मुंबईने मला आत्मविश्वास दिला!..-विजया मेहता Print

प्रतिनिधी
मुंबई

‘कुठल्याही ऐतिहासिक काळाचा, देशाचा, शहराचा, समाजाचा, कुटुंबाच्या आयुष्याचा दर्जा हा त्याच्या संस्कृतीवर अवलंबून असतो, म्हणूनच काही काही पिढय़ाच अशा आत्मविश्वासपूर्ण असतात. आपण स्वतंत्र भारतात तेही मुंबईत जन्माला आलेल्या अशा आत्मविश्वासपूर्ण पिढीतील एक आहोत’, असे अभिमानाने भारलेले उद्गार प्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक विजयाबाई मेहता यांनी काढले, आणि नरिमन पॉइंट येथील एक्सप्रेस टॉवर्समधील सभागृहात ते शब्द घुमताच, पलीकडच्या सागराच्या दिशेने येणाऱ्या मुंबईच्या वाऱ्यानेही जणू आनंदाची एक मस्त गिरकी घेतली..
रंगायनची चळवळ जिथे जन्माला आली, ती भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूट, नाटय़-साहित्यिक घडामोडींचे केंद्रबिंदू ठरलेला गिरगावातील साहित्य संघ, लोकमान्य रंगभूमी, अल्काझी, ब्रेख्त, पीटर ब्रुक, वैदिक रंगभूमी, एनसीपीएमधला प्रवेश आणि टीव्ही नामक दृक्-श्राव्य माध्यमातून केलेला कलेचा नवा आविष्कार.. ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात मुक्त चिंतन करताना विजयाबाईंच्या अनुभवाच्या पोतडीतून जणू एक काळ, एक पर्व, एक इतिहास उलगडत गेला..
या इतिहासाची रुजुवात भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूूटमध्ये झाली होती. प्रत्येक तपानंतर काही तरी वेगळं करण्याच्या ऊर्मीतून अस्वस्थ होणाऱ्या विजयाबाईंनी या इतिहासाचा पट उलगडण्यास सुरुवात केली आणि पुन्हा एकदा त्या रंगायतनच्या दिवसांमध्ये रमून गेल्या.. पुन्हा एकदा भुलाभाईतील दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतानाचे सुख विजयाबाईंच्या डोळ्यात तर स्पष्ट उमटलेच होते, पण, ही आठवण सांगतानाचे त्यांचे, ‘आणि मी पुन्हा एकदा तरुण झाले’ हे वाक्य त्याची प्रामाणिक कबुलीही देऊन गेले. माझी कारकीर्द मुंबईने घडविली, हे उपस्थितांना सांगताना, आठवणींच्या कोशात डोकावणाऱ्या त्यांच्या डोळ्यांत मुंबईविषयीचे प्रेम आणि कृतज्ञ भावही उमटले होते..
या कार्यक्रमात लोकसत्ता परिवारासोबत विजयाबाईंनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांमधून मुंबईतील वैचारिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराच्या इतिहासाची पाने जणू उलगडत गेली. आपल्या वैचारिक जडणघडणीत त्या काळाचा, आजूबाजूला असलेल्या वातावरणातील संस्कारांचा फार मोठा वाटा होता, असे विजयाबाईंनी सांगितले. आमची पिढीच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आली होती. त्यामुळे आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो आहोत, याचा अभिमान, राष्ट्र सेवा दलाकडून आणि वडिलांकडून मिळालेले संस्कार, भिवंडीतल्या घरामुळे मिळालेली ओळख, गांधींच्या चळवळीचे गारूड, असे वातावरण आजूबाजूला असताना संस्कार होणार नाहीत हे शक्य आहे काय, असा खणखणीत सवाल करणाऱ्या विजयाबाईंनी, मुंबईत जन्म झाल्यामुळेच आपसूकच हे संस्कार मिळत गेल्याचे मान्य केले. असे वातावरण आणि नाटय़-कलाक्षेत्रातील दिग्गजांचा सहवास व त्यातून विकसित होत गेलेल्या नाटय़जाणिवा यातूनच रंगायनसारखी चळवळ उभी राहिली. या चळवळीतील त्या दिवसांमुळे सोळाव्या-सतराव्या वर्षीच मला मुंबईत कर्मभूमी मिळाली आणि मराठीत काम करायचे हे निश्चित झाले, असे विजयाबाई म्हणाल्या, आणि अनेक तपांच्या वाटचालीची बीजेदेखील बोलकी झाली.    
सविस्तर वृत्तान्त लवकरच..