विक्रम पंडितांचा राजीनामा नव्हे तर गच्छंती? Print

alt

पीटीआय, न्यू यॉर्क
अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाची बँक असणाऱ्या ‘सिटी बँके’च्या प्रमुखपदाचा विक्रम पंडित यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला नसून त्यांना तो देण्यास भाग पाडले गेले, अशी वृत्ते येथील प्रसिद्धीमाध्यमांनी दिली आहेत.
जागतिक मंदीदरम्यान संकटात सापडलेल्या ‘सिटी बँके’ची धुरा पंडित यांनी स्वीकारली होती. पाच वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी या बँकेला गतवैभव प्राप्त करुन दिले. या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत होता, परंतु गेल्या काही महिन्यांत बँकेच्या संचालकांशी विसंवाद निर्माण झाल्याने संचालक मंडळानेच त्यांना प्रमुखपदावरुन पायउतार होण्यास सांगितले, असे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. बँकेचे धोरण ठरवताना पंडित यांच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले गेल्याने ते आपल्यावरील जबाबदारी योग्यरितीने पार पाडू शकत नसल्याची भावना काही संचालकांमध्ये निर्माण झाली होती, बँकेच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत ते संचालकांना पुरेशी माहिती देत नव्हते, यामुळेच संचालक मंडळ व त्यांच्यातील दरी रुंदावत गेली व त्याची अखेर त्यांचा राजीनामा घेण्यात झाली, असे या वृत्तात म्हटले आहे.  फायनान्शीअल टाईम्सनेही याच आशयाचे वृत्त दिले आहे.