वाढीव महागाई भत्त्याबाबत आज निर्णय Print

खास प्रतिनिधी , मुंबई
केंद्राप्रमाणेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाईभत्ता देण्याची मागणी होत असली तरी त्याबाबच वित्त विभाग फारसा अनुकूल नसल्यामुळे अद्याप नस्ती (फाईल) तयार झालेली नाही. अर्थमंत्री जयंत पाटील आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्यात आज, गुरुवारी याबाबत चर्चा होणार असून त्यात वाढील महागाईभत्त्याबाबत कोणता निर्णय होतो याकडे राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात ७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने, म्हणजेच १ जुलैपासून लागू करण्यात आला. केंद्राप्रमाणे राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना वाढीव महागाईभत्ता मिळू लागला. केंद्राच्या धोरणाप्रमाणे राज्यातही महागाईभत्ता लागू करण्याचे धोरण असतानाही गेल्या महिनाभरात कोणताच निर्णय न झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राज्यात  सरकरी कर्मचाऱ्यांची संख्या १९ लाख असून सेवानिवृत्तांची संख्या १.५ लाख आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ६५ टक्के महागाईभत्ता मिळत असून त्यात ७ टक्के वाढ केल्यास सरकारवर वार्षिक २२०८ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.