न्यूनगंड आला की आत्मविश्वास संपला..! Print

डॉ. रश्मी करंदीकर यांचा तरुणाईला सल्ला
प्रतिनिधी, मुंबई

‘स्वत:बद्दल न्यूनगंडाची भावना असली की आपल्या कामाविषयी आपल्यालाच आत्मविश्वास वाटत नाही. या न्यूनगंडाच्या भावनेला मी माझ्याजवळ कधीच फिरकू दिले नाही. शेवटी आपले काम प्रामाणिकपणे करणे महत्त्वाचे आहे. कामात कसूर न ठेवल्यानेच पुरुषांचे वर्चस्व असलेल्या पोलीस दलात एक महिला म्हणून काम करताना मला कधीच दडपण आले नाही,’ अशा शब्दांत राज्य महामार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांनी तरुणाईसमोर आपल्या यशाचे गमक उलगडले.
‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या ‘तिच्या विजयासाठी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या तरुणींना डॉ. करंदीकर यांचे हे आश्वासक शब्द दिलासा देणारे ठरले. रवींद्र नाटय़ मंदिरच्या पु. ल. देशपांडे मिनी थिएटरमध्ये गुरुवारी रंगलेल्या या मनमोकळ्या गप्पांच्या कार्यक्रमात चतुरस्र अभिनेत्री आणि व्हिवा सेलिब्रिटी गेस्ट एडिटर सोनाली कुलकर्णी या डॉ. करंदीकर आणि श्रोते यांच्यातील दुवा बनल्या. खाकी वर्दीतल्या या कर्तव्यकठोर महिला अधिकाऱ्याने प्रेक्षकांकडून आलेल्या प्रत्येक प्रश्नाला अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. त्याच वेळी पोलीस दलात तरुणींना असलेल्या करिअरविषयक संधींची, कामाच्या स्वरूपाची, जबाबदारींची आणि सर्वात शेवटी म्हणजे समाधानाची जाणीवही डॉ. करंदीकर यांनी करून दिली. पोलीस किंवा प्रशासकीय सेवेत करिअर करणाऱ्या तरुणींना आपला निर्धार पक्का करताना या अनुभवांचे ‘शेअरिंग’ आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वास उपस्थित तरुणींच्या डोळ्यात तरळला.
भिवंडीसारख्या संवेदनशील भागात काम करताना, अनाथ मतिमंद व मूकबधिर मुलींवर झालेल्या अत्याचारांचे प्रकरण हाताळताना आलेले अनुभव तसेच वेळखाऊ पोलिसी व्यवसाय आणि घर सांभाळताना होणारी कसरत याविषयी बोलताना डॉ. करंदीकर म्हणाल्या, या कामात आपल्याला कधी साचलेपण, गंजलेपण आले नाही. डोक्याला सतत नवा खुराक देणारा हा व्यवसाय म्हणूनच आपण मनापासून करू शकलो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या कामाचे वैशिष्टय़ अधोरेखित केले.
‘सामान्य जनतेने पोलिसी पेशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे,’ असे कळकळीचे आवाहन त्यांनी या वेळी केले. ‘पोलिसांचे कामच असे असते की, त्यांना एकाच वेळी सामाजिक कार्यकर्त्यांची, समुपदेशकाची, प्रसंगी वडीलधाऱ्याची भूमिकाही बजावावी लागते. तुम्ही जेव्हा सणवार साजरे करीत असता तेव्हा पोलीस दिवसभर घराबाहेर राहून तुमच्या सुरक्षिततेसाठी झटत असतो. त्यांच्या या कामाचा सामान्यांनी आदर केला तर त्यांनाही काम करण्याचा हुरूप येईल,’ अशी अपेक्षाही त्यांनी समस्त मुंबईकरांकडून व्यक्त केली. पोलिसांमधील भ्रष्टाचाराला कोणी बळी पडत असेल, तर त्यांनी त्याविरोधात तक्रार करण्यास पुढे आले पाहिजे. पोलीस हे आपल्या समाजाचाच एक भाग आहे. कोणी तरी देणारा असतो म्हणून कोणी खाणारा असतो. लोकांनीच नियमाप्रमाणे वागायचे ठरवले तर लाच देण्या-घेण्याचे प्रसंगच उद्भवणार नाही, असा दावाही त्यांनी पोलीस आणि भ्रष्टाचार या कळीच्या मुद्दय़ावर मत मांडताना केला.     
सलाम ‘त्या’ पदाला..
तुम्ही एवढय़ा शिकलेल्या आहात. अडाणी, कमी शिकलेल्या या राजकारण्यांना सलाम करताना वाईट वाटत नाही का, या प्रश्नावर, सलाम हा त्या पदाला असतो, असे समर्पक उत्तर देऊन डॉ. करंदीकर यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. मात्र या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.