पोलिसांवर हात टाकणाऱ्यांची खैर नाही! Print

वाहतूक परवाना रद्द  नवा पासपोर्ट,  नोकरी नाही
प्रतिनिधी, मुंबई

दंगली, हिंसाचार किंवा आंदोलनांदरम्यान पोलिसांना ‘लक्ष्य’ करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन अशा प्रवृत्तींविरोधात मुंबई पोलिसांनी आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्या व्यक्तीचा वाहन परवाना, पासपोर्ट(पारपत्र) रद्द करावे तसेच नोकरीसाठी आवश्यक ‘चारित्र्य प्रमाणपत्र’ त्यांना देऊ नये, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी शुक्रवारी परिपत्रक काढून दिले आहेत. सीएसटी हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांवर हात उचलण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी हे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा तर दाखल होईलच; याशिवाय अशा हल्लेखोराची प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र फाईल बनवण्यात येईल. सेवायोजन कार्यालयातही अशा व्यक्तीची माहिती देऊन अशा व्यक्तीस नोकरी देण्याबाबत हरकत घेण्यात येणार आहे. अशा व्यक्तीवर एमपीडीएअन्वये कारवाईही केली जाणार आहे. पोलीस उपायुक्तांच्या सहीने अशा कारवाईचे प्रस्ताव हे संबंधित विभागाला पाठविले जाणार आहेत.    
कारवाईचे स्वरूप
* अशा व्यक्तीची माहिती पारपत्र विभागाला पाठवून त्याचे पासपोर्ट नूतनीकरण रोखणे.
* शस्त्र तसेच वाहन परवाना कायमस्वरूपी रद्द.
* ‘लूक आउट लिस्ट’मध्ये नाव टाकून देश सोडण्यास मनाई करणे.
* ‘चारित्र्य प्रमाणपत्र’ न देणे.