पावसाने धरला फेर Print

गरब्याचा उत्साह मात्र अबाधित
प्रतिनिधी , मुंबई
नवरात्र आणि पाऊस यांचे समीकरण यंदाही मान्सूनने कायम राखले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पावसाने शहर व परिसरात चांगलाच फेर धरला. त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’ मुळे निर्माम झालेल्या गरीच्या वातावरणात गारवा निर्माण केला. अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक थोडी विस्कळीत झाली. मात्र, पावसाने लवकर आवरते घेतल्याने गरबा खेळण्याच्या उत्साहावर विरजण पडले नाही.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला दिवसभर कडक ऊन व सायंकाळी पाऊस असा खेळ सुरू झाला होता. मात्र दुसऱ्या आठवडय़ात हा प्रकार थांबला. सुमारे दोन आठवडय़ांनी पुन्हा एकदा मंगळवारी सायंकाळी मुंबई आणि आसपासच्या उपनगरांसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ-बदलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. सुमारे अर्धा ते पाऊण तास पावसाचा जोर राहिला व नंतर पावसाने आवरते घेतले. अचानक पडलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची धांदल उडाली. तसेच काही भागातील वाहतूकही विस्कळीत झाली. कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठाही विस्कळीत झाला.
संध्याकाळी पावसाने जोर धरलेला पाहून दसऱ्याच्या आदल्या रात्रीचा दांडिया बुडतो की काय अशी शंका दांडियाप्रेमींना वाटत होती. पण साडेआठपर्यंत पावसाने आवरते घेतले. परिणामी पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्यात गरब्याचा जोर वाढला.