पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी Print

१२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान
प्रतिनिधी , मुंबई
alt

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त १२,१०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस देणे शक्य असून गटनेत्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, तसेच गेल्या वर्षीचा बोनसही संपकरी कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी विनंती कामगार संघटनांकडून पालिका आयुक्तांना करण्यात येणार आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना १२,१०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. गतवर्षी पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ११,००० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आला होते. यावर्षी त्यात १० टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली. पालिकेतील सुमारे १ लाख ३० हजार ५६ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणार असून त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १४० कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
यांनाही सानुग्रह..
*  खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना   ६,०५० रु.
*  आरोग्य सेविकांना  ३,३०० रु.
* दत्तकवस्ती योजनातील  स्वयंसेवकांना १,९८० ’  
* कंत्राटी कामगारांना ४,६७८ रु.