वीरभद्र सिंह यांची प्रसारमाध्यमांना धमकी Print

भ्रष्टाचाराबाबतच्या प्रश्नांवर ‘कॅमेरे तोडण्याचा’ इशारा ’ काँग्रेसकडून माफी
पीटीआय , शिमला/ नवी दिल्ली
भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरीमुळे हैराण झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांमधील वैफल्य वाढत चालले असून याच संतापातून माजी केंद्रीय मंत्री व हिमाचल प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष वीरभद्र सिंह यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे तोडण्याची धमकी दिली. भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता संतापलेल्या सिंह यांनी ‘मी तुमचे कॅमेरेच तोडून टाकेन,’ अशी धमकी दिली. या विधानावरून वादंग निर्माण होताच, वीरभद्र सिंह यांनी तसेच काँग्रेसने प्रसारमाध्यमांची माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कुलूमध्ये आलेले सिंह यांना पत्रकारांनी त्यांच्यावर भाजपने केलेल्या आरोपांबाबत विचारले. त्यावर, ‘हे सर्व आरोप निराधार असून मी निवडणुकीनंतर त्यांना उत्तर देईन,’ असे सिंह म्हणाले. या संदर्भात पत्रकारांनी आणखी छेडले असता संतापलेल्या सिंह यांनी ‘मी तुमचे कॅमेरेच तोडून टाकेन.’ अशी धमकी दिली.  वीरभद्र यांच्या या विधानांवरून वाद निर्माण झाला. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शिद यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या ‘धमकीवजा इशारा वक्तव्या’वरून आधीच काँग्रेस अडचणीत आली असताना सिंह यांच्या विधानांमुळे पक्षाची प्रतिमा खालावली आहे. या पाश्र्वभूमीवर, बुधवारी काँग्रेसने तातडीने सिंह यांच्या वक्तव्याबद्दल प्रसारमाध्यमांची माफी मागितली. ‘अनेकदा निवडणुकीच्या दरम्यान अशा घटना होत असतात. सिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून निवडणुकीच्या प्रचारकामामुळे त्यांच्यावरील मानसिक व शारीरिक दबाव वाढला असेल. त्यामुळे त्यांच्याकडून असे उद्गार आले असतील,’ असे पक्षाचे प्रवक्ते संदीप दीक्षित म्हणाले.