औद्योगिक उत्पादन आज रजेवर! Print

* वीज दरवाढीविरोधात संघटनांचा बंद
* राज्यभरातून प्रतिसादाची शक्यता
प्रतिनिधी, मुंबई

विविध करांचे ओझे आणि मंदीमुळे निर्माण झालेले अस्थैर्य अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाच ‘महावितरण’ने वाढवलेल्या वीजदरांमुळे इतर राज्यांच्या स्पर्धेत मागे पडलेल्या उद्योजकांनी अखेरीस बंदचे हत्यार उपसले आहे. वीज दरवाढीविरोधात आज, गुरुवारी राज्यभरातील उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत.
‘महावितरण’चे राज्यभरात साडेतीन लाख औद्योगिक वीजग्राहक आहेत. एकूण ग्राहसंख्येच्या हे प्रमाण १.६ टक्के असले तरी त्यांच्याकडून ‘महावितरण’ला वर्षांकाठी २९ हजार ६४५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. ‘महावितरण’च्या महसुलात त्याचे प्रमाण ६१ टक्के आहे. या ग्राहकांमुळे राज्यातील सामान्य वीजग्राहकांना ‘क्रॉस सबसिडी’ मिळते व त्यांचे दर थोडे कमी राहतात. मात्र, आता याच औद्योगिक वीजग्राहकांकडून जादा दर आकारण्याची मंजुरी राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) ‘महावितरण’ ला दिली आहे. वीज दरवाढीच्या या निर्णयामुळे देशातील सर्वात महाग औद्योगिक वीजदर असलेले राज्य ही महाराष्ट्राची ख्याती कायम राहिली आहे. राज्यातील औद्योगिक प्रगतीला त्याचा फटका बसत असून शेजारच्या गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अडीच ते तीन रुपयांनी जास्त आहेत. त्यामुळे या राज्यांतील उद्योगांशी स्पर्धा करणे महाराष्ट्रातील उद्योगांना कठीण जात आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यातील औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन गुरुवारी बंद पुकारला असून अनेक जिल्हास्तरीय संघटनांनी त्यास पाठिंबा दर्शवला आहे.     
संघटनेच्या मागण्या
* रात्री १० ते सकाळी ६ या काळातील वीजवापरासाठी प्रति युनिट अडीच रुपये इतकी सवलत द्यावी.
* औद्योगिक ग्राहकांना अन्य राज्यांच्या समपातळीत वीजदर आकारणीसाठी उपाययोजना करावी वा अनुदान द्यावे.