केंद्रात मंत्रिमंडळ खांदेपालट शुक्रवापर्यंत? Print

* पितृपक्ष संपताच हालचाली सुरू
* पंतप्रधान, सोनिया गांधी यांची राष्ट्रपतींशी चर्चा

विशेष प्रतिनिधी ,  नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांच्या चर्चेला पितृ पंधरवडा संपताच पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची स्वतंत्र भेट घेऊन या संदर्भात चर्चा केल्याचे समजते.

राष्ट्रपती नवरात्रीतील शेवटचे चार दिवस आपल्या गावात दुर्गापूजेत व्यस्त राहणार असल्यामुळे संभाव्य खांदेपालट शुक्रवापर्यंत होण्याची दाट शक्यता आहे.
तृणमूल काँग्रेसच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागा रिक्त आहेत. तसेच दिवंगत विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पायउतार झालेले वीरभद्र सिंह यांच्या मंत्रिपदांची जबाबदारी अन्य मंत्र्यांवर सोपावण्यात आली आहे. त्यापैकी आनंद शर्मा, व्यालार रवी, वीरप्पा मोईली, कपिल सिब्बल यांच्याकडे असलेल्या दोन-दोन मंत्रालयांचा भार हलका केला जाण्याची शक्यता आहे. अव्वल चार मंत्र्यांपैकी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांना पुढच्या वर्षी कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुक्त करण्याचा काँग्रेसश्रेष्ठींचा विचार असल्याचे म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुभवी नेते तारिक अन्वर यांचीही संभाव्य फेरबदलात वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातून माजी मंत्री गुरुदास कामत तसेच विलास मुत्तेमवार यांना पुन्हा संधी मिळू शकते.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाल्यास तो नवरात्रातील राष्ट्रपतींच्या दुर्गापूजेचे शेवटचे चार दिवस वगळून पुढच्या दोन ते तीन दिवसांतच शक्य होणार आहे. राष्ट्रपतींना भेटण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनीही बुधवारी वेळ मागितली आहे.