रेल्वेच्या गर्दीचे विद्यार्थ्यांसह दोन बळी Print

दोन प्रवासी जखमी  माटुंगा-शीव दरम्यानची दुर्घटना
प्रतिनिधी , मुंबई - शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडीतील नेहमीच्या ‘जीवघेण्या’ गर्दीने गुरुवारी एका शाळकरी विद्यार्थ्यांसह दोघांचा बळी घेतला. दादर स्थानकात उतरू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी दरवाजात केलेली गर्दी, त्यातून झालेली धक्काबुक्की यामुळे चालत्या गाडीतून खाली पडून या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. शीव आणि माटुंगा स्थानकांदरम्यान गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. केदार नारायण यादव (२८) आणि सतीश कुकैया (१६) हा विद्यार्थी अशी मृतांची नावे असून, उदयप्रकाश शर्मा (३१) आणि झिया उल रसूल (२६) हे जखमी झाले आहेत.

हे चौघेही जण शीव येथे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघालेल्या गाडीत चढले होते. गाडीमध्ये नेहमीप्रमाणेच प्रचंड गर्दी होती. आत शिरायलाही जागा नव्हती. शाळेत जाण्यास उशीर नको म्हणून गर्दी असूनही सतीश गाडीत चढला होता. परळला उतरायचे असल्यामुळे तो आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. गाडीत दादरला उतरणाऱ्यांनी दरवाजात गर्दी केल्यामुळे त्याला आतही जाता येत नव्हते. त्यातच पाठीवर असणाऱ्या अनेकांच्या सॅकमुळे जागा अडली होती. दरवाजातील प्रवाशांमध्येही तेथे उभे राहण्यावरून वाद सुरू होता. आतही धक्काबुक्की सुरू होती आणि बाहेरचे कसेबसे स्वत:चा तोल सावरत होते. त्यातच अचानक सतीशचा हात सुटला.  त्याने मदतीसाठी पाठीमागच्याला धरण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरलाच पण त्याच्यापाठोपाठ आणखी तिघे खाली घसरले.  
हा अपघात ज्या ठिकाणी झाला तेथे काम करीत असलेल्या रेल्वे कामगारांनी त्या चौघांना दहा मिनिटांतच इस्पितळात नेले. मात्र उपचारादरम्यान केदार नारायण यादव आणि सतीश कुकैया हे दोघे मरण पावले. सतीश हा परळ येथील पालिका शाळेतील दहावीचा विद्यार्थी असून तो धारावीत राहणारा आहे.
गाडीतून पडून मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी
२०१० : ७३४ (मध्य रेल्वे : ५१९, पश्चिम रेल्वे : २१५)
२०११ : ७३६ (मध्य रेल्वे : ५१३, पश्चिम रेल्वे : २२३)
२०१२ : ५६९ (मध्य रेल्वे : ३८६, पश्चिम रेल्वे : १८३)
गाडीतून पडून जखमी झालेल्यांची आकडेवारी
२०१० : १९४२ (मध्य रेल्वे : ११३०, पश्चिम रेल्वे : ८१२)
२०११ : १९८८ (मध्य रेल्वे : ११८६, पश्चिम रेल्वे : ८०२)
२०१२ : १४५६ (मध्य रेल्वे : ८५३, पश्चिम रेल्वे : ६०३)