने केवळ तीन गाडय़ा वाढवून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या चाकरमान्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. प्रशासनाने १५ डब्यांच्या गाडीची घोषणा केली खरी, पण १२ डब्यांच्या गाडय़ांच्या आठ फेऱ्या कमी त्या १५ डब्यांच्या केल्याने प्रवाशांना फारसा दिलासा मिळणार नाही. ऐन गर्दीच्या वेळेत केवळ पाच फेऱ्यांची भर पडल्याने उपनगरी गाडय़ांमधील प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचे चित्र कायमच राहणार आहे.
मध्य रेल्वेवर पाचवा-सहावा मार्ग सुरू झाल्यावर उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण उपनगरी गाडय़ांचे रेक उपलब्ध होत नसल्याने नवीन वेळापत्रकात गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना १५ डब्यांची गाडी मिळणार, एवढाच काय तो दिलासा आहे.
१५ डब्यांच्या गाडय़ांच्या चार फेऱ्या दादर-कल्याण दरम्यान असून सीएसटी-कल्याण दरम्यान १२ फेऱ्या असतील. ही गाडी भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली या स्थानकावर थांबेल. सीएसटीहून रात्री ८.४७ नंतर कसाऱ्याच्या प्रवाशांसाठी जलद गाडी नव्हती. त्यांना आता रात्री १०.५० वाजता जलद गाडीने जाता येणार आहे.
कर्जतला जाणाऱ्या प्रवाशांना रात्री ९.२० तर बदलापूरकरांसाठी रात्री १०.२५ ला सीएसटीहून जलद गाडी सुटणार आहे.
१५ डब्यांच्या गाडय़ांचे वेळापत्रक
१५ डब्यांची गाडी चालविण्यासाठी १२ डब्यांच्या आठ फेऱ्या १५ डब्यांच्या गाडीच्या फेऱ्यांमध्ये परावर्तित करण्यात आल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी १५ डब्यांची गाडी सकाळी कल्याण येथून ७.१४ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी तर दादरसाठी ९.५० वाजता सुटेल तर छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सायंकाळी ७.३३ आणि ९.५४ वाजता कल्याणसाठी सुटेल. या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ६.०६, ८.२८, दुपारी एक वाजता, ३.१७, दादर येथून सकाळी १०.४५ आणि सायंकाळी ५.२९, कल्याण येथून दादरसाठी सकाळी ९.५०, छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी ११.४८, दुपारी २.०९, ४.२८, ६.२४ आणि रात्री ८.४६ व ११.०५ वाजता सुटेल.
नवीन धीम्या मार्गावरील फेऱ्या
विद्याविहार ते टिटवाळा (सकाळी ५.१२), कुर्ला ते कल्याण (सकाळी ९.२०), ठाणे ते बदलापूर (दुपारी १.०५), छत्रपती शिवाजी टर्मिनस ते डोंबिवली (दुपारी २.४८), छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे (दुपारी ४.३८), ठाणे ते अंबरनाथ (रात्री ८.३८), दादर ते ठाणे (रात्री ९.३९), छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला (रात्री १०.०६), छत्रपती शिवाजी टर्मिनस ते टिटवाळा (रात्री ११.२०) टिटवाळा ते कुर्ला (सकाळी ६.५०), कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सकाळी ९.३९), बदलापूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (जलद, दुपारी २.११), डोंबिवली ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (दुपारी ३.३४), कल्याण ते ठाणे (दुपारी ३.२१), कल्याण ते ठाणे (दुपारी ४.००), बदलापूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (रात्री १०.००).    
जलद गाडय़ांच्या नवीन वाढीव फेऱ्या-  छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कर्जत (सकाळी ६.१६), खोपोली (दुपारी १२.१९), कसारा (अर्ध जलद, दुपारी १२.३३), आसनगाव (अर्ध जलद, दुपारी १२.५५), कर्जत (दुपारी १.१०), आसनगाव (अर्ध जलद, २.४०), आसनगाव (अर्ध जलद, ३.३९), बदलापूर (दुपारी ३.५३), आसनगाव (अर्ध जलद, ४.१५), कर्जत (दुपारी ४.१०), बदलापूर (सायंकाळी ७.२४), खोपोली (रात्री ८.४०), कर्जत (रात्री ९.२०), बदलापूर (रात्री १०.२५), कसारा (रात्री १०.५०).