चुकार चालकांवर कारवाईचा बडगा Print

alt

परिवहन विभागाची १०० रिक्षा-टॅक्सींवर कारवाई
प्रतिनिधी, मुंबई
भाडेवाढीनंतर प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या विरोधात परिवहन विभागाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी तब्बल १०० हून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांना परिवहन विभागाने कारवाईचा बडगा दाखवला.

 

हकीम यांच्या शिफारशींनंतर रिक्षा-टॅक्सी चालकांनी वाहनात मूळ भाडेपत्रिका ठेवणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे चालकाने स्वत:चे ओळखपत्र, गाडीची मूळ कागदपत्रेदेखील सोबत बाळगायची आहेत. चालक फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी गेल्या १० दिवसांपासून प्रवाशांकडून परिवहन विभागाकडे करण्यात येत आहेत. परिवहन विभागाच्या विभागीय कार्यालयांनी मोठय़ा प्रमाणावर भाडेपत्रिका वितरित केल्या असून रिक्षा-टॅक्सी युनियननेही त्याचे वितरण केले आहे. असे असतानाही भाडेपत्रिकेच्या झेरॉक्स बाळगणाऱ्या रिक्षा-टॅक्सींविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
रविवारी परिवहन विभागाने सात रस्ता, दादर, सायन, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडुप, विक्रोळी आदी विविध भागांत धडक मोहीम राबवली आणि त्यात १०० हून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई केली. पूर्व उपनगर परिवहन विभागाने दोन दिवसांत ८० रिक्षांवर, पश्चिम उपनगर परिवहन विभागाने ४२ रिक्षा-टॅक्सींवर, तर मुंबई मध्य प्रादेशिक विभागाने १५ टॅक्सींवर कारवाई केली आहे. पश्चिम उपनगर परिवहन विभागाने भाडे नाकारणाऱ्या ४० जणांवर कारवाई केली असून त्यात ३७ रिक्षा, तर तीन टॅक्सी आहेत. त्यांच्याकडून १०,७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून एक टॅक्सी व आठ रिक्षाचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिम, बोरिवली येथे ४२ जणांवर भाडेपत्रिकेची झेरॉक्स बाळगल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.