रेल्वेतील खानपान दुपटीने महागले Print

प्रसाद मोकाशी
मुंबई

प्रवाशांसाठी रेल्वे गाडय़ांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या खानपान सेवेचे दर ११ ऑक्टोबरपासून अचानक १०० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. याबाबत रेल्वेने अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. तर दुसरीकडे, रेल्वेस्थानकांमध्ये खासगी कंत्राटदारांमार्फक चालवल्या जाणाऱ्या फूड मॉल्स तसेच फूड प्लाझामधील खाद्यपदार्थाच्या किमतीही एक ऑक्टोबरपासून २५ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.
 रेल्वे स्थानकांवर तसेच रेल्वे गाडय़ांमध्ये दिल्या जाणाऱ्या खानपान सेवेबाबतचा निर्णय रेल्वे बोर्ड घेते. गेल्या १० ते १२ वर्षांत खाद्यपदार्थाचे दर वाढविण्यात आले नव्हते. मात्र ऑक्टोबर महिन्यात हे दर अचानक वाढविण्यात आले असून त्यामुळे रेल्वे गाडय़ांमध्ये मिळणारे जेवण तसेच नाश्ता महाग झाला आहे. १० तासांपेक्षा जास्त काळ प्रवास असणाऱ्या गाडय़ांमध्ये रेल्वेच्या पँट्रीकारमधून जेवण तसेच नाश्ता पुरविला जातो. हे काम खासगी कंत्राटदारांमार्फत करण्यात येते. सेवा कर आणि व्हॅटमध्ये वाढ झाल्यामुळे हे दर वाढवल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. खानपान सेवेचा समावेश रेल्वेच्या तिकिटामध्ये असल्यानेच अलीकडे वातानुकूलित गाडय़ांच्या प्रथम वर्गाचे भाडे वाढण्यामागे खरे कारण हेच असल्याचे सांगण्यात येते.    

‘डेक्कन क्वीन’मधील वाढीव दर  
उपमा २१ रु. (पूर्वी १२), टोस्ट बटर १६ रु. (१२), कांदा भजी २१ रु. (१४), व्हेज सॅण्डविच २३ रु. (१४), कटलेट ३१ रु. (१५), चीज सॅण्डविच ३७ रु. (३०), ऑम्लेट ३१ रु. (१७), पावाचे दोन स्लाइस १० रु. (सहा) आणि बीन २९ रु.(२५) .