प. बंगालमध्ये राष्ट्रपतीपुत्राचा निसटता विजय Print

पोटनिवडणूक निकाल : टिहरीत मुख्यमंत्रीपुत्राचा पराभव
पीटीआय
दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये प्रतिष्ठेची मानली जाणारी जांगीपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र व काँग्रेस उमेदवार अभिजित मुखर्जी यांनी अवघ्या २५३६ मतांच्या फरकाने जिंकली. त्यांनी माकपचे प्रतिस्पर्धी मुझफ्फर हुसेन यांचा पराभव केला. अभिजित यांना ३,३२,९१९ मते पडली आहेत तर माकपचे हुसेन यांना ३,३०,३८३ मते पडली आहेत असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान उत्तराखंडमधील टिहरी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार माला राजलक्ष्मी शहा यांनी काँग्रेसचे साकेत बहुगुणा यांचा पराभव केला आहे.
जांगीपूरमधील भाजपचे उमेदवार सुधांशु बिस्वास यांना ८५,८६७ मते पडली आहेत. दोन अपक्ष उमेदवार रशीदउद्दीन व तहेदुल इस्लाम यांना अनुक्रमे ४१,६२० व २४,६९१ मते पडली आहेत. तृणमूल काँग्रेसने या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता. प्रणव मुखर्जी यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत १.२८ लाख मतांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्याने या मतदारसंघात १० ऑक्टोबरला पोटनिवडणूक घेण्यात आली. टिहरी लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पुत्र साकेत बहुगुणा व टिहरी संस्थानचे राजे मानवेंद्र शहा यांच्या स्नुषा व भाजप उमेदवार माला राजलक्ष्मी शहा यांच्यात लढत झाली त्यात शहा यांनी २२४३१ मतांनी विजय मिळवला. शहा यांना २,४५,२९२ मते पडली तर बहुगुणा यांना २,२२,८६१ मते पडली. मानवेंद्र शहा यांनी या टिहरीचे आठवेळा प्रतिनिधीत्व केले होते.