मिळून सारेजण.. Print

केजरीवालांच्या आरोपांनंतर राजकीय नेत्यांकडून एकमेकांची पाठराखण
पीटीआय , नवी दिल्ली - शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

‘सोनिया गांधी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, कपिल सिबल, मायावती हे सारे एकमेकांची कामे करणाऱ्या मोठय़ा कुटुंबाचे सदस्य आहे..,’ या अरविंद केजरीवाल यांच्या टीकेला चोवीस तास उलटतात न तोच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्या नेत्यांनी एकमेकांची पाठराखण करत या टीकेची सत्यताच पटवून दिली! एकीकडे शरद पवार गडकरींबाबत ‘विश्वास’ व्यक्त करत होते, तर दुसरीकडे मुलायम सिंह ‘खुर्शीद, गडकरींवरील आरोप सिद्ध होणे गरजेचे आहे’ असे म्हणत होते. काँग्रेसने तर,‘निराधार आरोप करणे राजकारणासाठी घातक आहे’ असे सांगत राजकीय पक्षांना सावधगिरीचा इशारा दिला.

गडकरी जबाबदारीने कामे करतात : पवार
अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेले आरोप आधी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दिली. त्याचवेळी ‘गडकरी हे अत्यंत जबाबदार व्यक्ती असून ते जबाबदारीनेच कामे करतात’ अशी पावतीही त्यांनी दिली. ते म्हणाले,‘गडकरी हे शेतकऱ्यांच्या हितासाठी कामे करतात. मला त्यांची पाठराखण करताना काहीही अडचण नाही. महाराष्ट्रात काही संस्था अशा आहेत जिथे ३० सदस्य एकत्रपणे काम करतात. ते तेथे राजकारण नव्हे; तर विकासाची चर्चा करतात. शेतकऱ्यांच्या मदतीने साखर कारखाना उभारणे ही सेवाच आहे.’ गडकरींची आपले व्यावसायिक संबंध नाहीत, असेही ते म्हणाले.
तथ्यहीन आरोप राजकारणासाठी धोकादायक : काँग्रेस
राजकारण्यांविरोधात केल्या जाणाऱ्या तथ्यहीन आरोपांबाबत चिंता व्यक्त करताना ‘सर्व राजकीय पक्षांनी याबाबत सावध राहीले पाहिजे,’ असे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी गुरुवारी म्हटले. त्याचवेळी माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर प्रशासनावर दबाव वाढवण्यासाठी आणि स्वार्थासाठी केला जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
केजरीवालांना सगळेच भ्रष्ट वाटतात : मुलायम
अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत कोणालाही सोडलेले नाही. त्यांच्या मते, सारेच भ्रष्ट आहेत, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केजरीवालांवर तोफ डागली.  गडकरी आणि केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरील आरोप सिद्ध व्हायचे आहेत, असे प्रमाणपत्रही त्यांनी दिले.